वादळी पावसाच्या तडाख्यात सत्तरीतील शेती-बागायतींचे प्रचंड नुकसान

तब्बल ५० लाखांचे नुकसान झाल्याचा अंदाज; विभागीय कृषी कार्यालयात नुकसान भरपाईचे दावे केले जाताहेत सादर

Story: वेब डेस्क । गोवन वार्ता |
24th July, 04:33 pm
वादळी पावसाच्या तडाख्यात सत्तरीतील शेती-बागायतींचे प्रचंड नुकसान

वाळपई : सोमवारी रात्री सत्तरी तालुक्याला मुसळधार पावसाने अक्षरशः झोडपून काढले. चक्रीवादळाचा फटका बसून येथील शेती व बागायतीचे प्रचंड नुकसान झाले. केळी, सुपारी, नीरफणस तसेच आंबे आणि इतर झाडांची यात मोठ्या प्रमाणात पडझड झाल्याचे समोर आले आहे.

सत्तरीत जवळपास ५० लाखांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. दरम्यान, शेतकऱ्यांनी वाळपई विभागीय कृषी कार्यालयामध्ये नुकसान भरपाईचे दावे  सादर करण्यास सुरुवात केली आहे. शेतकऱ्यांनी ताबडतोब आपल्या नुकसान भरपाईचे दावे कृषी कार्यालयात सादर करावेत जेणेकरून लवकरच या संदर्भाचा अहवाल कृषी खात्याकडे सादर करणे शक्य होईल असे वाळपई विभागीय कृषी अधिकाऱ्यांनी सांगितले. 

सोमवारी मध्यरात्री सत्तरी तालुक्याच्या जवळपास सर्वात भागांमध्ये चक्रीवादळाचा तडाखा बसला. यामुळे येथे मोठ्या प्रमाणात हानी झाली. वीज वाहिन्यांच्या तारा तुटल्या. खांब मोडले .अनेक घरांची पडझड झाली. त्याचबरोबर शेती बागायतीचे देखील नुकसान झाले आहे. म्हाऊस, ठाणे, नगरगाव, खेतोडा सावर्डे ,केरी, पिसुर्ले या पंचायत क्षेत्रातील कृषी बागायतीची मोठ्या प्रमाणात हानी झाल्याचे समोर आलेले आहे. यामुळे मोठ्या प्रमाणात शेतकरी बांधवांना फटका बसलेला आहे. 

केळी सुपारीची झाडे उन्मळून पडल्याने  नुकसानीचा सर्वाधिक प्रमाणात फटका हा नगरगाव कोपर्डे, ठाणे या भागात  बसलेला आहे. यामुळे अनेक शेतकरी, बगायतदार हवालदिल झालेत. ब्रह्मकरमळी येथील मिलिंद गाडगीळ यांच्या बागायती मधील मोठ्या प्रमाणात सुपारीची झाडे मोडलेली आहेत. या संदर्भात प्रतिक्रिया व्यक्त करताना मिलिंद गाडगीळ यांनी सांगितले की चक्रीवादळाचा फटका हा खासकरून केळी व सुपारीच्या झाडाचे नुकसानी झालेली आहे .त्याचबरोबर नारळाच्या झाडांची  बऱ्याच प्रमाण नुकसानी झालेली आहे .आपल्या बागायतीसोबतच शेजारील बागायतीचे देखील असेच नुकसान झाल्याचे त्यांनी सांगितले. तसेच सावर्डे पंचायत क्षेत्रातही वादळी पावसाचा फटका मोठ्या प्रमाणात बसल्याचे समोर आले आहे. दरम्यान येथील स्थानिक गोपाळ गांवकर यांनी कृषी खात्याने आवश्यक अशी नुकसान भरपाई देत आधार देण्याची मागणी केली आहे.   

विभागीय कृषी कार्यालयाकडे दावे सादर 

कृषी खात्याकडे नुकसान भरपाईचे दावे सादर करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. गोवन वार्ताच्या प्रतिनिधींनी या संदर्भात विभागीय कृषी अधिकारी विश्वनाथ गावस यांच्याशी संपर्क साधला असता, सध्या तरी खात्याकडून कोणत्याही प्रकारचा अध्यादेश आलेला नाही मात्र प्रभावित शेतकरी व बागायतदारांनी आपल्या नुकसान भरपाईचे दावे कृषी कार्यालयाकडे सादर करावेत अशा प्रकारची विनंती केलेली आहे. या संदर्भाचा अहवाल कृषी खात्याला सादर करण्यात येईल. त्यानंतर नुकसान भरपाई देण्याच्या दृष्टिकोनातून खात्याचे वरिष्ठ अधिकारी निर्णय घेतील अशी प्रतिक्रिया व्यक्त केलेली आहे .एकूण नुकसानी संदर्भात बोलताना गावस यांनी सांगितले की सत्तरी तालुक्याच्या जवळपास सर्वच भागाला चक्रीवादळाचा फटका बसला यामुळे जवळपास ५० लाखाच्या आसपास नुकसान होण्याची शक्यता नाकारता येण्यासारखी नाही.

 सत्तरीत मोठ्याप्रमाणात विविध प्रकारच्या भाजीचे उत्पादन घेण्यात येते. यावरच येथील बऱ्याच गावांतील लोकांची गुजराण होते. गेल्या वीस दिवस अविरतपणे पडणाऱ्या पावसाने या गावठी भाजीच्या पिकावर परिणाम केला आहे. यात लागवडीखाली असलेले क्षेत्र नष्ट झाल्याने येथील गरीब शेतकरी गळीतगात्र बनला आहे. पांढरी-तांबडी भाजी, गावठी वांगी, पडवळ, दुधी व इतर पालेभाज्यांच्या पिकांचे मळेच्या मळेच नष्ट झालेत यामुळे येत्या काळात गावठी भाजीचा पुरवठा होणे दुरापास्त होणार आहे. 


हेही वाचा