गोव्यात सप्ताहाच्या शेवटी ९ पर्यटकांना बुडताना वाचवले

जर्मनी,रशियातील पर्यटकांचा समावेश

Story: वेब डेस्क। गोवन वार्ता |
just now
गोव्यात सप्ताहाच्या शेवटी ९ पर्यटकांना बुडताना वाचवले

पणजी : सप्ताहाच्या शेवटी गोव्यातील (Goa) समुद्रकिनाऱ्यांवर (Goa Beaches) ९ पर्यटकांना (Tourist) बुडताना वाचवले. विविध समुद्रकिनाऱ्यांवर तैनात केलेल्या जीवरक्षकांनी (lifesavers) ही कामगिरी केली. वाचवण्यात आलेल्या पर्यटकांमध्ये जर्मनी व रशिया येथील पर्यटकांचा समावेश आहे. 

समुद्रकिनारे, दूधसागर (Dudhsagar) दबदब्यावरील पर्यटकांचा त्यात समावेश आहे. उतोर्डा समुद्रात समुद्रस्नानाचा आनंद लुटताना एक जर्मनीची महिला पर्यटक जखमी झाली. जीवरक्षकांनी तिला समुद्रातून बाहेर काढले व प्रथमोपचार केले व नंतर वैद्यकीय उपचारासाठी पाठवले.

केरी येथे बंगळुरू येथील २९ वर्षीय युवक समुद्राच्या जोरदार लाटांमध्ये वाहून जात होता. जीवरक्षकांनी पाहिल्यावर त्यांनी या युवकाला बाहेर काढले. धाकू तळकर व आकाश टक्केकर या जीवरक्षकांनी त्यात भाग घेतला.

मोरजी येथे तिघांना वाचवण्यात आले. मुंबई येथील दोन २४ वर्षांचे इसम व एक २३ वर्षीय महिला समुद्रात ७० मीटर आत वाहून जात होते. महादेव गावडे व योगेश गडेकर या जीवरक्षकांनी त्यांना सुखरूप बाहेर काढले.

कांदोळी येथे एक रशियन मुल हरवले. या मुलाला शोधून काढून त्याच्या पालकांकडे सोपवण्यात आले. आरोसी येथे एक रशियन महिला समुद्राच्या लाटांच्या प्रवाहात सापडली. तिला पोहता येत नसल्याने बुडू लागली. जीवरक्षकांनी तिला सुरक्षित बाहेर काढले. 

आगोंद, काणकोण येथे जोरदार लाटांच्या प्रवाहात सापडलेल्या चार पुणे येथील पर्यटकांना जीवरक्षकांनी बाहेर काढले. दूधसागर येथे ३५ वर्षांच्या हैदराबाद येथील दगडावर पडून जखमी झालेल्या पर्यटकावर जीवरक्षकांनी प्रथमोपचार केले. 

दरम्यान, पर्यटकांनी खोल समुद्रात जाऊन आपले प्राण संकटात न घालता सुरक्षित रहावे व गोव्यातील पर्यटनाची मजा लुटावी, असे आवाहन जीवरक्षकांनी केले आहे.

हेही वाचा