उच्च न्यायालयाचे न्यायाधीश करणार स्मार्ट सिटीच्या कामांची पाहणी

अॅडव्होकेट जनरलनी दिला कामांचा आढावा : निर्देशांची अंमलबजावणी करण्याचे आदेश


28th March, 12:19 am
उच्च न्यायालयाचे न्यायाधीश करणार स्मार्ट सिटीच्या कामांची पाहणी

स्मार्ट सिटीअंतर्गत पणजीत सुरू असलेले रस्त्याचे काम.
प्रतिनिधी । गोवन वार्ता
पणजी : पणजीतील स्मार्ट सिटीच्या कामामुळे नागरिकांना होणाऱ्या अडचणीची माहिती घेण्यासाठी गोवास्थित मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायाधीश १ एप्रिल २०२४ रोजी सायंकाळी पाच वाजता पाहणी करणार आहेत. दरम्यान, राज्य सरकारने वाहतूक व्यवस्था, रस्ता सुरक्षा आणि धूळ प्रदूषण रोखण्यासाठी जारी केलेल्या निर्देशांची योग्य अंमलबजावणी करण्याचा आदेश न्यायालयाने जारी केला आहे.
स्मार्ट सिटी प्रकल्पांमुळे होणारी गैरसोय आणि धुळीचे प्रदूषण कमी करण्यासाठी सरकार आणि इमॅजिन पणजी स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन लि. (आयपीएससीडीएल) यांना तातडीने निर्देश द्यावे, अशी विनंती करणारी जनहित याचिका पियुष पांचाल, आॅल्विन डिसा आणि नीलम नावेलकर या तिघांनी उच्च न्यायालयात दाखल केली आहे. त्यानंतर दाखल झालेली दुसरी याचिका पणजीतील ख्रिस्तस लोपीस आणि सदानंद वायंगणकर यांनी दाखल केली आहे. या दोन्ही याचिकांत पणजीत स्मार्ट सिटीअंतर्गत सुरू असलेल्या कामांमुळे तीन नागरिकांचा मृत्यू झाला आहे. याशिवाय भोंगळ आणि बेपर्वाईने सुरू असलेल्या कामांचा स्थानिकांना त्रास सहन करावा लागत असल्याचा दावा करण्यात आला आहे.
स्मार्ट सिटीच्या कामांमुळे गेल्यावर्षी पावसाळ्यात पणजीकरांचे हाल झाले होते. यंदा मान्सून सुरू होण्यापूर्वी स्मार्ट सिटीची कामे पूर्ण न झाल्यास गेल्यावर्षी सारखीच स्थिती होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. या संदर्भात न्यायालयाने सुनावणी घेऊन सरकारला वाहतूक व्यवस्था, रस्ता सुरक्षा आणि धूळ प्रदूषण रोखण्यासाठी काय उपाययोजना आखल्या याची सविस्तर माहिती देण्यास सांगितले होते. त्यानुसार, बुधवारी सुनावणीवेळी अॅडव्होकेट जनरल देवीदास पांगम यांनी न्यायालयाला स्मार्ट सिटीअंतर्गत सुरू असलेल्या कामांच्या स्थितीचा सविस्तर आढावा दिला.
पणजीतील स्मार्ट सिटीच्या सुरू असलेल्या कामांची स्थिती ऐकल्यानंतर न्यायालयाने गोवा राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळ (जीएसपीसीबी), याचिकादार, तसेच महानगरपालिका व इतर अधिकाऱ्यांना पुढील पाच दिवस स्मार्ट सिटी कामासंदर्भात समन्वय साधून परिसरातील धूळ प्रदूषणाचे मोजमाप करावे. या कालावधीत धूळ प्रदूषण कमी करण्यासाठी, नागरिकांची सुरक्षा, तसेच वाहतूक व्यवस्था यावर भर द्यावा, असे निर्देश जारी केले आहेत. १ एप्रिल २०२४ रोजी सायंकाळी उच्च न्यायालयाचे न्यायाधीश पणजीत सुरू असलेल्या स्मार्ट सिटीच्या कामांची पाहणी करणार आहेत, अशी माहितीही न्यायालयाने दिली आहे. या प्रकरणाची पुढील सुनावणी २ एप्रिल रोजी घेण्यात येणार आहे.
अॅडव्होकेट जनरलनी दिलेला स्मार्ट सिटीच्या कामांचा आढावा
सांडपाणी वाहिनीचे काम ८५ टक्के पूर्ण करण्यात आले आहे.
काही ठिकाणी खोदकाम सुरू असल्यामुळे तेथे धूळ प्रदूषणाची शक्यता आहे.
धूळ प्रदूषण रोखण्यासाठी दिवसातून दोनदा टँकरने पाण्याचा मारा केला जात आहे.
१ एप्रिलपासून रस्त्यावरील धूळ काढण्याचे काम हाती घेतले जाणार आहे.
कामे सुरू असलेल्या ठिकाणी तीन दिवसांत वाहतूक व इतर संदर्भात सूचना फलक लावले जाणार आहेत.
काम सुरू असलेल्या रस्त्यावरील वाहतूक पर्यायी मार्गाने वळवली आहे.
तेथे गोंधळ टाळण्यासाठी वाहतूक पोलिसांची नियुक्ती करण्यात आली आहे.
नागरिकांच्या सुरक्षेसाठी काम सुरू असलेला रस्ता बंद ठेवण्यात येत आहे.
अपघात टाळण्यासाठी त्या ठिकाणी बॅरिकेड लावण्यात येत अाहे.
राज्य सरकारकडून ३१ मेपर्यंत स्मार्ट सिटीची कामे पूर्ण करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
आवश्यकतेनुसार अतिरिक्त मनुष्यबळ व इतर व्यवस्था करण्यास कंत्राटदाराला सांगितले आहे.

हेही वाचा