पर्यटनमंत्री रोहन खंवटे : राजकारण करू देणार नाही
पणजी : शॅक मालकांशी चर्चा करूनच नवे शॅक धोरण ठरवले आहे. मात्र आता काही जण त्यामध्ये राजकारण आणून त्याला विरोध करत आहेत. कदाचित त्यांना सबलेटिंग करायचे असेल म्हणूनच ते नव्या शॅक धोरणाला विरोध करत असल्याची शंका पर्यटनमंत्री रोहन खंवटे यांनी उपस्थित केली. मंगळवारी पणजीत पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
खंवटे म्हणाले, धोरण बनवण्यापूर्वी शॅक मालकांशी अनेक वेळा चर्चा झाली आहे. ते बैठकीत सर्व काही मान्य करतात. मात्र दोन दिवसांनी पुन्हा विरोध करतात. यापूर्वी आम्ही अनुभवी शॅक मालकांना ८०, तर नव्या लोकांना २० टक्के शॅक देणार होतो. या प्रस्तावाशी ते सहमत झाले होते. मात्र नंतर त्यांनीच ९० आणि १० टक्क्यांची मागणी केली. ती मान्य झाल्यावर आता पुन्हा याच गोष्टीला ते विरोध करत आहेत.
शॅक मालकांचे खरोखर काही प्रश्न असतील, तर आम्ही ते सोडविण्यासाठी तयार आहोत. यासाठी चर्चा करण्यासही तयार आहोत. मात्र कोणी तरी राजकारण करण्यासाठी त्यांचे कान भरत असतील तर ते आम्ही मान्य करणार नाही. यामध्ये राजकारण करू देणार नाही. उद्या कदाचित हेच शॅक मालक बाहेरच्यांना नको, तर गोवेकर व्यक्तीला सबलेटिंग करू द्या, अशी मागणी करतील. मात्र आम्ही असे अजिबात होऊ देणार असल्याचे खंवटे यांनी स्पष्ट केले.
हरित पर्यटनाला प्रोत्साहन
खंवटे यांनी सांगितले की, खात्याने राज्याच्या अंतर्गत भागात पर्यटन पोहोचविण्यासाठी ‘किनाऱ्यापलीकडील गोवा’ ही संकल्पना आणली. ही संकल्पना हरित पर्यटनाला प्रोत्साहन देण्याच्या दिशेने हे एक पाऊल आहे. तसेच ती शाश्वत पर्यटनासाठीही उपयुक्त ठरणारी आहे.