डिचोली पोलिस गुन्हा नोंदवून घेईनात; प्रकाशच्या भावाचे पोलीस अधीक्षकांना पत्र

Story: प्रतिनिधी । गोवन वार्ता |
28th March, 02:42 pm
डिचोली पोलिस गुन्हा नोंदवून घेईनात; प्रकाशच्या भावाचे पोलीस अधीक्षकांना पत्र

म्हापसा : झरीवाडा-पोडोशे, सत्तरी येथील कुख्यात गुन्हेगार प्रकाश विनायक पाटील हा गेल्या तीन महिन्यांपासून साळ-डिचोली येथून बेपत्ता आहे. पत्नी मंजुळा पाटील उर्फ वडार व तिच्या माहेरच्या मंडळींनी त्याचा खून केला असून या प्रकरणी तपास करावा, अशी मागणी प्रकाशचा भाऊ प्रशांत याने डिचोली पोलिसांकडे एका तक्रारीद्वारे केली आहे. पण, डिचोली पोलीस गुन्हा नोंदवून घेण्यास तयार नसल्याने प्रशांतने उत्तर गोवा पोलीस अधीक्षकांना पत्र पाठवले आहे.

बेपत्ता प्रकाश पाटील हा गोवा, महाराष्ट्र व कर्नाटकमध्ये सराईत गुन्हेगार म्हणून कुप्रसिद्ध आहे. त्याने पूर्वी राधा नामक महिलेशी लग्ने केले होते. त्यांना विनायक नामक मुलगा झाला. त्यानंतर दोघांचा घटस्फोट झाला. घटस्फोटानंतर प्रकाशने मंजुळा वडार हिच्याशी लग्न केले. तर, राधानेही दुसऱ्या व्यक्तीशी लग्न केले. शिवाय प्रकाशने कणकवली (महाराष्ट्र) येथील सुप्रिया नामक महिलेशी तिसरे कथित लग्न केले असून ती गरोदर आहे, असे या तक्रारीत प्रशांतने नमूद केले आहे.

प्रकाश याने मणेरी (दोडामार्ग, जि. सिंधुदुर्ग) येथे फार्महाऊस बांधले आहे. त्याचे बांधकाम कंत्राट त्याने साळ-डिचोली येथील मेहुणा नागेश वडार (मंजुळाचा भाऊ) याला दिले होते. मंजुळाचा भाऊ नागेश याने त्याच्याकडून ८ लाख रुपये उसने घेतले होते. पण, दिलेल्या वचनाप्रमाणे प्रकाशला तो पैसे परत करत नव्हता. यावरून मंजुळा व प्रकाश यांच्यात अंतर्गत वाद होता, असेही या तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.

गेल्या २ किंवा ३ डिसेंबर २०२३ रोजी प्रकाश महाराष्ट्रातील कोठडीतून सुटला होता. त्याला घ्यायला मंजुळा व त्याची तिसरी पत्नी सुप्रिया गेली होती. ४ डिसेंबर रोजी प्रकाश पाडोशे येथे घरी आईला भेटायला आला. ७ डिसेंबर रोजी जाताना आपण बेडरूमला कुलूप लावले आहे आणि मंजुळाला घरी घेऊन येणार नसल्याचे त्याने आईला सांगितले होते. त्यानंतर १७ डिसेंबरला तो पुन्हा घरी मुलगा तेजस समवेत आला व मंजुळाला परत आणणार नाही, पण मुलाची काळजी घेणार असल्याचे त्याने आईला सांगितले होते, असेही या तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.

प्रकाश याने कसई, दोडामार्ग येथील एका मालमत्तेत १६ लाखांची गुंतवणूक केली होती. त्या मालमत्तेचे विक्रीपत्र आपल्या नावावर व्हावी, अशी त्याची इच्छा होती. पण, मंजुळा हे विक्रीपत्र स्वतः नावावर करण्यासाठी भांडत होती. शिवाय मणेरी येथील फार्महाऊस बांधताना वास्तविक किंमतीपेक्षा जास्त रक्कम आकारून मेहुणा नागेश याने प्रकाशची फसवणूक केली होती, असाही आरोप प्रशांतने या तक्रारीत केले आहे.     

   घटनेच्या दिवशी 29 डिसेंबर 2023 रोजी सकाळी प्रकाश हा पोडोशे येथील घरी आला होता. आपल्या आईला मेहूणा नागेश वडार याच्याकडून उसने घेतलेले 8 लाख रूपये घ्यायला तसेच मंजुळाच्या नावे असलेली घरपट्टी आपल्या नावे स्थानिक पंचायतीकडून हस्तांतरित करतो असे सांगून तो निधून गेला होता. त्यानंतर आता पर्यंत त्याने आईला फोन केलेला नाही, असे या तक्रारीत म्हटले आहे.

