ब्रम्हांड लेखिका फकीताई

Story: प्रा. अदिती बर्वे/ इंग्रजी विभाग प्रमु |
19th September 2021, 12:36 am

कमलाकांतच्या बायकोने गोड बातमी सांगितल्यापासून कमलाकांत मीरगिकरच्या आनंदाला पारावर उरला नव्हता. सुनेवर सदैव आगपाखड करणारी त्याची आई द्रोपदीही बदलून गेली होती. गावभर हिंडून बायकांना बिहेविअरल सायन्सवर लेक्चर देणाऱ्या द्रोपदीने घरात मात्र सुनेला सांगून टाकले की मनाला येईल तसं वाग. (नंतर सुनेला समजलं की मनाला येईल तसं म्हणजे द्रोपदीच्या मनाला येईल तसं) 

त्या दिवशीच तर तिने जानू ससाण्याच्या सुनेला फैलावर घेतले होते. तिला अर्वाच्च शिव्या देत जानू ससाण्याच्या दारात हैदोस घालत असताना नेमका कमलाकांत तिथून जात होता. “काय गे आवय? जालां काय?” “तू वच कमलाकांत. ही अवदसा गावांत कशी रवता त्ती बगतंय ...” 

“तू पयली स्कूटरीर बस...”

द्रोपदी पतिव्रता असल्याने ती स्कूटरवर बसली नाही. पातिव्रत्त्याचे आधुनिक नियम मांडण्यात तिचा हात धरणारं कुणीच नव्हतं. मुलगा ताशी अडीज किलोमीटरच्या स्पीडने स्कूटर चालवत आईच्या मागून घरी आला. त्याला भारी उत्सुकता होती की जानूच्या सुनेचे लफडे नेमके कोणासोबत होते. त्याला या गोष्टीचेही वाईट वाटत होते की त्याचा नेम कसा चुकला! जानूची सून सुंदर होती आणि नीटनेटकी रहायची. जानूचा मुलगा गोपाळ फारच नशीबवान होता. गोपाळ आणि गंगीचा संसार मस्त चालला होता. गंगीबद्दल आता काहीतरी गौप्यस्फोट होणारेय या कल्पनेनेच कमलाकांत सुखावून गेला होता. हे गुपित कुणाकुणाला सांगायचे, याची एक यादीही त्याने मनातल्या मनात बनवली.

“आवय.... गंगीन किते केले गे?” 

“फटकेचो वाखो इलो तिचेर..... चाळेगत आसा ती....”

“ह्य गे.... केला काय?”

“ भांग....”

“का sssssssय भांग पियाली?’ (कमलाकांतच्या मनात कल्पनाचित्र तरळू लागले की गंगी भांग प्यायली आहे आणि कालच पाहिलेल्या ‘आप की कसम’ मधील मुमताझ सारखी ‘जय जय शिव शंकर’ म्हणून त्याच्यासोबत बेफाम नृत्य करत आहे. कमलाकांत स्वत:ला राजेश खन्नाच समजायचा.) 

“वशाडी पडली तुज्या तोंडार.... आयकान घेवचो ना मेलो... xxचो ..” आईच्या शब्दसुमनांच्या वर्षावाने राजेश खन्नाचा क्षणार्धात कमलाकांत झाला. आपण बीए केले असते तर कदाचित चित्रपटातल्या ‘मां’सारखी आपली आवयही गोड असती या एका गोष्टीसाठी कमलाकांतला न शिकल्याची खंत होती.

“सांग आवय....सांग तरी.. भांग पियाली गे गंगी ?”

“अरे भांग काडी नासताना केस विंचरी होती सटवी..... सवाष्णीन पयली कसो? केसांक भांग काडुक व्हयो. उब्भे केस बांधतत ती बायला नसतंत .”

कमलाकांत खजील झाला. आईच्या त्या वाक्यासरशी त्याच्या मुमताझचं लगेच गंगीत परिवर्तन झालं होतं. केसांना भांग न पाडणं हा त्याच्या दृष्टीने अदखलपात्र गुन्हा होता. द्रोपदीसाठी मात्र तो एखादी स्त्री ही स्त्रीच नसल्याचा भक्कम पुरावा होता बहुतेक.

“बायलां नसतंत तर काय गंगी दाद्लो तर गे आवय ?

“तोंड बंद कर. बायल न्हू ....डाकीण आसा ती.... झुड्तर मेलां....हरभूत .....गो नर्मदा....तू तेच्या झळकेक रवां नको....”

कमलाकांतच्या पत्नीने मान डोलावली. द्रोपदीने आखलेल्या पातिव्रत्याच्या अनेक निकषांवर नर्मदाला रोजच खरं उतरावं लागे. ती गरोदर असल्याचे कळल्यापासून मात्र द्रोपदी थोडीशी नरम झाली होती. त्यात तिच्या शेजारणीने जेव्हा तिला सांगितले की फटी परत येतोय, तेव्हापासून तर ती भलतीच खुशीत होती. फटीचे म्हणजे कमलाकांतच्या बापाचे निधन झाल्यापासून द्रोपदी बिथरली होती. 

पूर्वी दर चवथीला ती गणपतीसमोर तिची आवडती ‘गणपती देवा’ ही फुगडी घालायची. त्यात- 

कपाळाचं कुंकू..

दे जल्मभरी आणि काय मागीन रे 

देवा...

