कदंब स्थानकांवरील दुकाने यापुढे गोवेकरांनाच

मुख्यमंत्री : निविदेत रहिवासी दाखला सक्तीचा करणार

Story: प्रतिनिधी । गोवन वार्ता |
25th October 2020, 11:46 pm
कदंब स्थानकांवरील दुकाने यापुढे गोवेकरांनाच

पणजी : कदंब स्थानकांवरील दुकानगाळे यापुढे गोवेकरांनाच मिळतील, असे धोरण ठेवले जाईल. ही दुकाने मिळवण्यासाठी निविदा भरतानाच रहिवासी दाखला बंधनकारक केला जाईल, अशी ग्वाही मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी दिली.
कदंब परिवहन महामंडळाचा चाळीसावा वर्धापनदिन रविवारी साजरा करण्यात आला. या कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून मुख्यमंत्री बोलत होते. याप्रसंगी वाहतूक मंत्री मॉविन गुदिन्हो, महामंडळाचे अध्यक्ष आमदार कार्लुस आल्मेदा, व्यवस्थापकीय संचालक वेनान्सियो फुर्तादो, सरव्यवस्थापक संजय घाटे आदी पदाधिकारी व्यासपीठावर उपस्थित होते.
येत्या डिसेंबरपासून राज्यात कदंबच्या इलेक्ट्रीक बसेस धावतील. अर्धवट बसस्थानकांची कामे मार्च २०२१ पर्यंत पूर्ण होतील. या बसस्थानकांवर सुसज्ज कँटीन, स्वच्छतागृह, प्रशस्त आसन व्यवस्था असेल, असे मुख्यमंत्री यावेळी म्हणाले. गोमंतकीयांना रोजगार उपलब्ध व्हावा, यासाठी जास्तीत जास्त गाळे बांधले जातील. तसेच ग्रामीण भागांतून प्रत्येक औद्योगिक वसाहतींपर्यंत बससेवा सुरू होतील. यातून महामंडळाचे उत्पन्न वाढेल. रोजगाराचा प्रश्न सुटे, उद्योगांनाही चालना मिळेल, असेही ते म्हणाले. राज्यातील तीन बसस्थानके वापराविना आहेत. तत्कालीन राजकारण्यांच्या चुकांमुळे या बसस्थानकांचा वापर होत नाही, असा आरोपही मुख्यमंत्र्यांनी यावेळी केला.
याप्रसंगी आमदार आल्मेदा यांचे समयोचित भाषण झाले. फुर्तादो यांनी स्वागत केले. घाटे यांनी सूत्रनिवेदन केले.

डिसेंबरपर्यंत राज्यात २५ इलेक्ट्रिक बसेस दाखल होतील. अशाप्रकारे केंद्र सरकारने १०० बसेस मंजूर केल्या आहेत. या व्यतिरिक्त राज्य सरकार आणखी १०० इलेक्ट्रिक बसेस खरेदी करेल. डिझेलचा खर्च कमी करण्याचा सरकारचा प्रयत्न आहे. सर्व खासगी बसेसही ताब्यात घेऊन चालवण्याचा महामंडळाचा विचार आहे. - मॉविन गुदिन्हो, वाहतूकमंत्री