आंदोलक कुस्तीपटूंवर पोलिसी बळाचा वापर

साक्षी, बजरंग, फोगट भगिनींसह अनेकजण ताब्यात : जंतरमंतरवरील तंबू हटवला


29th May 2023, 12:52 am
आंदोलक कुस्तीपटूंवर पोलिसी बळाचा वापर

कुस्तीपटू साक्षी मलिकला ताब्यात घेताना पोलीस.

न्यूज डेस्क । गोवन वार्ता

नवी दिल्ली : दिल्लीत नव्या संसदेचे लोकार्पण होत असतानाच आंदोलन करणाऱ्या कुस्तीपटूंवर भर रस्त्यात बळाचा वापर करून आंदोलन मोडीत काढण्यात आले. या घटनेवरून काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी पंतप्रधानांवर टीका केली. 

दिल्ली पोलिसांनी आंदोलन करणाऱ्या कुस्तीपटूंना ताब्यात घेण्याचा प्रयत्न केल्यानतंर झटापट झाली. बॅरिकेट्स ओलांडून पैलवान नवीन संसदेच्या दिशेने कूच करत असतानाच पोलिसांनी त्यांना रोखत बजरंग पुनिया, विनेश-संगिता फोगट, साक्षी मलिक यांना ताब्यात घेतले व रात्री उशिरा साेडून देण्यात आले.

दिल्ली पोलिसांनी एवढ्यावरच न थांबता जंतर-मंतरवरील तंबू, खुर्च्या आणि इतर वस्तू हटवून आंदोलन मोडीत काढले. विनेश आणि संगीता फोगट यांना दिल्लीतील कालकाजी पोलीस ठाण्यात नेण्यात आले. गेल्या ३४ दिवसांपासून जंतरमंतरवर आंदोलन करणारे कुस्तीपटू नव्या संसदेसमोर होत असलेल्या महिला महापंचायतीत सहभागी होणार होते. मात्र, दिल्ली पोलिसांनी या महापंचायतीला परवानगी दिली नाही. परवानगी नाकारल्यानंतरही पैलवानांनी महापंचायत आयोजित करून संसदेच्या दिशेने कूच करण्यास सुरुवात केली होती. यावेळी पोलिसांनी कुस्तीपटूंवर बळाचा वापर केला.

पोलिसांकडून सिंघू, टिकरी सीमा बंद

महापंचायतीत हरियाणा, उत्तरप्रदेश आणि पंजाबसह अनेक राज्यांतील शेतकरी मोठ्या संख्येने पोहोचण्याची शक्यता लक्षात घेऊन दिल्ली पोलिसांनी सिंघू आणि टिकरी सीमा बंद केली होती. दिल्लीतील केंद्रीय सचिवालय आणि उद्योग भवन मेट्रो स्टेशनची एंट्री आणि एक्झिट बंद केली होती. हरियाणातील सोनीपतजवळ सिंघू सीमेवरील शाळेत तात्पुरते कारागृह करण्यात आले होते. हरियाणा पोलिसांनी रविवारी सकाळी खाप प्रतिनिधी आणि शेतकरी नेत्यांना ताब्यात घेतले होते.

ही लोकशाही आहे का ? आम्ही शांततेने आंदोलन करत आहोत. आमच्याशी अशी वागणूक होत आहे. आम्हाला गोळ्या घाला.

— बजरंग पुनिया, कुस्तीपटू

हेही वाचा