पोलिसांची कामगिरी खूप मोठी; दरोडेखोरांवर कडक कारवाई व्हावी : सागर नायक यांची मागणी

वास्को : बायणा-वास्को येथील व्यावसायिक सागर नायक यांच्या घरावर पडलेल्या सशस्त्र दरोड्याचा अखेर छडा लागला आहे. गोवा पोलिसांनी हे आव्हान स्वीकारत, या प्रकरणात ओडिशा येथील पाच जणांना मुंबईतून अटक केली आहे. या सर्व संशयितांना आज बुधवार, २६ नोव्हेंबर रोजी गोव्यात आणले जाणार असून, त्यानंतर दरोड्याबद्दलची संपूर्ण माहिती उघड केली जाईल, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. दरम्यान दरोडेखोरांना सर्व माहिती पुरवणारा हा त्याच इमारतीत राहणारा एक व्यक्ती असून तो सध्या ओडिशात असल्याची प्राथमिक माहिती समोर आल्याचे मुरगावचे आमदार संकल्प आमोणकर म्हणाले.

नेमकी घटना काय?
बायणा येथील चामुंडी आर्केड इमारतीत सहाव्या मजल्यावरील सागर नायक यांच्या फ्लॅटवर सोमवारी १७ नोव्हेंबर रोजी मध्यरात्री अडीच वाजण्याच्या सुमारास सहा ते सात जणांच्या टोळीने दरोडा टाकला होता. दरोडेखोरांनी सोन्या-चांदीचे दागिने आणि रोकड असा सुमारे ३५ लाखांचा मुद्देमाल लंपास केला. दरोडेखोरांनी सागर नायक यांच्यासह त्यांची पत्नी हर्षा आणि मुलगी नक्षत्रा यांनाही मारहाण केली होती. हा दरोडा भरवस्तीतील इमारतीत पडल्यामुळे वास्कोवासीय भीतीच्या छायेत होते आणि कायदा व सुव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले होते. डीआयजी वर्षा वर्मा यांनी या गुन्ह्याचा तपास एक आव्हान म्हणून स्वीकारला होता.

