२५ जणांना अटक व सुटका

काँग्रेस कार्यकर्त्यांचा मुख्यमंत्र्यांच्या बंगल्यावर मोर्चा


31st July 2021, 12:00 am
२५ जणांना अटक व सुटका

आल्तिनो येथील मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी आंदोलनात सहभागी झालेल्या काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना ताब्यात घेताना पोलीस.

प्रतिनिधी। गोवन वार्ता
पणजी : बाणावली किनाऱ्यावर मागील आठवड्यात दोन अल्पवयीन मुलींवर बलात्कार झाला. या घटनेवरून विधानसभा अधिवेशनात मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी केलेल्या विधानावर त्यांनी माफी मागण्यासाठी काँग्रेस पक्षाने मुख्यमंत्र्यांच्या आल्तिनो येथील बंगल्यावर धडक मोर्चा नेला. या प्रकरणी पणजी पोलिसांनी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष गिरीश चोडणकर यांच्यासह २५ जणांना अटक केली. अटक करण्यात आलेल्यांची रात्री उशिरा प्रत्येकी १० हजार रुपयांच्या वैयक्तिक जामिनावर सुटका करण्यात आली आहे.
बाणावली किनाऱ्यावर मागील आठवड्यात दोन अल्पवयीन मुलींवर बलात्कार करण्यात आले होते. या घटनेचे पडसाद विधानसभा अधिवेशात पडले. त्यावेळी मुख्यमंत्री डाॅ. प्रमोद सावंत उत्तर देताना म्हणाले की, ‘अल्पवयीन मुलांच्या आई-वडिलांनी आपली मुले रात्री कुठे जातात, याकडे लक्ष दिले पाहिजे.’ या वक्तव्याची दखल घेऊन काँग्रेस पक्षाने मुख्यमंत्र्यांच्या विधानाबाबत माफी मागण्यासाठी आल्तिनो येथील बंगल्यावर धडक मोर्चा नेला. यात प्रदेशाध्यक्ष गिरीश चोडणकर यांच्यासह युवा अध्यक्ष वरद म्हार्दोळकर, महिला अध्यक्ष बिना नाईक, एनएसयुआयचे अध्यक्ष नौषाद चौधरी यांसह इतर कार्यकर्ते उपस्थित होते.
दरम्यान, विधानसभा अधिवेशन सुरू असल्यामुळे जमावबंदी असताना मोर्चा काढल्याप्रकरणी पणजी पोलिसांनी प्रदेशाध्यक्ष गिरीश चोडणकर यांच्यासह २५ जणांना शांतता भंग केल्याप्रकरणी फौजदारी दंड संहितेच्या कलम १५१ नुसार कारवाई करून अटक केली आहे. त्यानंतर त्यांना दोनापावला येथील पोलीस चौकीवर नेऊन रितसर अटक करण्यात आली. त्यानंतर तिसवाडी न्यायदंडाधिकाऱ्यांने शुक्रवारी रात्री उशिरा सर्वांना १० हजार रुपयांच्या वैयक्तिक जामिनावर सुटका करण्यात आली.            

हेही वाचा