वणवा रोखण्यासाठी व्हॉट्सअॅपचा प्रभावी वापर

वन खात्याचा पुढाकार : जिल्हाधिकारी, पोलीस, अग्निशामक अधिकाऱ्यांची समिती स्थापन


28th March, 12:11 am
वणवा रोखण्यासाठी व्हॉट्सअॅपचा प्रभावी वापर

प्रतिनिधी। गोवन वार्ता
पणजी : मागील वर्षी राज्यभरातील जंगलात लागलेल्या आगीच्या घटनांची पुनरावृत्ती होऊ नये, यासाठी वन खाते सज्ज झाले आहे. खात्याकडून आग रोखण्यासाठी व्हॉट्सअॅपसारख्या समाज माध्यमाचा प्रभावीपणे वापर करण्यात येत आहे. आगीची सूचना देण्यासाठी खात्याअंतर्गत व्हॉट्सअॅप ग्रुप तयार केले आहेत. ग्रुपद्वारे घटनेची माहिती आणि छायाचित्रे संबधित अधिकाऱ्यांपर्यंत पोहोचवली जात आहे. यामुळे अशा घटना तात्काळ रोखणे शक्य होणार आहे.
याबाबत कार्य नियोजन विभागाचे उपवन संरक्षक नंदकुमार परब यांनी सांगितले की, उन्हाळ्यातील आगीच्या घटना रोखण्यासाठी नोव्हेंबरपासूनच काम सुरू झाले आहे. यासाठी तयार करण्यात आलेल्या समितीच्या ठरावीक काळाने बैठका घेण्यात येत आहेत. या समितीमध्ये वन अधिकाऱ्यांसह जिल्हाधिकारी, पोलीस, अग्निशामक दलाच्या अधिकाऱ्यांचा समावेश आहे. बैठकीत आगीच्या घटना रोखण्यासाठीच्या उपाययोजनांचा आढावा घेण्यात येतो.
आगीच्या घटना रोखण्यासाठी कर्मचाऱ्यांना विशेष प्रशिक्षण देण्यात आले आहे. जंगलातील संवेदनशील भागात मॉक ड्रिल्स घेण्यात येत आहेत. येथे पोलीस खात्यासोबत पेट्रोलिंग सुरू आहे. आग रोखण्यासाठी बिटर, ब्लोअर अशी उपकरणे वापरण्यात येत आहेत. याशिवाय खात्यातर्फे स्थानिकांत तसेच सीमेपलीकडील रहिवाशांमध्ये जागृती केली जात आहे. त्यांना जंगलात आग लागू नये यासाठी कोणती काळजी घ्यावी, याबाबत माहिती दिली जात असल्याचे परब यांनी सांगितले.
संकेतस्थळावर आगीचे ‘रिअल टाईम अलर्ट’
वन खात्याने कर्मचाऱ्यांना, तसेच सामान्य जनतेला जंगलातील आगीची तात्काळ माहिती मिळावी यासाठी खात्याच्या अधिकृत संकेतस्थळावर ‘रिअल टाईम फायर अलर्ट’ यंत्रणा सुरू करण्यात आली आहे. याद्वारे वन क्षेत्रातील आगीची माहिती मॅपवर दिसू शकते. तसेच त्या भागात असणाऱ्या अधिकाऱ्यांची माहितीदेखील मिळते.
जागृतीसाठी समाजमाध्यमांचा वापर
आगीच्या घटना टाळण्यासाठी वन खात्याने कोकणी आणि इंग्रजी भाषांतील फ्लायर तयार केले आहेत. यामध्ये नागरिकांना आगीच्या घटनांची माहिती देण्याचे आवाहन करण्यात आले आहे. खात्यातर्फे हे फ्लायर विविध समाजमाध्यमांत शेअर केले जात आहेत.            

हेही वाचा