तपासाची दिशा आणि अटक
दरोडेखोरांना फ्लॅटची आणि परिसराची पूर्ण माहिती होती. त्यांनी दाराऐवजी खिडकीची काच फोडून प्रवेश केला, तसेच तिजोरीची माहिती असल्याने आणि नायक यांच्याच कारमधून पळ काढल्याने, हे कृत्य परिचितांचेच असावे, असा पोलिसांचा कयास होता. या अनुषंगाने पोलिसांनी नायक यांच्याशी संबंधित चाळीसहून अधिक जणांची चौकशी केली होती.
सरकार आणि पोलिसांवर पहिल्यापासून ठाम विश्वास होता : सागर नायक
प्रूडंट मिडियाचे वास्को प्रतिनिधी विक्रम नाईक हे प्रकरणाचा सुरुवातीपासून पाठपुरावा करत आहेत. त्यांनी सागर नाईक यांच्या घरी जाऊन त्यांची भेट घेतली. मला भेटायला अनेक जण आले, त्यांनी अनेक प्रतिक्रिया दिल्या, पोलीस सरकारवर वेळ काढूपणाचे धोरण राबवल्याचे आरोपही केले. पण, माझा गोवा सरकार आणि पोलिसांवर पहिल्यापासून ठाम विश्वास होता. ते सुरुवातीपासूनच आमच्या संपर्कात होते. क्षणाक्षणाची अपडेट त्यांनी आम्हाला दिली. आता दरोडेखोर हाती लागलेत याचे समाधान आहे, त्यांच्यावर आता सरकारने कडक कारवाई करावी अशी प्रतिक्रिया पीडित सागर नायक यांनी दिली.
.. तपासाबाबत माहिती उघड केली असती तर, दरोडेखोरांनी पोबारा केला असता : निरीक्षक जॅकिस
दरम्यान, याचवेळी वास्कोचे पोलीस निरीक्षक शरीफ जॅकिस हे देखील तेथे उपस्थित होते. त्यांनी देखील एकंदरीत प्रकरणावर प्रतिक्रिया दिली. घटनेचे गांभीर्य पाहता लोकांचा रोष योग्यच आहे. कुणी काय बोलावे, कसे बोलावे यावर कुणाचे नियंत्रण नाही. पण, तपासाच्या मुळापर्यंत जाण्यासाठी प्रत्येकाने मेहनत घेतली आहे. पोलीस गुन्हेगारांच्या मागावर पहिल्यापासून होते, पण तपासाचे डिटेल्स उघड केले असते तर दरोडेखोरांनी पुन्हा पोबारा केला असता. अनेक पथके गुन्हेगारांच्या मागावर होती. तपासाला गती मिळाली आणि आज सर्व दरोडेखोरांना ताब्यात घेण्यात यश आले, याचे समाधान आहे, असे ते म्हणाले.
त्यांना गोव्यात आणल्यानंतरच काय ते बोलू : मुख्यमंत्री
दरम्यान, पत्रकारांनी मुख्यमंत्र्यांना दरोडेखोरांच्या अटकेसंदर्भात प्रश्न विचारले असता, बायणा येथील दरोड्याचा छडा लागला आहे. संशयितांना गोव्यात आणल्यानंतरच संपूर्ण माहिती उघड केली जाईल, असे ते म्हणाले.
पोलिसांची स्तुत्य कामगिरी : संकल्प आमोणकर, आमदार, मुरगाव.
दरोडेखोरांनी कोणताही पुरावा मागे ठेवलेला नसतानाही बायणातील दरोड्याचा छडा लावण्यात पोलिसांना यश. त्यांनी केलेले काम कौतुकास्पद आहे. यामुळे नायक कुटुंबीयांसह मुरगावातील जनतेला मोठा दिलासा मिळाला आहे, असे मुरगावचे आमदार संकल्प आमोणकर म्हणाले.
या दरोड्यात एकूण आठ जणांचा हात असून, त्यापैकी पाच जणांना अटक झाली आहे. दरोडेखोरांना सर्व माहिती पुरवणारा हा त्याच इमारतीत राहणारा एक व्यक्ती असून तो सध्या ओडिशात असल्याची प्राथमिक माहिती समोर आल्याचे मुरगावचे आमदार संकल्प आमोणकर म्हणाले. संशयितांना गोव्यात आणल्यानंतर या कटामागील सर्व माहिती उघड होईल, असे आमोणकर यांनी सांगितले.
यापूर्वी विरोधी पक्षांकडून पोलिसांवर तसेच आमदार म्हणून माझ्यावरही दोषारोप केले जात होते. परंतु, आमदाराला फार काही करता येत नाही. पोलिसांनी दरोड्याचा छडा लावून उत्तम कामगिरी केली आहे, असेही आमोणकर यावेळी म्हणाले.
वास्कोतील ५२ सीसीटीव्ही कॅमेरे कुचकामी
या दरोडा प्रकरणानंतर वास्कोतील कायदा व सुव्यवस्थेसोबतच येथील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची दयनीय अवस्थाही उघड झाली आहे. वास्को शहरातील मोक्याच्या जंक्शनवर २०१३ मध्ये खासदार निधीतून बसवण्यात आलेले ५२ सीसीटीव्ही कॅमेरे देखभालीअभावी गेल्या दहा वर्षांपासून बंद पडले आहेत. ही कॅमेरा यंत्रणा कुचकामी ठरल्यामुळे, गुन्हेगार आणि नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांची ओळख पटवणे पोलिसांना शक्य होत नाही.

वास्कोसारख्या बंदराच्या शहरात मजबूत सीसीटीव्ही यंत्रणा असणे अत्यंत महत्त्वाचे आहे. सध्या पोलिसांना तपासासाठी खासगी आस्थापनांच्या सीसीटीव्हीचा वापर करावा लागतो, ज्यात अनेक मर्यादा आहेत. सध्या बंद असलेले हे कॅमेरे दुरुस्त करण्यासाठी अनेक वेळा सांगूनही नगरपालिका किंवा प्रशासनाने लक्ष दिलेले नाही, अशी खंत पोलीस सूत्रांनी व्यक्त केली. वास्को शहरात सक्षम सीसीटीव्ही यंत्रणा कार्यान्वित करणे हाच गुन्हेगारी नियंत्रणाचा प्रभावी तोडगा आहे, असे पोलिसांचे म्हणणे आहे.