सूर्यकुमार यादव ठरला मुंबईसाठी ‘किंग’

पंजाब किंग्जचा ९ धावांनी पराभव : आशुतोषची जिगरबाज अर्धशतकी खेळी व्यर्थ

Story: न्यूज डेस्क। गोवन वार्ता |
19th April, 12:02 am
सूर्यकुमार यादव ठरला मुंबईसाठी ‘किंग’

चंदीगढ : रोमांचक सामन्यात मुंबई इंडियन्सने पंजाब किंग्जचा ९ धावांनी पराभव केला. प्रथम फलंदाजी करताना मुंबईने १९२ धावा केल्या. प्रत्युत्तरात पंजाबचा संघ १९.१ षटकांत १८३ धावा करत सर्वबाद झाला. पंजाबकडून आशुतोष शर्माने शानदार खेळी केली. मात्र, ही खेळी कामी येऊ शकली नाही. आशुतोषने २८ चेंडूत ६१ धावा केल्या. त्याने ७ षटकार आणि २ चौकार मारले. शशांक सिंगने ४१ धावा केल्या.

मुंबईकडून सूर्यकुमार यादवने ७८ धावांची खेळी केली. त्याने ५३ चेंडूत ७ चौकार आणि ३ षटकार ठोकले. तिलक वर्माने नाबाद ३४ धावा केल्या. रोहित शर्माने ३६ धावांचे योगदान दिले. यादरम्यान पंजाबकडून हर्षल पटेलने गोलंदाजी करताना ३ बळी घेतले. सॅम करनने २ बळी घेतले.

नाणेफेक गमावल्यानंतर मुंबई इंडियन्सने पंजाब किंग्जविरुद्धच्या सामन्यात १९२ धावा केल्या. शिखर धवन दुखापतीमुळे या सामन्यात खेळत नव्हता, त्यामुळे पंजाबचे नेतृत्व सॅम करनकडे होते. मुंबईची सुरुवात चांगली झाली नाही. इशान किशन केवळ ८ धावा करून पॅव्हेलियनमध्ये परतला. त्यानंतर रोहित शर्मा आणि सूर्यकुमार यादव यांच्यातील ८१ धावांच्या भागीदारीने मुंबईला आघाडीवर आणले.      

 रोहितने २५ चेंडूत ३६ धावा केल्या आणि त्याच्या खेळीत २ षटकार आणि ३ चौकारांचाही समावेश होता. मुंबईकडून सर्वाधिक धावा सूर्यकुमारने केल्या. त्याने ५३ चेंडूत ७८ धावा केल्या. त्याने आपल्या खेळीत ७ चौकार आणि ३ षटकार मारले.      

विशेषत: १४ व्या षटकानंतर मुंबई इंडियन्सच्या फलंदाजांनी वेग पकडण्यास सुरुवात केली. १४ षटक संपल्यानंतर संघाची धावसंख्या २ बाद ११५ धावा होती. पुढच्या ३ षटकांत टीम मुंबईच्या फलंदाजांनी ४१ धावा केल्या होत्या, त्यामुळे १७ व्या षटकानंतर टीमची धावसंख्या १५६ पर्यंत पोहोचली.       

१७ व्या षटकात सूर्यकुमार यादवने विकेट गमावली असली तरी टीम डेव्हिडचे वादळ अजून यायचे होते. तिलक वर्मा यानेही दुसऱ्या टोकाकडून आक्रमक भूमिका घेतली होती. टीम डेव्हिडने ७ चेंडूंच्या कॅमिओ खेळीत १४ धावा केल्या, ज्यात १ षटकार आणि २ चौकारांचा समावेश होता. तिलका वर्माने १८ चेंडूत ३४ धावांची नाबाद खेळी खेळली आणि संघाला १९२ धावांपर्यंत नेण्यात महत्त्वाचे योगदान दिले. मुंबईने शेवटच्या ६ षटकांत ७७ धावा केल्या.      

मधल्या षटकांमध्ये पंजाबकडून अतिशय तगडी गोलंदाजी होती. पण पॉवरप्ले आणि शेवटच्या ५ षटकांमध्ये पंजाब किंग्जच्या गोलंदाजांनी भरपूर धावा दिल्या. कागिसो रबाडाने १ बळी घेतला पण ४ षटकात ४२ धावा दिल्या. कर्णधार सॅम करनने २ विकेट घेतल्या, मात्र ४१ धावा दिल्या. दरम्यान, हर्षल पटेलने ३ बळी घेतले आणि त्याचा इकॉनॉमी रेटही चांगला होता. हरप्रीत ब्रारने प्रत्येक वेळी प्रमाणे फिरकीची जादू वापरली, पण तो एकाही फलंदाजाला पॅव्हेलियनमध्ये पाठवू शकला नाही. दुसरीकडे अर्शदीप सिंगही चांगलाच महागात पडला.