पुणे येथे असलेले फिर्यादी प्रशांत याला त्याच्या आईने २५ जानेवारी रोजी फोन केला होता. तेव्हा प्रकाशचा कोणताही संपर्क होत नाही. शिवाय त्याला पोलिसांकडून अटक झाल्याचेही कळवण्यात आलेले नाही, असे तिने सांगितले. गेल्या २० फेब्रुवारी २०२४ रोजी सुप्रिया हिने आपल्या आईला फोन केला व आपण प्रकाशची पत्नी असल्याचे सांगितले. प्रकाशने आपल्याशी लग्न केले असून तो मंजुळाला सोडचिठ्ठी देऊन आपल्याला घरी घेऊन जाणार असल्याचे सांगितले होते, असे या तक्रारीत नमूद केले आहे. प्रकाश २९ डिसेंबर रोजी तो साळ-डिचोली येथे मंजुळाच्या भावाकडून पैसे आणण्यासाठी गेला होता. तिथे त्याचे मंजुळा व तिच्या कुटुंबीयांशी भांडण झाले होते. ही माहिती लगेच आईने मला दिली होती, असेही या तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.

दरम्यान, दिवशी २१ फेब्रुवारीला मी गोव्यात आलो. याच दरम्यान २१ जानेवारी रोजी मंजुळा पोडोशे येथे मुलासमवेत घरी आली व कुलूप बंद केलेला घराचा एक बेडरूम तिने उघडला व ती त्यात राहू लागली. आपण तिच्याकडे प्रकाशची विचारपूस केली तेव्हा २९ डिसेंबर रोजी आमच्यामध्ये भांडण झाले होते. पण, तिने या भांडणात समावेश असलेल्या कुटुंबीयांची नावे सांगण्यास नकार दिला. त्यानंतर २२ फेब्रुवारी रोजी मंजुळाला प्रकाश बेपत्ता झाल्याची तक्रार डिचोली पोलिसांत नोंदवण्यास भाग पाडले, असे प्रकाशने तक्रारीत नमूद केले आहे.

या दरम्यान, मंजुळा व कुटुंबीयांचा संशय आल्याने फिर्यादी प्रशांत पाटील हे दोडामार्ग ग्रामीण रुग्णालयात गेले व चौकशी केली. तेव्हा प्रकाशला त्या रुग्णालयात २९ डिसेंबर रोजी दाखल केले होते. त्याच्या डोक्याला जबर मार लागला होता आणि तो रक्ताच्या उलट्या करत होता. शिवाय मंजुळाही तिथे उपचारार्थ दाखल झाली होती. डॉक्टरांनी त्यांना पुढील उपचारार्थ म्हापसा इस्पितळात नेण्यास सांगितले. पण मंजुळा व तिच्या कुटुंबीयांनी प्रकाशला म्हापशाला नेले नाही. धारदार हत्यारांनी केलेल्या हल्ल्यामुळे गंभीर दुखापत होऊन भाऊ प्रकाशचा मृत्यू झाला असावा आणि खुनाचा आरोप होऊ नये म्हणून मंजुळा व तिच्या कुटुंबीयांनी त्याच्या मृतदेहाची विल्हेवाट लावली असावी, असा संशय प्रशांतने या तक्रारीत व्यक्त केला आहे. 

 २४ जानेवारी रोजी मंजुळा हिने कसई दोडामार्ग येथील जमीनीची मालकीपत्र आपल्या नावावर केल्याचेही दिसून आले आहे. या एकंदरीत प्रकारावरून मंजुळा व तिच्या कुटुंबीयांनी भाऊ प्रकाश याचा खून केल्याचे स्पष्ट होत असून संशयिताविरुद्ध भा.दं.सं.च्या १४३, १४४, १४७, १४८, ३०२, २०१ व १४९ कलमांन्वये खुनाचा गुन्हा नोंदवून चौकशी करावी, अशी विनंती गेल्या ८ मार्च रोजी प्रशांत पाटील यांनी डिचोली पोलिसांत केली होती. पण पोलिसांनी  गुन्हा नोंदवण्यास नकार दिला होता. त्यामुळे प्रशांत पाटील याने २७ मार्च २०२४ रोजी उत्तर गोवा पोलीस अधीक्षकांकडे तक्रार देऊन डिचोली पोलिसांना गुन्हा नोंदवून भाऊ प्रकाश पाटील यांच्या बेपत्ता प्रकरणाची चौकशी करण्याचे निर्देश द्यावेत, अशी मागणी त्यांनी केली आहे.

हेही वाचा