मुख्यमंत्र्यांकडे आलेल्या ८५ टक्के समस्यांचे निराकरण

जनतेने मांडल्या ७,३१८ समस्या; ६,२६३ समस्या सोडविण्यास यश

Story: प्रतिनिधी। गोवन वार्ता |
25th March, 12:29 am
मुख्यमंत्र्यांकडे आलेल्या ८५ टक्के समस्यांचे निराकरण

पणजी : मुख्यमंत्री हेल्पलाईन, समस्यांसाठीचे पोर्टल तसेच हॅलो गोयकर या कार्यक्रम अशा माध्यमातून जनतेने मुख्यमंत्र्यांपुढे ७,३१८ समस्या मांडल्या होत्या. यातील ६,२६३ समस्यांचे (८५ टक्के) निराकरण करण्यात यश आले आहे. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी विधानसभेत दिलेल्या लेखी उत्तरातून ही माहिती मिळाली आहे. याबाबत आमदार विजय सरदेसाई यांनी अतारांकीत प्रश्न उपस्थित केला होता.

उत्तरात दिलेल्या माहितीनुसार, मुख्यमंत्री हेल्पलाईन सेवेला १५ ऑगस्ट २०२४ ते ७ मार्च २०२५ दरम्यान १,२५८ कॉल आले आहेत. यातील १० कॉल चुकून लागले होते. उर्वरित १,२४८ कॉल विविध प्रकारच्या समस्यांसाठी होते. यामध्ये आरोग्य, शिक्षण, समाजकल्याण, गृह, सार्वजनिक बांधकाम खाते, जलस्रोत खाते, कला आणि संस्कृती खाते तसेच अन्य खाती किंवा महामंडळातील कामाच्याबाबत होते. यातील १,२३५ समस्यांचे निराकरण करण्यात आले. तर, ६९ समस्या अजून प्रलंबित आहेत.

सरकारने सुरू केलेल्या ऑनलाईन पोर्टलवर ४,६६७ समस्या नोंदवण्यात आल्या होत्या. यातील ३,४२४ सोडवण्यात आल्या असून १,२४३ प्रलंबित असल्याचे उत्तरात म्हटले आहे.

‘हॅलो गोयकार’मध्ये १५ समस्यांचे निराकरण

‘हॅलो गोयकार’ या कार्यक्रमातून मुख्यमंत्री लाईव्ह पद्धतीने जनतेशी संवाद साधतात. या कार्यक्रमादरम्यान विविध समस्यांचे १५२ कॉल आले होते. यातील १५ समस्यांचे निराकरण करण्यात आले. तर ११० समस्या सोडविण्याचे काम सुरू आहे. उर्वरित २७ कॉलमध्ये या आधी सांगितलेल्या समस्या पुन्हा सांगण्यात आल्या होत्या. 

हेही वाचा