आठवणी बिनभिंतीच्या घरातल्या...

बिनभिंतीच्या घरात असताना असंख्य जीवलग माणसं जोडली पण त्यांना घरी कधी बोलवले नाही. माझा खडतर प्रवास मला माझ्यापुरताच ठेवायचा होता. आज कितीतरी माणसांना घरी बोलवताना आनंद होतो. तेवढीच वेदना न बोलवण्यातील आठवणीत जमा होते.

Story: सय अंगणाची |
08th June, 12:36 am
आठवणी बिनभिंतीच्या घरातल्या...

बिनभिंतीचं घर माझं वादळवाऱ्यात तटस्थ उभं राहणारं, तर अंधाराला चौफेरी प्रकाशमय करणारं माझं कौलारू घर. वयाची २५ वर्षे ज्यात आसरा मिळाला ते आमचे कौलारू घर अोसंख्य सुख-दु:खाच्या आठवणी देऊन गेले. न दार, न कुलूप तरीही कसली भीती निर्माण झाली नाही. बाबांनी तयार केलेले ते घर भल्या मोठ्या वादळी वाऱ्यातही हलले नाही. सालई, सागवान, किंदळ यांच्या खांबांचा (मेडी) घर उभारण्यासाठी वापर केला जायचा. अवतीभोवती कुडाच्या काठ्यांनी उभे केलेले कुड लहानसे असले, तरी कितीतरी जणांना सुखद झोप देणाऱ्या त्या घरांनी आतापर्यंत हजारो नाती जोडली. 

लहानपणी इतरांची घरं पाहिल्यावर आपल्याही घराला भिंती असाव्यात, त्यावर आपला आवडता रंग असावा‌ असे वाटायचे आणि कौलारू घराचा एक प्रकारचा तिरस्कार वाटायचा. परंतु कालांतराने छोट्या छोट्या गोष्टी उमजत गेल्या. अंधारही दिव्याच्या वातीने प्रकाशमय करून जगण्यातल्या आशा आकांक्षा वाढवल्या. मिरगाच्या अगोदर घराची साफसफाई करताना, गवताच्या पेंढ्या डोक्यावरून घेऊन येताना, आपणाला कुणी पाहू नये. पाहिलं तर शाळेत चिडवतील म्हणून त्या पूर्णपणे पुढे सरकवून अस्पष्ट वाट दिसेल अशा रितीने घेऊन यायचो. दादा तर वाटेत कुणी दिसले, तर त्या तिथल्या तिथे फेकून पसार व्हायचा. 

गवताच्या पेंढ्या, पोफळीची चुडतं यांनी तयार केलेलं घर क्षणात नजरेआड होऊन चारही बाजूला भिंती उभ्या राहिल्या त्यावेळी आनंद निर्माण झालाच, परंतु २५ वर्षांचा सहवास नकळत नाहीसा झाला ते बिनभिंतीच घर आठवणीत जमा झाले. दिव्याच्या उजेडात रात्र-रात्र जागवली, कितीतरी वेळा झोपेत चुकून डुलकी गेली तर भरभर जळलेले केस, पाठीत आईकडून पडलेला धपाटा या गोष्टी आता डोळ्यात पाणी आणतात. एकदा तर अभ्यास करताना केरोसीनची चिमणी (दिवा) अंथरूणावर पडून जळलेली माझी गोधडी, नंतर सर्वांंअगोदर झोपण्याची मला घातलेली अट, चारही भावंडापेक्षा क्षणोक्षण हृदय पेटवून टाकणारे प्रसंगही या बिनभिंतीच्या घरात घडले. 

कितीतरी सरपटणाऱ्या जीवांची ओळख पाऊस सुरू झाला की व्हायची. चुलीतल्या आगीने कपडे सुकायचे खरे, परंतु धुराचा येणारा वास मात्र असह्य व्हायचा. घरात वीज नव्हती, त्यामुळे इस्त्री करण्याचा प्रश्नच येत नव्हता. कधी शाळेचा गणवेश ओला राहिला, तर चुलीच्या वर बांधलेल्या उतू (बांबूपासून तयार केलेल्या) त्यावर सकाळी सकाळी गणवेश उलट सुलट करून सुकवायचा आणि शाळेत जायचे. भानोशीवर कायमच्या फणसाच्या आठळ्या सुकत घातलेल्या. कधी पावसाळी थंडीचा कुडकुडा आला, तर त्या चुलीत भाजल्या जायच्या. नंतर साल जरासं काळं झाल्यावर निखाऱ्यातून काढून जमिनीवर हाताने चोळून साल निराळं करून खाण्यातील ती मज्जा आजच्या पिझ्झा-बर्गरपेक्षाही भारीच! 

घरात कितीही भावंडं असली तरी सर्वांसाठी भलंमोठं अंथरूण एकच असायचं. वैयक्तिक खोली वगैरे ही हल्लीच काही महिन्यांपूर्वी मला अनुभवता आली. वह्या भिजल्या, की कुठल्याही फॅनचा वारा न घेता, चुलीतील आगीच्या ऊबेने करकरीत सुकणारी वहीची पाने तर सुकून पडलेल्या एखाद्या झाडाच्या पानासारखी वाटायची. अवतीभोवतीचा वारा कोंडून भितींच्या आतील वीजेवरचा वारा न घेता, निसर्गातून येणाऱ्या थंड वाऱ्याने जगण्यालाही शांत निरागस ठेवले. कुडामधून झिरपणारे पाणी अडवण्यासाठी बाबांनी कुडाला काढलेल्या मातीच्या लेपाने तर नंतर सगळीकडेच गडद अंधार केला. त्यामध्ये झिरपणाऱ्या केरोसीनच्या दिव्याच्या उजेडाने एक वेगळचं वातावरण निर्माण व्हायचं. 

बिनभिंतीच्या घरात असताना असंख्य जीवलग माणसं जोडली पण त्यांना घरी कधी बोलवले नाही. माझा खडतर प्रवास मला माझ्यापुरताच ठेवायचा होता. आज कितीतरी माणसांना घरी बोलवताना आनंद होतो. तेवढीच वेदना न बोलवण्यातील आठवणीत जमा होते. या वरवरच्या आठवणी सांगताना काही वाटत नाही, परंतु ते चित्र डोळ्यासमोर उभे राहताच आठवते ते माझे एम.ए, बी.एड.चे शिक्षण पूर्ण होईपर्यंतची मिळालेली बिनभिंतीच्या घराची सोबत. त्यानेच तर माझा प्रवास सकारात्मक विचारांनी तेवत ठेवला!

क्रमशः 


ओनिता रामा वरक, पाल-ठाणे‌, सत्तरी.