एआय टूलमध्ये आपल्याच ज्ञानाचे प्रतिबिंब - शंकर रामकृष्णन

Story: प्रतिनिधी।गोवन वार्ता |
14 mins ago
एआय टूलमध्ये आपल्याच ज्ञानाचे प्रतिबिंब - शंकर रामकृष्णन

पणजी : एआय टूलला (AI Tool) तुम्ही जेवढ्या तपशीलवार माहिती द्याल त्याचप्रमाणे तुम्हाला चांगले परिणाम मिळतील. एआय हे एखाद्या आरशाप्रमाणे काम करत असतात.

त्यामध्ये तुमच्या ज्ञानाचे प्रतिबिंब दिसत असते असे मत मल्याळी चित्रपट दिग्दर्शक शंकर रामकृष्णन यांनी व्यक्त केले. मंगळवारी गोव्यात (Goa) इफ्फीमधील (IFFI) मास्टरक्लास (Master class) विभागात ते बोलत होते.

यावेळी एआय चित्रपट (AI Film) निर्माते व्ही. मुरलीधरन आणि दिग्दर्शक शेखर कपूर उपस्थित होते. तत्पूर्वी महोत्सवातील एआय विभागात निवडल्या गेलेल्या चित्रपटांचे प्रदर्शन करण्यात आले.

शंकर म्हणाले की, एआय तंत्रज्ञान झपाट्याने बदलत आहे. दर दोन आठवड्याला यामध्ये नवीन भर पडत आहे.

सध्या एआय तंत्रज्ञानाने चित्रपट बनवण्यात काही मर्यादा आहेत. एआयकडून नेमके काय हवे आहे हे त्याला सांगितल्यास काम नक्कीच चांगले होते. 

भविष्यात एआयद्वारे केले जाणारे काम अधिक सुलभ होणार आहे. सध्या विनामूल्य एआय टूल वापरून साधारपणे ८ सेकंदाचे चांगले दृष्य (शॉट) मिळते.

व्यावसायिक दर्जाचे टूल वापरून ही दृश्य आणखीन जास्त काळासाठी वाढवता येतात. एआयचा वापर करून शैक्षणिक चित्रपट बनवण्याचा आमचा विचार आहे.

व्ही मुरलीधरन म्हणाले की, एआय चित्रपटात तुम्हाला लोकेशनवर जाऊन चित्रिकरण करण्याची गरज नाही.

यामुळे ही पद्घत खूप किफायतशीर ठरत आहे. एआयचा वापर करून आम्ही २ मिनिटांचा लघुपट तयार केला.

यामध्ये सुरूवातीला काही अडचणी आल्या तरी नंतर यामध्ये काम करणे सोपे झाले. सध्या, भारतीय चित्रपट सृष्टीसाठी आवश्यक असणारे एआय मोड्युल  उपलब्ध नसले तरी भविष्यात ते होतील. 

मात्र त्याचा वापर करताना कॉपीराईट अथवा इंटेलेक्चुअल प्रॉपर्टी कायद्याचा भंग होणार नाही याची काळजी घेतली पाहिजे. 

एआयच्या वापराने होणार नवे रोजगार

कोणतेही नवीन तंत्रज्ञान आल्यावर यामुळे लोकांच्या नोकऱ्या जातील अशी भीती निर्माण झाली होती. संगणक आल्यावर देखील असेच झाले होते. मात्र नंतर संगणकाचा आधार घेऊन नवीन रोजगार निर्मिती झाली. भविष्यात लोक एआयच्या तंत्रज्ञानाचा अभ्यास करून त्याद्वारे निर्माण होणाऱ्या रोजगार संधी घेतील असे मत शेखर कपूर यांनी व्यक्त केले.

हेही वाचा