श्रीलंकेच्या महिलांचा मोठा विक्रम; गाठले ३०० पेक्षा अधिक धावांचे लक्ष्य!

Story: न्यूज डेस्क। गोवन वार्ता |
18th April, 10:55 pm
श्रीलंकेच्या महिलांचा मोठा विक्रम; गाठले ३०० पेक्षा अधिक धावांचे लक्ष्य!

पॉचेफस्ट्रूम : श्रीलंकेच्या महिला क्रिकेट संघाने ‌१७ एप्रिल रोजी पॉचेफस्ट्रूम येथे खेळल्या गेलेल्या तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात दक्षिण आफ्रिकेचा ६ गडी राखून पराभव केला. या निकालापेक्षाही मोठा विक्रम या सामन्यात झाला. खरे तर, महिला क्रिकेटच्या इतिहासात ३०० पेक्षा जास्त धावांचे लक्ष्य गाठण्याची ही पहिलीच वेळ आहे. याआधी महिला वनडे क्रिकेटमध्ये एवढ्या मोठ्या धावसंख्येचा पाठलाग केला गेला नव्हता.

या सामन्यात श्रीलंकेची कर्णधार चमारी अटापट्टूने १९५ धावांची खेळी खेळली जी महिला क्रिकेटमधील तिसरी सर्वोच्च धावसंख्या होती. तिने आपल्या डावात १३९ चेंडूंचा सामना केला आणि २६ चौकार आणि पाच षटकार मारले. त्यामुळे श्रीलंकेच्या संघाने ४४.३ षटकांतच लक्ष्य गाठले. अटापट्टूने या सामन्यात ७८ चेंडूत आपले शतक पूर्ण केले, जे तिचे नववे वनडे शतक होते. नंतर तिने षटकार मारून सामना संपवला.

तत्पूर्वी, दक्षिण आफ्रिकेची कर्णधार लॉरा वूलवर्थने शानदार फलंदाजी करत १४७ चेंडूत नाबाद १८४ धावा केल्या. तिच्या खेळीत २३ चौकार आणि ४ षटकारांचा समावेश होता. अशाप्रकारे दक्षिण आफ्रिकेच्या संघाने पाच गडी गमावून ३०१ धावा केल्या, परंतु दक्षिण आफ्रिकेच्या गोलंदाजांना या धावसंख्येचा बचाव करता आला नाही.

श्रीलंकेने ऑस्ट्रेलियाला टाकले मागे

एकदिवसीय सामन्यात ३०० हून अधिक धावांचे लक्ष्य गाठणारा श्रीलंकेचा महिला संघ केवळ पहिला संघ ठरला नाही तर या फॉरमॅटमधील सर्वात मोठ्या धावसंख्येचा पाठलाग करण्याचा ऑस्ट्रेलियाचा विक्रमही मागे टाकला. ऑस्ट्रेलियाने २०१२ मध्ये न्यूझीलंडच्या २८९ धावांचे आव्हान यशस्वी पूर्ण केले होते.