आणि काय मागीन रे 

असं आळवायची. पण गणपती बाप्पाने काही ते फारसं मनावर घेतलं नाही, त्यामुळे तिने विठोबाची भक्ती सुरु केली. तिचे काही फटीवर प्रेम होते अशातला भाग नाही, पण फटी असताना त्याच्यावर डाफरण्याचा आनंद तिला मिळायचा. सणवार असले की दागिने घालून मिरवता यायचं. शुभ कार्यात विधवांनी अडथळा आणू नये यासाठी आपणच जागरूक असलं पाहिजे असं तिला तेव्हा वाटायचं. पण याचा थांगपत्ता तिने फटीला कधी लागू दिला नाही. उलट फटीचा काळा रंग आणि द्रोपदीच्या नजरेतून असलेले त्याचे एकंदर कुरूप व्यक्तिमत्व यावरून द्रोपदी त्याला घालून पडून बोलायची. रंग-रूप हे काही माणूस सज्जन असल्याचे मोजमाप नसावे. तशी द्रोपदीही काही अप्सरा नव्हती, पण टाईमपास करण्यासाठी ती असल्या गोष्टींचा पुरेपूर वापर करून घेई. अशा द्रोपदीला आता काही काम उरले नव्हते. 

आता, पातिव्रत्त्याचे नवनवे निकष, हा एकमेव दोन नंबरचा विरंगुळा तिच्या आयुष्यांत उरला होता. पहिला विरंगुळा होता चहाड्या करणे. भांडणे लावायची आणि मजा पहायची म्हणजे काही खायचे काम नाही त्यासाठी केवढं प्लानिंग लागतं ते तिलाच माहीत होतं. सुनेला तरी किती छळणार.... ते करून ती पार थकली होती. नर्मदा नवी नवरी असताना द्रोपदीने छळण्याच्या सगळ्या योजनांचा पुरेपूर फायदा घेतला होता. पण नर्मदाला तिच्या वागण्याचे काहीच वाटेनासे झाल्यावर द्रोपदीचा छळण्यातला इंटरेस्टच संपला. 

‘सामकी पेज मगो तू.... तुका कायय म्हटला तर कायच म्हणानय ... आता आमचे हे आसत तुज्या पोटांत. हे कशे...मिर्चेची फकी कशे तिखट होते.... तेंचा नशीबच मेलां फुटक्या... असली झाम्ळू सखाराम आवय मिळाली तेंका ...’ असं दु:ख बिचारी द्रोपदी व्यक्त करायची.

पण नर्मदाच्या पोटी फटी येणार असल्याचे तिने निश्चित केले त्या दिवसापासून द्रोपदीच्या अंगात वेगळेच चैतन्य संचारले होते . त्या दिवशी तर ती - 

‘गेला दरिया पार घरधनी sssss गेला दरिया पार...’

असं गाणं म्हणून त्यावर मुरके मारून नाचत होती. गाव फिरून थकलेला कमलाकांत घरात प्रवेश करतानाच समोर द्रोपादीचे पदलालित्य पाहून अचंबित झाला आणि आई नाचतेय हे सत्य लक्षात आल्यावर शॉक खाऊन खाली बसला. नर्मदाने त्याला पाणी दिलं आणि म्हणाली - “तुम्ही घाबरू नका. हल्ली आई रोजच नाचतात.... आज गाणं वेगळं आहे. काल ‘पाणीयासी कैसी आता एकटी मी जाऊ... हे गाणं म्हणून घर डोक्यावर घेतलं होतं. ‘पाणीयासी कैसी आता’ या गाण्यावर नृत्त्य करणं सोपं नव्हतं. त्या काळातले दशावतारी नाटकातले मोठमोठे कलाकारच हे शिवधनुष्य लीलया पेलायचे. आज कुणाला मी काय म्हणतेय ते जाणून घ्यायचे असेल तर मयूर गवळी यांचे ‘भाव अंतरीचे हळवे किंवा पप्पू घाडीगावकरांचे ‘घन घन माला नभी दाटल्या’ हे लंगार बघावे. द्रोपादीची एकंदर ताकद आणि डान्स स्टेप्स तुमच्या लक्षात येतील.

तसं कुठली बाई किंवा कुणाची आई जरी नाचली, तरी कमलाकांतला त्याबद्दल काही वाटले नसते, पण त्याची आई नाचतेय म्हणजे एक तर त्याचे डोळे किंवा आईचा मेंदू यांपैकी काहीतरी एक बिघडलंय हे नक्की.

मुलाला पाहून द्रोपदी वरमली. पदन्यास आवरते घेऊन गाणं बदललं आणि ‘पंढरेच्या पांडुरंगा विठ्ठला रे ssssss’ म्हणत स्वयंपाकघरात पळाली. 

नातवाला यांचेच नाव ठेवायचे असे तिने कमलाकांतला हजारदा ऐकवले होते. मुलाच्या जन्माने नर्मदाची अनेक जन्मांची पापं कशी नष्ट होणार होती, हेही तिने नर्मदाला ऐकवले होते. द्रोपदीच्या सहवासात खरं तर मागच्या काय, पुढच्या जन्मीची पापंही आधीच धुतली गेली आहेत, असं नर्मदाला वाटायचं, पण तिने तसं बोलून दाखवलं नाही.

आता सर्वजण फटी मीरगिकरची वाट पाहत होते.