ऑस्ट्रेलियन पत्रकाराचा भारत सरकारवर निवडणूक वृत्तांकनास मज्जाव केल्याचा आरोप!

मर्यादेचे उल्लंघन केल्याच्या कारणावरून वृत्तांकन करण्यापासून रोखल्याचा सरकारच्या अधिकृत सूत्रांकडून खुलासा

Story: वेब डेस्क । गोवन वार्ता |
24th April, 10:09 am
ऑस्ट्रेलियन पत्रकाराचा भारत सरकारवर निवडणूक वृत्तांकनास मज्जाव केल्याचा आरोप!

नवी दिल्ली : भारतात लोकसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यात २६ एप्रिल रोजी मतदान होत आहे. याच निवडणुकीचे वृत्तांकन करण्यासाठी आलेल्या ऑस्ट्रेलियन ब्रॉडकास्टिंग कॉर्पोरेशनच्या (ABC) दक्षिण आशिया ब्यूरो चीफ अवनी डायस यांनी भारत सरकारवर गंभीर आरोप करत पुन्हा ऑस्ट्रेलियाला जाण्याचा निर्णय घेतला आहे. निवडणूक वृत्तांकनास भारत सरकारने परवानगी दिली नाही, असा आरोप तिने केला आहे. तर, तिचा आरोप चुकीचा आणि दिशाभूल करणार आहे, असा खुलासा भारत सरकारच्या अधिकृत सूत्रांनी केला आहे.

ऑस्ट्रेलियन ब्रॉडकास्टिंग कॉर्पोरेशनच्या (ABC) दक्षिण आशिया ब्यूरो चीफ अवनी डायस यांनी २० एप्रिल रोजी भारत सोडला. भारत सरकारने त्यांच्या व्हिसाची मुदत वाढवली नाही. त्यामुळे लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यातील मतदानानंतर एक दिवस त्यांना भारत सोडावा लागला. ती भारतीय निवडणुकांबाबत अहवाल देऊ शकली नाही, असे तिने म्हटले आहे.

‘भारतीय परराष्ट्र मंत्रालयाच्या एका अधिकाऱ्याने फोन करून तिला सांगितले की, तिचा व्हिसाचा कालावधी वाढवला जाणार नाही. याचे कारण म्हणजे यूट्यूबवरील ‘फॉरेन करस्पाँडंट’ या तिच्या अलीकडील भागात तिने जी माहिती दिली ती सर्व मर्यादा ओलांडणारी आहे’, असा गंभीर आरोप अवनीने केला आहे. तथापि, भारत सरकारच्या सूत्रांनी तिचा आरोप खोडून काढला आहे. अवनीने तिच्या व्यावसायिक व्हिसाच्या नियमांचे उल्लंघन केल्याचे आढळले होते. तरीही निवडणूक कव्हरेजसाठी तिच्या विनंतीवरून तिचा व्हिसाचा कालावधी वाढविण्यात आला होता, असा खुलासा त्यांनी केला आहे.

अवनीच्या व्हिसाची मुदत २० एप्रिल रोजी संपली होती आणि तिने १८ एप्रिलपर्यंतच व्हिसाची फी भरली होती. नंतर तिच्या व्हिसाचा कालावधी त्याच दिवशी जून अखेरपर्यंत वाढवण्यात आला होता. तिने त्याच दिवशी भारत सोडण्याचा निर्णय घेतला. मात्र, भारत सोडला त्यावेळी तिचा व्हिसा वैध होता. तिच्या व्हिसाची मुदतवाढ मंजूर झाली होती. निवडणूक कव्हर करण्यास परवानगी न दिल्याचा त्यांचा दावाही पूर्णपणे चुकीचा आहे, असेही सरकारी सूत्रांनी स्पष्ट केले आहे.

सर्व व्हिसाधारकांना मतदान केंद्राबाहेर निवडणूक कव्हर करण्याची परवानगी असल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे. मतदान केंद्र आणि मतमोजणी केंद्रांवर अहवाल देण्यासाठी अधिकृत पत्र आवश्यक आहे. एसीबीचे इतर वार्ताहर मेघना बाली आणि सोम पाटीदार यांना निवडणूक कव्हरेजसंबंधी पत्रे आधीच मिळाली होती, असेही सूत्रांनी नमूद केले आहे.

हेही वाचा