संभाव्य पाणी टंचाईच्या पार्श्वभूमीवर गोव्यात इतरत्रही वाया जाणारे पाणी रोखण्याची मागणी

पणजी : जून महिना अर्धा संपला तरी गोव्यात (Goa) पावसाने जोर न धरल्याने; धरणातील पाणीसाठा संपत चालला आहे. त्यामुळे भीषण पाणी टंचाईला सामोरे जाण्याचा धोका आहे. मात्र, दुसरीकडे गोव्यात काही ठिकाणी पेयजल खात्यातर्फे पुरवठा करण्यात येणारे नळाचे पाणी वाया जात असल्याचे दिसून येत आहे. सांगोल्डा, चोगम रस्ता परिसरात अशाच एका नळाचे पाणी गेल्या कित्येक दिवसांपासून वाया जात असल्याच्या समस्येवर येथील एका जागृत नागरिकाने प्रकाश टाकला आहे. यासंदर्भातील व्हिडिओ सध्या मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.
सांगोल्डा येथे नळाचे पाणी उघड्यावर वाहत असल्याचे व्हिडीओत स्पष्ट दिसत आहे. माहिती देणाऱ्या इसमाचे म्हणणे आहे की, गेल्या कित्येक दिवसांपासून सांगोल्डा येथे निवडणुकीच्या वेळी मतदान केंद्र म्हणून वापर केल्या जाणाऱ्या वास्तु बाहेर असलेल्या नळाचे पाणी वाहत आहे. या नळाला मीटरही नाही. मात्र, त्याच्याकडे कुणाचेच लक्ष नाही.
पाण्याचा आवाज ऐकून आपण ते पाहिले व याठिकाणी येऊन नळ बंद केला. एकीकडे पाऊस नसल्याने धरणातील पाणीसाठा संपत चालला आहे. वाढत्या गरमीमुळे लोकांची स्थिती बिकट बनली आहे. परिस्थिती अशीच राहिल्यास पाण्याची भीषण टंचाई भासण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
अशा परिस्थितीत पेय जल खात्यामार्फत पुरवठा केले जाणारे पाणी असे वाया जाऊ देणे योग्य आहे का? असा प्रश्न व्हिडीओतून उपस्थित करण्यात आला आहे. सरकार एका बाजूला पाण्याचा जपून वापर करण्याचे आवाहन करीत आहे.
दुसऱ्या बाजूला सरकारतर्फे पुरवठा केले जाणारे पाणी वाया जात आहे. सांगोल्डा येथे वाया जाणारे पाणी कायमचे बंद करावे व नळ असा सुरू ठेवलेल्यांवर कारवाई करावी. तसेच गोव्यात इतरत्र कुठे पाणी वाया जाते; त्याची पाहणी करून आवश्यक उपाययोजना कराव्यात; अशी मागणी व्हिडीओतून करण्यात आली आहे.
पेय जलमंत्री सुभाष फळदेसाई यांनी याकडे लक्ष देऊन आवश्यक उपाययोजना करावी, अशी मागणी व्हिडीओतून करण्यात आली आहे.