बापरे! माध्यान्ह आहारात सापडल्या अळ्या; केरी, सावईवेरे येथील प्रकार!

एफडीएकडून गंभीर दखल; आहार पुरवणाऱ्या संस्थांवर कारवाईचा इशारा

Story: प्रतिनिधी । गोवन वार्ता |
26th September, 01:56 pm
बापरे! माध्यान्ह आहारात सापडल्या अळ्या; केरी, सावईवेरे येथील प्रकार!

सावईवेरे भागात अळ्या आढळलेला माध्यान्ह आहार.

फोंडा : सावईवेरे भागात शाळेत मुलांना दिल्या जाणाऱ्या माध्यान्ह आहारात मंगळवारी चक्क अळ्या आढळल्या. हा प्रकार फोंडा तालुक्यातील केरी आणि सावईवेरे येथे घडला असून आहार पुरवणाऱ्या स्वयंसेवी संस्थांवर कारवाई करण्याचा इशारा शिक्षण खात्याने दिला आहे. अन्न व औषध प्रशासनाच्या (एफडीए) अधिकाऱ्यांनी माध्यान्ह आहाराचे नमुने गोळा करून तपासणीसाठी नेले आहेत.            

मंगळवारी सकाळी मंगेशी येथील महिला उत्कर्ष स्वयंसाहाय्य गटातर्फे सुमारे ४० विद्यालयांत माधान्ह आहार पुरवण्यात आला होता. या आहारात अळ्या असल्याचे काही विद्यार्थ्यांच्या निदर्शनास आले. माहिती मिळताच फोंडा तालुक्याचे भाग शिक्षण अधिकारी अमिता तळावलीकर  यांनी अन्न व औषध प्रशासनाच्या अधिकाऱ्यांसोबत विद्यालयात दाखल झाल्या. अधिकाऱ्यांनी माध्यान्ह आहाराचे नमुने गोळा करून तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठवले. मंगेशी येथील स्वयंसाहाय्य गटाच्या स्वयंपाक घरात भेट देऊन त्यांनी तपासणीही केली. अन्न व औषध प्रशासनाचा अहवाल मिळाल्यानंतरच स्वयंसेवी संस्थेवर कारवाई होण्याची शक्यता आहे.


मंगेशी येथे स्वयंपाक घराची तपासणी करणारे अधिकारी.            

सावईवेरे भागातील घाणो, सावई, सातेरी भाट, कोणीर, वळवई, केरी व अन्य भागातील सरकारी प्राथमिक विद्यालयांत माध्यान्ह आहारात विध्यार्थ्यांना अळ्या आढळून आल्या, असे चौकशीत स्पष्ट झाले आहे. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, सोमवारी स्वयंसेवी संस्थेच्या पदाधिकाऱ्यांना सोयाबीन काही प्रमाणात कमी पडत होते. त्यामुळे माध्यान्ह आहार तयार करण्यासाठी म्हार्दोळ येथील दुकानातून ते खरेदी केले होते. या सोयाबीनमध्येच काहीतरी गडबड असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.

केरी आणि सावईवेरे येथील शाळांना माध्यान्ह आहार पुरवण्याचे काम तीन स्वयंसेवी संस्था करतात. त्यांनी आहार दिल्यानंतर तपासणी करत असताना त्यात अळ्या असल्याचे समोर आले आहे. याबाबत आपण भागशिक्षणाधिकाऱ्यांना अहवाल देण्यास सांगितले आहे. अहवाल मिळाल्यानंतर तिन्ही स्वयंसेवी संस्थांवर कारवाई केली जाईल.

— शैलेश झिंगडे, शिक्षण संचालक


हेही वाचा