मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांची घोषणा : साखळी रवींद्र भवनात दिंडी, हरिपाठ
साखळी : पंढरपूर येथे गोव्यातून वर्षभर जाणाऱ्या विठ्ठल भक्तांसाठी गोवा सरकारतर्फे ‘गोवा भवन’ साकारण्याचा सरकारचा मनोदय असून तेथील जिल्हाधिकाऱ्यांच्या मी संपर्कात आहे. सुमारे ४ हजार चौरस मीटर जागा गोवा सरकारला मिळाल्यास अयोध्या भवनाप्रमाणेच पंढरपुरातही ‘गोवा श्री विठ्ठल भवन’ सरकार सरकारणार आहे. त्यामुळे गोव्यातील लोकांची निवासासाठी चांगली सोय होईल, असे प्रतिपादन मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत (Pramod Sawant) यांनी रवींद्र भवन, साखळी येथे केले.
साखळी रवींद्र भवनतर्फे आयोजित दिंडी व हरिपाठ या कार्यक्रमात मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत बोलत होते. यावेळी त्यांच्यासह रवींद्र भवनचे उपाध्यक्ष दत्ताराम चिमुलकर तसेच न्हावेली, अामोणा व विठ्ठलापूर-साखळी येथील पंढरपूर पायी वारीचे प्रमुख उपस्थित होते.
विठ्ठलाची भक्ती करणे व १५ दिवस चालत जाऊन त्यांचे दर्शन घेणे म्हणजे खरेच मोठे पुण्यकार्य आहे. या कार्यात गोव्यातील वारकरी सहभागी होतात. आमची संस्कृती टिकवण्याच्या दृष्टीने वारकऱ्यांकडून होणारे हे दैवी कार्य आहे. या कार्याला गोव्यातील अनेक लोक विविध माध्यमांतून हातभार लावतात. म्हणजेच या कार्यात संपूर्ण गोवाच सहभागी होत असतो असाच त्याचा अर्थ होतो. याच वारकऱ्यांच्या तसेच गोव्यातील असंख्य विठ्ठल भक्तांच्या सोयीसाठी पंढरपुरात गोवा भवन उभारण्यासाठी सरकार प्रयत्नशील असून जागेची व्यवस्था होताच लवकरच गोवा भवन पंढरपुरात साकारले जाणार आहे, असेही मुख्यमंत्री डॉ. सावंत यांनी सांगितले.
मुख्यमंत्र्यांकडून टाळवादन
यावेळी वारकरी मंडळांनी रवींद्र भवनच्या बाहेरून दिंडी घालत तसेच विठूनामाचा जोरदार गजर करत रवींद्र भवनचा परिसर दणाणून सोडला. ही दिंडी बाहेरून रवींद्र भवनात आल्यानंतर मुख्य जागेत वारकरी मंडळातर्फे हरिपाठ सादर करण्यात आला. या हरिपाठात मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंतही वारकऱ्यांबरोबर बसून सहभागी झाले. त्यांनीही हातात टाळ घेऊन हरिपाठाचा ठेका धरला व विठूनामाचा गजर केला.