दारूच्या नशेत झोपला बंद गाडीत, हृदयविकाराने गेला जीव

कळंगुटमध्ये बंद गाडीत झोपलेल्या पर्यटक युवकाचा मृत्यू

Story: प्रतिनिधी। गोवन वार्ता |
21st April, 12:19 am
दारूच्या नशेत झोपला बंद गाडीत, हृदयविकाराने गेला जीव

म्हापसा : कळंगुट येथे गाडीत झोपलेल्या सोलापूर येथील सोनी शिंदे (२८, रा. संजयनगर सोलापूर) या पर्यटकाचा मृत्यू झाला. याप्रकरणी पोलिसांनी सोनी याचा मित्र संशयित सिद्धेश माद्रे (४०, सोलापूर) याच्याविरुद्ध सदोष मनुष्यवधाचा गुन्हा नोंदवला आहे.

सोनी शिंदे व संशयित आरोपी सिद्धेश्वर माद्रे हे आपल्या दोन मित्रांसमवेत गोव्यात कळंगुट येथे शुक्रवार, दि. १२ रोजी पर्यटनाला आले होते. हे चारही जण अक्कलकोट येथील एका वैद्यकीय आस्थापनात नोकरीला होते. त्यांनी आपल्यासोबत केए २८ एमए १७४५ क्रमांकाची कार आणली होती.

कळंगुट फुटबॉल मैदानाजवळील एका हॉटेलमध्ये ते चौघे उतरले होते. दि. १२ रोजी ते गोव्यात आले. दि. १३ रोजी रात्री ते जेवण करण्यासाठी गेले. तिथे त्यांनी मद्यपान केले. सोनी याला दारुचे प्रमाण जास्त झाल्याने तो गाडीतच झोपला. त्याला इतर सहकाऱ्यांनी खोलीवर नेण्याचा प्रयत्न केला, पण तो त्यांच्यासोबत आला नाही. त्यामुळे संशयित सिद्धेश्वर याने कारचे सर्व दरवाजे लॉक केले व ते तिघेही जण खोलीवर जाऊन झोपले. दि. १४ रोजी दुपारी ते उठेपर्यंत तो गाडीतच झोपून होता. संशयित व त्याच्या मित्रांनी गाडीचे दरवाजे उघडले तेव्हा तो बेशुद्धावस्थेत होता. त्यानंतर त्याला कांदोळी आरोग्य केंद्रात उपचारार्थ दाखल केले. पण तिथे डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. सोनी शिंदे बंद गाडीत झोपल्याने त्याला उकाड्याचा त्रास झाला. त्यातच हृदयविकाराचा झटका येऊन त्याचा मृत्यू झाला असावा, अशी शक्यता शवचिकित्सा अहवालात नमूद करण्यात आली आहे.

युवकाच्या काकाकडून तक्रार

पोलिसांनी सोनी याचे काका किरण शिंदे यांच्या तक्रारीच्या आधारे संशयित सिद्धेश्वर माद्रे याच्याविरुद्ध भा.दं.सं.च्या ३०४ अ कलमांतर्गत सदोष मनुष्यवधाचा गुन्हा नोंद केला आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक परेश नाईक यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक परेश सिनारी करीत आहेत.