उत्तर गोवा रेंट-अ-कार संघटनेची मागणी; बेकायदेशीर गाड्यांमुळे अपघात, गुन्हेगारीत वाढ

पणजी : राज्यात मोठ्या प्रमाणात खासगी गाड्या आणि टॅक्सीच्या बनावट नंबर प्लेट लावून अनेक वाहने ‘रेंट-अ-कॅब’ म्हणून चालवल्या जातात. या बेकायदेशीर गाड्यांमुळे राज्यात अपघात आणि गुन्हेगारी घटनांमध्ये वाढ झाली आहे. मात्र, दोष रेंट-अ-कार चालकांवर येतो. त्यामुळे सरकारने अशा गाड्यांवर तातडीने कारवाई सुरू करावी, अशी मागणी उत्तर गोवा रेंट-अ-कॅब मालक संघटनेचे अध्यक्ष नितेश चोडणकर यांनी केली आहे.
रेंट-अ-कॅब संघटनेच्या शिष्टमंडळाने पणजी येथे वाहतूक खाते आणि अंमलबजावणी विभागाच्या अधिकाऱ्यांची भेट घेतली. या भेटीनंतर बोलताना चोडणकर यांनी बेकायदेशीर वाहतुकीचा मुद्दा मांडला. अनेक टॅक्सी त्यांच्या नंबर प्लेट्स बदलून, बनावट नंबर प्लेट लावून त्या स्वतःला ‘रेंट-अ-कार’ म्हणून भाड्याने देतात. पण त्या खऱ्या रेंट-अ-कार नाहीत, असे चोडणकर म्हणाले. सध्या वाढत असलेल्या गुन्हेगारी घटना आणि अपघातांमध्ये याच खासगी आणि बनावट नंबर प्लेट असलेल्या गाड्यांचा सहभाग असतो. मात्र, लोक बोटे रेंट-अ-कार मालकांकडे दाखवतात, अशी खंत त्यांनी व्यक्त केली.
चोडणकर यांनी सांगितले की, मद्यधुंद अवस्थेत गाडी चालवण्याचे प्रकार आता नियंत्रणात आले आहेत. कळंगुटसह आसपासच्या पोलीस ठाण्यांनी नाकाबंदी घातल्यामुळे 'रेंट-अ-कार' घेऊन वेगाने गाडी चालवणे किंवा दारू पिऊन गाडी चालवणे यावर नियंत्रण आले आहे. पण, खासगी गाड्यांवर कोणतीही कारवाई होत नाही. त्या बिनधास्तपणे भाड्याने चालतात, असा आरोप चोडणकर यांनी केला.
अधिकाऱ्यांचे कारवाईचे आश्वासन
नितेश चोडणकर यांनी दिलेल्या माहितीनुसार, अधिकाऱ्यांनी त्यांच्या गटासोबत बसून या गाड्यांवर कारवाई सुरू करण्याचे आश्वासन दिले आहे. चोडणकर यांनी राज्यात २ हजारांहून अधिक खासगी वाहने आणि बनावट नंबर प्लेट लावलेल्या गाड्या बेकायदेशीरपणे भाड्याने चालत असल्याचा दावा केला.