उत्पल पर्रीकरांच्या सडेतोड भूमिकेमुळे भाजप गोटात खळबळ

रोखण्याचे युद्धपातळीवर प्रयत्न; पणजीसह राज्यभरात फटका बसण्याची भीती

|
15th January 2022, 12:29 Hrs
उत्पल पर्रीकरांच्या सडेतोड भूमिकेमुळे भाजप गोटात खळबळ

फोटो : उत्पल पर्रीकर
प्रतिनिधी। गोवन वार्ता
पणजी : पणजीतील भाजप उमेदवारीसंदर्भात माजी मुख्यमंत्री स्व. मनोहर पर्रीकर यांचे सुपुत्र उत्पल पर्रीकर यांनी गुरुवारी मांडलेल्या सडेतोड भूमिकेमुळे आमदार बाबूश मोन्सेरात यांच्यासह भाजप गोटातही खळबळ माजली आहे. भाजपच्या एकाही ज्येष्ठ नेत्याने अद्याप याबाबतची आपली भूमिका स्पष्ट केलेली नाही. आता उत्पल पर्रीकरांना रोखायचे कसे असा एकच प्रश्न भाजप नेत्यांसमोर उभा राहिला आहे, अशी माहिती प्रदेश भाजपच्या ज्येष्ठ नेत्याने शुक्रवारी ‘गोवन वार्ता’शी बोलताना दिली.
माजी मुख्यमंत्री स्व. मनोहर पर्रीकरांचे भाजपच्या जडणघडणीत मोठे योगदान आहे. परंतु, पर्रीकर किंवा भाजप नेत्याचा पुत्र हा भाजप उमेदवारीचा निकष होऊ शकत नाही. निवडणुकीसाठी उमेदवारी देताना भाजपमध्ये कर्तृत्वाचा विचार होतो, असे वक्तव्य भाजपचे निवडणूक प्रभारी देवेंद्र फडणवीस यांनी बुधवारी उत्पल पर्रीकरांसंदर्भात केले होते. त्यानंतर या वक्तव्यावर बोलताना, मनोहर पर्रीकर यांच्या पणजी मतदारसंघात भाजप गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या व्यक्तीला उमेदवारी देत असेल तर आम्ही घरी बसावे का, जिंकण्याची क्षमता, चारित्र्य, प्रामाणिकपणा याला काही किंमत नाही का, असे सवाल उपस्थित करत गोव्यातील राजकीय स्थिती फार गंभीर आहे. त्यामुळेच आपण भाजप उमेदवारीसाठी प्रयत्न करत होतो, असे प्रत्युत्तर उत्पल पर्रीकर यांनी भाजपचे निवडणूक प्रभारी देवेंद्र फडणवीस यांना दिले. शिवाय, भाजपने अजून पणजीतील उमेदवारी जाहीर केलेली नाही. उमेदवारी जाहीर झाल्यानंतर आपण ​योग्य निर्णय घेऊ. १९९४ पासून पर्रीकरांसोबत काम करणारे भाजपचे पणजीतील कार्यकर्ते आपल्यासोबत आहेत, असा सूचक इशाराही त्यांनी दिला होता.
उत्पल पर्रीकरांनी अचानक आक्रमक पवित्रा घेतल्यानंतर प्रदेश भाजपच्या सर्वच ज्येष्ठ नेत्यांमध्ये खळबळ माजली असून, त्यांच्याकडून उत्पल पर्रीकरांना रोखण्याचे जोरदार प्रयत्न सुरू असल्याचीही माहिती सूत्रांकडून प्राप्त झाली आहे.
...................................................
बाबूश यांना मतविभाजनाची भीती
भाजपने पणजीची उमेदवारी आपल्याला दिल्यास उत्पल पर्रीकर अपक्ष म्हणून पणजीतून निवडणूक लढवू शकतात. तसे झाल्यास भाजप मतांचे विभाजन होऊन त्याचा फटका आपल्याला बसेल आणि काँग्रेसच्या उमेदवाराला आयती संधी मिळेल, याचा अंदाज बाबूश मोन्सेरात यांनी बांधला आहे. त्यामुळे त्यांनी कोणत्याही परिस्थितीत उत्पल पर्रीकर यांना रोखावे अशी मागणी पक्षाकडे लावून धरली असल्याची माहितीही सूत्रांनी दिली.