अधिवेशनात आज पोगो बिल मंजूर करा !

रिव्हॉल्युशनरी गोवन्सची पत्रकार परिषदेत मागणी

|
30th July 2021, 01:03 Hrs
अधिवेशनात आज पोगो बिल मंजूर करा !

फोटो : पत्रकार परिषदेत बोलताना रिव्हॉल्युशनरी गोवन्सचे मनोज परब. सोबत पदाधिकारी.
प्रतिनिधी। गावन वार्ता
पणजी : अधिवेशनात एकाही आमदाराने पोगो बिल मान्य करण्याचा प्रश्न मांडला नाही. यासाठी आम्ही मुख्यमंत्र्यांना २० हजार लोकांच्या हस्ताक्षरांचे निवेदन दिले आहे. हे बिल शुक्रवारी अधिवेशनात मंजूर करावे, अशी मागणी रिव्हॉल्युशनरी गोवन्सतर्फे पत्रकार परिषदेद्वारे करण्यात आली. २०१९ साली पोगो बील पास करण्यासाठी आमदारांना निवेदन दिले होते. अद्यापही याबाबत काहीच झालेले नाही म्हणून आम्ही पुन्हा सरकारला हे निवेदन दिले आहे.
आमदारांना बाहेरील लोकांना गोव्यात स्थायिक करून आपली मतपेढी वाढवायची आहे. राज्यात मोठ्या संख्येने बाहेरील लोक स्थायिक झाले आहेत. या पोगो बिलात राज्यात २० डिसेंबर १९६१ पासून स्थायिक असलेल्या कुटुंबांनाच मूळ गोमंतकीयांचा दर्जा द्या. त्यांना सरकारी नोकऱ्या द्या, खासगी नोकऱ्यांत ८० टक्के आरक्षण ठेवा, सरकारी योजना द्या, अशा मागण्या केल्या आहेत. मात्र याकडे सर्वच आमदारांनी दुर्लक्ष केले आहे. आगामी निवडणुकीत आम्ही सर्व मतदारसंघांतून उमेदवार उतरवणार आहोत. २७ मतदारसंघांत आमचे कार्य सुरू आहे. उर्वरित १३ मतदारसंघांत लवकरच उमेदवार निवडणार आहोत. आम्ही कुणाबरोबरच युती करणार नाही, असेही मनोज परब यांनी यावेळी सांगितले.