आठवीपासून होते प्रेम; लग्नानंतर पुन्हा जुळले सूत, केला खून

बाणावली येथे पतीच्या खूनप्रकरणी पत्नी, प्रियकराला अटक

Story: प्रतिनिधी। गोवन वार्ता |
28th March, 10:07 am
आठवीपासून होते प्रेम; लग्नानंतर पुन्हा जुळले सूत, केला खून

मडगाव : बाणावली येथील विश्वनाथ सिधनलच्या खूनप्रकरणी कोलवा पोलिसांनी त्याची पत्नी वैभवी उर्फ मंगल सिधनल हिच्यासह तिचा प्रियकर सूरज मायगेरी (कडोळी, बेळगाव) यांना बुधवारी अटक केली. प्रेमसंबंधात अडथळा ठरत असल्याने सहा महिन्यांपूर्वी कट रचून हा खून केल्याचे पोलीस तपासात स्पष्ट झाले.

पेडा बाणावली येथे भाड्याच्या खोलीत मंगळवारी खुनाची घटना घडली. शंकर सिधनल यांनी मुलाचा विश्वनाथ सिघनल (३५, रा. लोंढा कर्नाटक) याचा खून झाल्याची तक्रार कोलवा पोलिसांत दिली. पोलीस घटनास्थळी आल्यावर विश्वनाथ याचा मृतदेह रक्ताच्या थारोळ्यात पडलेला दिसला. पोलीस चौकशीत मूळ कर्नाटक येथील विश्वनाथ सिधनल हा गोव्यात कुटुंबियांसह भाड्याच्या घरात राहत होता. तो टाईल्स फिटींगचे काम करत असल्याचेही समजले. पोलिसांनी पंचनामा केला. फॉरेन्सिक तज्ज्ञांच्या पथकाने पुरावे गोळा केले. याप्रकरणी विश्वनाथची पत्नी वैष्णवी ऊर्फ मंगल हिला पोलिसांनी ताब्यात घेतले.
दक्षिण गोवा पोलीस अधीक्षक सुनीता सावंत यांनीही घटनास्थळाला भेट दिली. मृतदेहाची स्थिती पाहून हा खून एका दिवसापूर्वीच झाल्याचे दिसते, असे त्यांनी स्पष्ट केले. पोलिसांनी चौकशीअंती बुधवारी दुपारी खूनप्रकरणी पत्नी वैष्णवी हिला अटक केली. तिला सात दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. पोलिसांच्या चौकशीत सोमवारी पहाटे मंगला मुलासह एका व्यक्तीसोबत दुचाकीवरून गेल्याचे समजले. त्यानुसार तपास केला असता, प्रेमसंबंधातील अडथळा ठरत असल्याने विश्वनाथला मारल्याचे पोलिसांना समजले. या प्रकरणी पोलीस अधीक्षक सुनीता सावंत व उपअधीक्षक सलीम शेख यांच्या मार्गदर्शनाखाली कोलवा पोलीस निरीक्षक सतीश पडवळकर व सहकार्‍यांनी ही कारवाई केली.

प्रेमसंबंधात बाधा ठरत असल्यानेच काढला काटा

अधीक्षक सुनीता सावंत म्हणाल्या, विश्वनाथ पत्नी मंगला व पाच वर्षाच्या मुलासह भाड्याच्या घरात राहत होता. सूरज मायगेरी व मंगलाचे इयत्ता आठवीपासून एकमेकांवर प्रेम होते. सूरज खालच्या जातीचा असल्याने मंगलाच्या कुटुंबियांनी लग्नाला नकार देत विश्वनाथसोबत लग्न लावून दिले. दरम्यान, सूरजचेही लग्न झाले. त्याची पत्नी मुकी व बहिरी होती. दोघेही संसारात असमाधानी होते. इन्स्टाग्रामवरून दोघांचे प्रेम पुन्हा फुलले. सहा महिन्यांपूर्वी प्रेमात बाधा ठरत असलेल्या विश्वनाथचा काटा काढण्याचे ठरवले. २४ रोजी रात्री सूरज त्याच्याकडे आला. विश्वनाथ व त्यांनी मद्यपान केले. जेवण करून ते झोपले. विश्वनाथ झोपलेला असताना जड वस्तूने त्याच्या डोक्यावर वार करत त्याला मारले. २५ रोजी पहाटे मंगला व त्याच्या मुलाला घेऊन सूरज विश्वनाथच्या दुचाकीवरून पळून गेला होता, असे तपासात पुढे आले.

हेही वाचा