स्पोर्टिंग-धेंपो आज आमनेसामने

द्वितीय विभागीय आय लीग फुटबॉल स्पर्धा

Story: न्यूज डेस्क। गोवन वार्ता |
21st April, 12:08 am
स्पोर्टिंग-धेंपो आज आमनेसामने

पणजी : स्पोर्टिंग क्लब दी गोवा यंदाच्या हंगामातील आपल्या सर्वांत मोठ्या आव्हानासाठी सज्ज झाला आहे. द्वितीय विभागीय आय लीग फुटबॉल स्पर्धेत स्पोर्टिंगचा वास्कोच्या टिळक मैदानावर रविवारी दुपारी ४ वा. गोव्याच्याच धेंपो स्पोर्ट्स क्लबशी सामना होणार आहे.

दोन फेऱ्या शिल्लक असताना बंगळुरूने पुढील मोसमासाठी आय लीग फुटबॉल स्पर्धेसाठी पात्रता मिळवली आहे. द्वितीय विभागातून केवळ दोन संघ मार्गक्रमण करणार असल्याने दुसऱ्या व शेवटच्या स्थानासाठी धेंपो व स्पोर्टिंगसह एकूण ४ संघांत चुरस आहे. स्पर्धेच्या पहिल्या टप्प्यात दोन्ही संघ जुने गोवे येथील धेंपो अकादमी मैदानावर आमने सामने आले होते त्यावेळेस स्पोर्टिंग फॉर्ममध्ये होता. पण, या सामन्यात स्पोर्टिंगला १-२ अशा पराभवाचा सामना करावा लागला होता.

संघातील वातावरण अतिशय सकारात्मक असून धेंपोशी दोन हात करण्यास सज्ज आहोत, असे स्पोर्टिंगचे तांत्रिक सल्लागार क्लायमॅक्स लॉरेन्स म्हणाले. स्पोर्टिंग रविवारी मागील पराभवाचे उट्टे काढण्याचा प्रयत्न करणार आहे. महाराष्ट्र ऑरेंज एफसी विरुद्ध खारघर येथे झालेल्या ०-३ अशा पराभवातून स्पोर्टिंगला सावरावे लागणार आहे. दुसरीकडे धेंपोने मागील सामन्यात केंकरे एफसीचा ४-० असा पराभव करत द्वितीय स्थानी झेप घेतली होती. आम्हाला कोणत्याही परिस्थितीत उर्वरित दोन्ही सामने जिंकावेच लागणार आहेत. आमच्याकडे दुसरा पर्याय नाही, असे लॉरेन्स म्हणाले.

या स्पर्धेत एससी बंगळुरू १२ सामन्यांतून २७ गुणांसह अव्वलस्थानी आहे. सुदेवा दिल्लीने शनिवारी एफसी बंगळुरू युनायटेडचा पराभव करत १३ सामन्यांतून २३ गुणांसह दुसरा क्रमांक मिळवला आहे. १२ सामन्यांतून २१ गुणांसह धेंपो तिसऱ्या स्थानी आहे. तर १३ सामन्यांतून २० गुणांसह बंगळुरू युनायटेड चौथ्या स्थानी आहे. पाचव्या स्थानावरील स्पोर्टिंगचे १२ सामन्यांतून १९ गुण झाले आहेत.