गूढ मृत्यूमुळे आके येथे खळबळ : आई अत्यवस्थ, इस्पितळात दाखल

Story: प्रतिनिधी । गोवन वार्ता |
24th April, 09:09 pm
गूढ मृत्यूमुळे आके येथे खळबळ : आई अत्यवस्थ, इस्पितळात दाखल

घटनास्थळी तपास करताना मडगाव पोलीस. 

मडगाव : आके येथील पॅराडाइज अपार्टमेंटमधील आतून बंद असलेल्या फ्लॅटमध्ये मोहम्मद जुबेर खान (२९) व आफान खान (२७) या दोन सख्ख्या भावांचे मृतदेह आढळून आल्यामुळे खळबळ उडाली. मडगाव अग्निशामक दलाच्या जवानांनी दरवाजा तोडून मृतदेह बाहेर काढले. यावेळी या युवकांची आई रुकसाना खान (५४) हीदेखील त्याच फ्लॅटमध्ये होती. तिला अत्यावस्थ अवस्थेत इस्पितळात दाखल केले.


बरेच दिवस उपाशी राहिल्यामुळे मृत्यू..?

आके येथील पॅराडाइज अपार्टमेंटच्या ए ३ विंगमधील दुसऱ्या मजल्यावरील फ्लॅट क्रमांक ३ मध्ये ही घटना घडली. या फ्लॅटमध्ये मोहम्मद जुबेर, आफान व रुकसाना हे कुटुंबीय राहत होते. या मुलांचे वडील नझीर त्यांच्यासोबत राहत नसत, पण ते अधूनमधून येऊन-जाऊन असायचे. मुलांनी दोन दिवस फ्लॅट उघडला नसल्याने ते पोलिसांकडे गेले. पोलिसांनी अग्निशामक दलाच्या सहाय्याने दरवाजा तोडला असता, मोहम्मद जुबेर व आफान हे दोघेही मृतावस्थेत आढळले. त्यांची शरीरे सुकलेली होती व घरातून वास येत होता. त्यामुळे त्यांनी बरेच दिवस काहीही खाल्लेले नसावे, असे मृतदेह पाहिल्यावर प्रथमदर्शनी दिसून आले. रुकसाना ही त्याच खोलीत पांघरुण घेउन झोपलेली आढळली. तिची तब्येतही बिघडली होती. पोलिसांनी तिला इस्पितळात दाखल केले व मृतदेह दक्षिण गोवा जिल्हा इस्पितळाच्या शवागारात उत्तरीय तपासणीसाठी नेले.


दोघेही उच्चशिक्षित, मात्र...

मिळालेल्या माहितीनुसार, माेहम्मद जुबेर खान व आफान खान यांच्यातील एकाने सिव्हिल इंजिनिअरिंग, तर एकाने बीकॉमचे शिक्षण घेतले होते. मोहम्मद जुबेर याचे लग्न झालेले होते, पण तो पत्नी व मुलांसोबत राहत नव्हता. तसेच त्यांच्या घरातून भांडणे झाल्याचेही आवाज अधूनमधून यायचे, असे शेजाऱ्यांचे म्हणणे आहे. या प्रकरणी मडगाव पोलिसांकडून पुढील तपास केला जात आहे.

हेही वाचा