उत्तर गोवा मोटार अपघात दावा लवादाचा निवाडा
प्रतिनिधी। गोवन वार्ता
पणजी : होंडा-वाळपई राज्य मार्गावर सालेली येथे २०१७ मध्ये चालकाचा ताबा सुटल्याने स्विफ्ट कारने विजेच्या खांबाला धडक दिली होती. या अपघातात जखमी झालेला वाली ऊर्फ तन्वीर आगा हा युवक शारीरिकदृष्ट्या १०० टक्के अपंग झाला. त्याला भारतीय राखीव दलातील काॅन्स्टेबल पदाची नोकरी गमवावी लागली होती. या प्रकरणी आगा यांना ९ सप्टेंबर २०१९ पासून ६ टक्के व्याजदरासह १ कोटी ३० लाख ४४ हजार ९४ रुपयांची भरपाई द्या, असा आदेश म्हापसा येथील उत्तर गोवा मोटार अपघात दावा लवादाच्या अध्यक्ष शर्मिला पाटील यांनी विमा कंपनीला दिला आहे.
या प्रकरणी वाळपई पोलिसांनी अपघाताचा गुन्हा दाखल केला होता. वाली उर्फ तन्वीर आगा यांनी अपघात दावा लवादाकडे याचिका दाखल करून ८५ लाख रुपयांच्या नुकसानभरपाईची मागणी केली होती. त्यात त्यांनी कार चालक तथा मालक कमालउद्दीन सय्यद मोहम्मद शेख आणि इफको टोकियो जनरल इन्शुरन्स कंपनी लिमिटेड यांना प्रतिवादी केले होते. १९ डिसेंबर २०१७ रोजी रात्री आगा आणि मित्र कमालउद्दीन चालवत असलेल्या कारने साखळीहून वाळपईला घरी जात होते. रात्री १२.०५ वा. सालेली येथे कमालउद्दीनचा कारवरील ताबा सुटला. कार विजेच्या खांबाला जाऊन धडकली. यात वाली गंभीर जखमी झाला. त्याला प्रथम साखळी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात आणि नंतर गोमेकॉत दाखल करण्यात आले. शस्त्रक्रियेनंतर त्याला १७ जानेवारी २०१८ रोजी घरी पाठवण्यात आले. अपघातातील दुखापतींमुळे तो शारीरिकदृष्ट्या १०० टक्के अपंग झाला. त्यामुळे त्याला पोलीस खात्यातील आयआरबी काँन्स्टेबल पदाची नोकरी गमवावी लागली. अपघातावेळी त्याचे वय २५ वर्षे होते. त्याला प्रतिमहिना ३१ हजार रुपये वेतन मिळत होते.
डॉक्टरांची साक्ष ठरली महत्त्वाची
आगातर्फे अॅड. आर. आर. सावईकर यांनी गोवा मोटार अपघात दावा लवादासमोर बाजू मांडली. साखळी प्राथमिक आरोग्य केंद्र आणि गोमेकाॅच्या डॉक्टरांची साक्ष महत्त्वाची ठरली. विमा कंपनीने चालकाने विमा नियमाचे उल्लंघन केल्याचा दावा केला; मात्र पुरावे दिले नाहीत. लवादाने सर्वोच्च न्यायालयाचे तसेच इतर न्यायालयांच्या निवाड्यांचे संदर्भ देत आगा यांना १ कोटी ३० लाख ४४ हजार ९४ रुपयांची भरपाई देण्याचे व इतर आदेश जारी केले.