‘जय गंगे भागीरथी’ सारख्या अजरामर पदांनी रसिकमनावर गाजवले होते अधिराज्य

पणजी : मराठी संगीत रंगभूमीवर आपल्या अद्भूत गायकीने आणि कसदार अभिनयाने तब्बल पाच दशकांहून अधिक काळ अधिराज्य गाजवणारे ज्येष्ठ गायक-नट पद्मश्री पंडित प्रसाद सावकार (वय ९८) यांचे निधन झाले. पणजीत करंजाळे येथील त्यांच्या राहत्या घरी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या निधनाने मराठी नाट्यसृष्टी आणि संगीत क्षेत्रावर शोककळा पसरली आहे. त्यांच्या पार्थिवावर गुरुवारी सकाळी १०:३० वाजता अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.

१४ डिसेंबर १९२८ रोजी बडोदे (गुजरात) येथे गोमंतकीय संगीत रंगभूमीवरील नामवंत सावकार घराण्यात त्यांचा जन्म झाला. त्यांचे पूर्ण नाव सांबप्रसाद रघुवीर सावकार असे होते. त्यांचे वडील रघुवीर सावकार हे स्त्रीभूमिकांसाठी प्रसिद्ध असलेले प्रख्यात गायक-नट होते. वडिलांच्या 'रंगबोधेच्छु नाट्यसमाज' या संस्थेत बालपणापासून वावर असल्याने प्रसाद सावकार यांच्यावर लहान वयातच संगीत आणि नाटकाचे संस्कार झाले. वडिलांच्या 'जिंजीहून सुटका' या नाटकात बाल शिवाजीची भूमिका साकारून त्यांनी रंगभूमीवर पदार्पण केले. त्यानंतर शिक्षणासाठी म्हापसा (गोवा) येथे चुलते दत्ताराम सावकार यांच्याकडे आल्यावरही त्यांच्यातील सांगीतिक गुणांना अधिक वाव मिळाला. 'संशयकल्लोळ' नाटकात एकाच वेळी कृत्तिका, साधू, जलशातील गायक आणि वैशाख शेठ अशा चार भूमिका करून त्यांनी एक अनोखा विक्रम रचला होता.

१९६० ते १९७२ या काळात मराठी रंगभूमीवर संगीत नाटक परंपरेचे जे पुनरुज्जीवन झाले, त्या पर्वाचे पंडित प्रसाद सावकार हे मुख्य शिलेदार होते. विद्याधर गोखले यांच्या 'पंडितराज जगन्नाथ' या नाटकात त्यांनी गायलेली ‘जय गंगे भागीरथी’ आणि ‘सावन घन गरजे’ ही नाट्यपदे कमालीची लोकप्रिय झाली. विशेषतः ‘जय गंगे’ या पदाने लोकप्रियतेचा कळस गाठला आणि त्यांना श्रेष्ठ गायक-नट म्हणून अढळ स्थान मिळवून दिले. याशिवाय 'सुवर्णतुला' नाटकातील कृष्ण, 'मंदारमाला' मधील मदनगोपाळ, आणि 'कट्यार काळजात घुसली' या अजरामर नाटकात 'सदाशिव'ची भूमिका साकारत पंडित जितेंद्र अभिषेकी यांच्यासोबत गायलेले ‘घेई छंद’ हे पद प्रचंड गाजले. 'अवघा रंग एकचि रंग' (२००८) हे त्यांचे भूमिका असलेले अखेरची नाटक ठरले.
त्यांचा भरदार आवाज, स्पष्ट शब्दोच्चार आणि श्रवणमधुर गायकीमुळे त्यांच्या गाण्यांनी रसिकांच्या मनावर कायमचे गारुड केले. त्यांनी श्रेष्ठ गायक छोटा गंधर्व यांना आपले श्रवणगुरू मानले होते. कलाक्षेत्रातील त्यांच्या या अतुलनीय योगदानासाठी केंद्र सरकारने २००६ मध्ये त्यांना 'पद्मश्री' या नागरी पुरस्काराने गौरवले होते. याव्यतिरिक्त त्यांना बालगंधर्व सुवर्णपदक, संगीतभूषण राम मराठे स्मृती पुरस्कार, गोवा शासनाचा कलावंत पुरस्कार, मास्टर दीनानाथ मंगेशकर पुरस्कार आणि लता मंगेशकर पुरस्कार अशा अनेक मानाच्या पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले होते.
