तंबाखूजन्य पदार्थ प्रकरणी मुरगावात कारवाई

अंमलबजावणी पथकाकडून शहरी भागात तपासणी, जागृतीही


22nd June 2021, 10:14 pm
तंबाखूजन्य पदार्थ प्रकरणी मुरगावात कारवाई

सिगारेट व इतर तंबाखूजन्य पदार्थाविरोधात जागृती करताना रोनाल्ड मार्टिन्स, अवेलिना डिसा ई परेरा, दयानंद ठक्कर, हनुमंत मांद्रेकर व इतर. (अक्षंदा राणे)    

प्रतिनिधी। गोवन वार्ता
वास्को : सिगारेट व इतर तंबाखूजन्य पदार्थ अधिनियम २००३ च्या कलम चारचे उल्लंघन केल्याप्रकरणी मुरगाव तालुका अंमलबजावणी पथकाने काही आस्थापने व दुकानदारांविरोधात कारवाई करताना २ हजार रुपयांचा दंड वसूल केला. सिगारेट व इतर तंबाखूजन्य पदार्थ अधिनियम २००३चे उल्लंघन होते काय यासंबंधी अंमलबजावणी पथकाने शहर भागात तपासणी केली. त्यावेळी काही ठिकाणी अधिनियमाचे उल्लंघन करण्यात येत असल्याचे नजरेस आले.
गोवा कॅनचे समन्वयक रोनाल्ड मार्टिन्स, मुरगाव तालुक्याच्या संयुक्त मामलेदार अवेलिना डिसा ई परेरा, मुरगाव मामलेदार कार्यालयाचे तलाठी हनुमंत मांद्रेकर, वास्को आरोग्य केंद्राचे स्वच्छता निरीक्षक दयानंद ठक्कर तसेच पोलीस कर्मचारी यांच्या पथकाने सोमवारी वास्को शहरातील काही ठिकाणी भेटी देऊन पाहणी केली. त्यावेळी काही आस्थापनामध्ये सिगारेट व इतर तंबाखूजन्य पदार्थ अधिनियम २००३ अंतर्गत ध्रूमपान न करणाऱ्याविषयी योग्य चिन्ह योग्यप्रकारे दर्शविले नसल्याचे आढळून आले. यासंबंधी दक्षिण गोवा जिल्हाधिकारी कार्यालयाला माहिती देण्यात येणार आहे. तसेच ज्यांनी अधिनियमाचे उल्लंघन केले आहे त्यांच्याविरोधात कारवाई करण्यासंबंधी अहवाल देण्यात येईल.
मुरगाव तालुका अंमलबजावणी पथकाने वास्को रेल्वे स्थानकाचे व्यवस्थापक रामदास गुडमाने व दक्षिण पश्चिम रेल्वेचे क्षेत्रिय अधिकारी श्रेया सिंग यांची भेट घेतली. सिगारेट व इतर तंबाखूजन्य पदार्थ अधिनियम २००३च्या चार कलमानुसार पार्सल बुकिंग काऊंटर, प्लॅटफॉर्म, रेस्ट रुम येथे प्रलंबित धूम्रपान चिन्हे लावण्यासंबंधी चर्चा केली. यासंबंधी दक्षिण पश्चिम रेल्वे अधिकारी वर्गाने वास्को, कासावली रेल्वे स्थानकांवर नियम पालन होते की नाही यासंबंधी एका महिन्यामध्ये अनुपालन अहवाल सादर करावा. तो अहवाल पुढील कारवाईकरिता दक्षिण गोवा जिल्हाधिकारी कार्यालयाकडे पाठविण्यात येईल.
दरम्यान, वास्को रेल्वे स्थानकाला तंबाखू मुक्त विभाग घोषित करण्याचा प्रस्ताव असून त्यासाठी आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालयाच्या निर्देशानुसार तेथे खास फलक उभारण्यात येणार आहेत. तसेच दक्षिण गोवा जिल्हाधिकारी रुचिका काटयाल यांच्या अध्यक्षतेखाली होणाऱ्या बैठकीत आढावा घेण्यात येणार आहे.