आयएसएल : एफसी गोवाची उपांत्य फेरीत धडक

चेन्नईयनला २-१ असे हरवून सेमीफायनलमध्ये सातव्यांदा प्रवेश

Story: न्यूज डेस्क। गोवन वार्ता |
21st April, 12:09 am
आयएसएल : एफसी गोवाची उपांत्य फेरीत धडक

फातोर्डा : प्ले-ऑफ फेरीतील नॉकआउट २मध्ये शनिवारी घरच्या पाठिराख्यांसमोर चेन्नईयन एफसीला २-१ असे रोखताना माजी विजेता एफसी गोवाने आयएसएल २०२३-२४ हंगामाच्या उपांत्य फेरीत धडक मारली. सेमीफायनल प्रवेशाची त्यांची ही सातवी वेळ आहे. फॉर्मात असलेला स्ट्रायकर नोह सदाओई आणि मिडफिल्डर ब्रँडन फर्नांडेस (प्रत्येकी एक गोल) यजमानांच्या विजयाचे शिल्पकार ठरले. सेमीफायनलमध्ये गौर्सची गाठ मुंबई सिटी एफशी पडेल.      

फातोर्डा स्टेडियमवर झालेल्या सामन्यात तिन्ही गोल पूर्वार्धातील होते. उत्तरार्धात एकही गोल झाला नाही. यजमानांनी आघाडी कायम राखताना आगेकूच केली. मध्यंतरानंतरच्या पहिल्याच मिनिटाला जय गुप्ताला चुकीच्या पद्धतीने अडवल्याने पाहुण्यांना पेनल्टी कॉर्नर मिळाला. मात्र, अंकितची फ्री किक गोलकीपर धीरजने व्यवस्थित क्लियर केली. ५०व्या मिनिटाला सदाओईच्या पासवर कार्लोस मार्टिनेझला गोल करण्याची संधी होती. मात्र, त्याचा फटका प्रतिस्पर्धी गोलकीपरच्या थेट हातात गेला. ५३व्या मिनिटाला एफसी गोवाला पेनल्टी कॉर्नर मिळाला. मात्र, तो वाया गेला. शेवटच्या मिनिटांत दोन्ही टीमनी मुख्य खेळाडूंना विश्रांती देताना बदली खेळाडू मैदानात उतरवले.      

७५ ते ७८ या तीन मिनिटांच्या कालावधीत तीन पेनल्टी कॉर्नरची नोंद झाली. त्यातील दोन चेन्नईयन एफसीच्या नावे राहिले. मात्र, कुणालाही संधीचे गोलात रूपांतर करता आले नाही. सहा मिनिटांच्या अतिरिक्त खेळात पहिल्याच मिनिटाला सदाओईचा फटका चेन्नईयन एफसीचा गोलकीपर देबजीतने अचूक अडवला. त्यानंतर तीन मिनिटांनी बदली बोर्जा हेरेराने एफसी गोवाला पेनल्टी कॉर्नर मिळवून दिला. मात्र, यावेळीही प्रतिस्पर्धी टीमच्या बचावफळीने कुठलीही चूक केली नाही. शेवटी मध्यंतराची आघाडी कायम राखताना यजमानांनी २-१ अशा फरकाने अंतिम चार संघांतील स्थान निश्चित केले.      

तत्पूर्वी, पूर्वार्धात तीन गोलची नोंद झाली. त्यात २-१ अशा फरकासह यजमानांनी वर्चस्व राखले. तिन्ही गोल मध्यंतरापूर्वीच्या ९ मिनिटांत झाले. ३६व्या मिनिटाला फॉर्मात असलेला स्ट्रायकर नोह सदाओईने डाव्या कॉर्नरच्या बॉटमवरून डाव्या पायाने पाहुण्यांची बचावफळी भेदली. पहिले सत्र संपण्यापूर्वी काही सेकंद आधी एफसी गोवाने आघाडी वाढवली. डिफेंडर जय गुप्ताच्या क्रॉसवर मिडफिल्डर ब्रँडन फर्नांडेसने उजव्या कॉर्नरने चेंडू गोल जाळ्यात टाकला.      

मात्र, अतिरिक्त वेळेतील चौथ्या मिनिटाला चेन्नईयनच्या डिफेंडर आकाश संगवानच्या क्रॉसवर डिफेंडर लॅझर किर्कोविकने सहा यार्डवरून हेडरने चेंडूला गोलपोस्टमध्ये अचूकपणे टाकताना यजमानांची आघाडी २-१ अशी कमी केली.    

निकाल : एफसी गोवा २  (नोह सदाओई-३६व्या मिनिटाला, ब्रँडन फर्नांडेस-४५व्या मिनिटाला) वि. चेन्नईयन एफसी १ (नोहलॅझर किर्कोविक -४५+चौथ्या मिनिटाला)