नियमबाह्य नोकरभरतीबाबत हेकेखोरपणा सोडण्याचा वकिलांचा सल्ला
म्हापसा : येथील नगराध्यक्ष डॉ. नूतन बिचोलकर यांच्या अपात्र याचिकेवरील सुनावणी येत्या १० डिसेंबर रोजी होणार आहे. गुरूवारी २८ रोजी झालेल्या सुनावणीवेळी याचिकादार व विरोधी बाजूंच्या वकिलांनी नगरपालिका संचालकांसमोर हजेरी लावली. ही नोकर भरती नियमबाह्य असून आपला हेकेखोरपणा सोडावा, असा सल्ला उच्च न्यायालयाच्या वकिलांनी नगराध्यक्ष व पालिका मुख्याधिकाऱ्यांना दिला आहे.
आत्माराम गडेकर नामक व्यक्तीने म्हापसा पालिकेतील कथित नोकरभरती प्रकरणी नगरविकास संचालकांकडे नगराध्यक्षा डॉ. बिचोलकर यांच्याविरूध्द अपात्रता तर मुख्याधिकारी शेटकर यांच्याविरूध्द कडक कारवाई संदर्भात याचिका दाखल केली होती. एक महिन्यापूर्वी म्हापसा पालिकेत दोन कनिष्ठ स्टेनोग्राफर व चार एलडीसी अशी सहा पदे भरली होती. नगराध्यक्षा व मुख्याधिकारी यांनी बेकायदेशीररित्या व योग्य प्रक्रियेविना या सहा जणांना पालिकेच्या सेवेत कंत्राटी पध्दतीने सामावून घेतले आहे, असा दावा गडेकर यांनी केला होता.
या याचिकेवरील सुनावणी गुरूवारी २८ रोजी सकाळी नगरपालिका संचालकांसमोर झाली. यावेळी नगराध्यक्षा, मुख्याधिकारी तसेच याचिकादाराच्या वतीने त्यांच्या वकिलांनी बाजू मांडली. त्यानंतर पालिका संचालकांनी पुढील सुनावणी १० डिसेंबर रोजी निश्चित केली.
दरम्यान, मंगळवारी २६ रोजी नगराध्यक्ष डॉ. नूतन बिचोलकर यांनी सत्ताधारी गटातील काही नगरसेवक आणि मुख्याधिकारी व अधिकाऱ्यांसमवेत उच्च न्यायालयाच्या आवारात एका वरीष्ठ वकिलांची भेट घेतली व या नोकर भरती प्रश्नी कायदेशीर सल्ला घेतला. नोकर भरतीमध्ये नियमबाह्यपणा झाला आहे, असे या वरीष्ठ वकिलांनी स्पष्ट केले.याविषयी आपण कोणताही लिखित कायदेशीर सल्ला देऊ शकत नसल्याचेही त्यांनी सांगितले.
शिवाय सत्ताधारी गटातील नगरसेवकांना विश्वासात घ्यायला हवे. पालिका मंडळातील बैठकीत आणले जाणारे विषय त्यांच्यासमोर मांडायला हवेत. एकामेकांशी चर्चा व्हायला हवी. हे विषय व्यवस्थित आहेत की नाहीत, यावर त्यांच्यात संभाषण व्हायला हवे. अन्यथा कारभार हाताळताना यापुढेही असाच अनियमितपणा होईल. त्यामुळे आपला हेकेखोरपणा सोडावा, असा सल्ला सदर वकिलांनी नगराध्यक्षांना दिला असल्याची माहिती सूत्रांनी दिली.
कायदेशीर सल्ला घेण्याच्या संदर्भातील उच्च न्यायालयाच्या वकीलांच्या भेटीवेळी पालिका मुख्याधिकारी चंद्रकांत शेटकर देखील आपल्या समवेत असतील, याची माहिती नगराध्यक्षा डॉ. बिचोलकर यांनी आपल्या सहकारी नगरसेवकांना दिली नव्हती. परंतु मुख्याधिकारी ऐनवेळी घटनास्थळी पोहोचल्याचे पाहून या नगरसेवकांनी नगराध्यक्षांसमोर उघडपणे नाराजी व्यक्त केली. हा कायदेशीर सल्ला घेण्याच्या भेटीमध्ये लेखा तथा प्रशासकीय अधिकारी व कनिष्ठ स्टेनेग्राफरचाही समावेश होता.