Goan Varta News Ad

वेर्णात आठ दिवसांचा लॉकडाऊन घोषित

कुठ्ठाळी पंचायत क्षेत्रात सात दिवस बंद

|
04th May 2021, 12:50 Hrs

प्रतिनिधी। गोवन वार्ता
वास्को : कोविडच्या दुसऱ्या लाटेमुळे करोना रुग्णांची संख्या वाढू लागल्याने वेर्णा पंचायत मंडळाने आपल्या पंचायत क्षेत्रामध्ये आठ दिवसांचे लॉकडाऊन घोषित केले आहे. तर कुठ्ठाळी पंचायतीने काही महत्त्वाचे व्यवहार सात दिवस बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. नागरिकांनी स्वतःच्या व इतरांच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी लॉकडाऊनला व व्यवहार बंदला सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
वेर्णा पंचायत क्षेत्रामध्ये कोविड प्रकरणे वाढू लागल्याने पंचायतीने ४ ते ११ मे असा आठ दिवसांचा लॉकडाऊन घोषित केला आहे. किराणा मालाची दुकाने व इतर दुकाने सकाळी ६ ते १० वाजेपर्यंत उघडी राहतील, असे सरपंच मारी लोरेन फर्नांडिस आफोन्सो मिनेझिस यांनी कळविले आहे. कोविडच्या पहिल्या लाटेप्रसंगी वास्कोमध्ये सर्वात अधिक कोविड रुग्ण सापडले होते. परंतु, दुसऱ्या लाटेचा विचार केला तर मुरगाव तालुक्यातील कुठ्ठाळी प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये रविवारी (दि.२) १,३४६ रुग्णांची नोंद झाली होती. कासावली प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये ९१३, तर वास्को प्राथमिक केंद्रामध्ये ७११ रुग्णांची नोंद झाली होती. वाढत्या रुग्ण‍ संख्येमुळे बरेचजण काळजी व्यक्त करीत आहेत. परंतु, काहीजण अद्याप कोविडच्या दुसऱ्या लाटेला गंभीरपणे घेत नाहीत.
नागरिकांना सहकार्य करण्याचे आव्हान
कुठ्ठाळी पंचायत मंडळाने कोविड रुग्णांच्या वाढत्या संख्येबद्दल काळजी व्यक्त केली आहे. कोविडचा प्रसार रोखण्यासाठी मंडळाने काही उपाययोजना हाती घेतल्या आहेत. नागरिकांनी एकत्र येऊ नये, जमाव करू नये यासाठी पंचायत क्षेत्रातील सर्व रेस्टाॅरंट, हॉस्टेल, बार, कॉफी दुकाने, कँटिन, हातगाड्यावरून विविध खाद्यपदार्थांची होणारी विक्री ३ मे ते ९ पर्यंत पूर्णपणे बंद राहणार आहे. हॉटेल व रेस्टाॅरंटमधील टेक-वे पद्धत सुरू राहील, असे स्पष्ट करण्यात आले असून ग्रामस्थांनी या निर्णयाला पूर्णपणे सहकार्य करावे, असे आवाहन कुठ्ठाळीच्या सरपंच सेनिया परेरा यांनी केले आहे.