चार महिन्यांत राज्यात १४२ आगीच्या घटना

अग्निशमन दलाने वाचवली ३० कोटींपेक्षा अधिक मालमत्ता

Story: प्रतिनिधी। गोवन वार्ता |
05th October, 11:12 pm
चार महिन्यांत राज्यात १४२ आगीच्या घटना

पणजी : गोवा अग्निशमन दलाने जून ते सप्टेंबर २०२५ या ४ महिन्यांच्या कालावधीत एकूण १४२ आगीच्या घटना हाताळल्या. त्यापैकी १६ मोठ्या आगीच्या घटना होत्या. तसेच २,३०९ आपत्कालीन घटनाही दलाने यशस्वीपणे हाताळल्याची माहिती अग्निशामक दलाचे संचालक नितिन रायकर यांनी दिली.
अग्निशामन दलाच्या माहितीनुसार, १२ जून रोजी वास्को येथे रोहन आर्केडमधील क्लिनिकमध्ये आग लागली होती, ज्यात सुमारे ५ लाखांची मालमत्ता वाचवण्यात आली.
२३ जूनला जुने गोवा अग्निशमन केंद्राने आगशी तिसवाडी येथे दोन घरांवर पिंपळाचे पडलेले झाड हटविले. यात अग्निशमन दलाने सुमारे २० लाखांची मालमत्ता वाचवली.
२६ जुलैमध्ये श्री घाटेश्वर मंदिर, डांगी कॉलनी, म्हापसा जवळील एका घराला आग लागली. ज्यामध्ये अग्निशामन दलाने अंदाजे ५ लाख रुपयांची मालमत्ता वाचवली.
१८ ऑगस्ट रोजी कुंकळ्ळी येथील पार्शुराम मेटॉक्स फॅक्टरीमध्ये मोठी आग लागली होती, ज्यात ७९ लाख ४८ हजारांहून अधिक मालमत्ता वाचवण्यात आली.
१४ ऑगस्टला आसगाव येथील ‘असा हाऊस’ रेस्टॉरंट जवळील गोदामाला लागलेल्या आगीतून सुमारे १ कोटींचे सामान वाचवण्यास यश आले.
२३ सप्टेंबर रोजी साखळी बाजारातील दुकाने पेटल्याने मोठे नुकसान होण्याची शक्यता होती, मात्र अग्निशमन दलाने तत्परतेने कारवाई करून ३२ लाखांहून अधिक मालमत्ता वाचवली.
२९ सप्टेंबरला वास्को येथील थाकर हाऊसजवळील निवासी इमारतीत लागलेल्या आगीत १० लाखांची मालमत्ता वाचवली गेली.
याशिवाय, पर्रा, म्हापसा, वेर्णा, पिळर्ण, वास्को, नादोडा येथे झालेल्या विविध घटनांवर नियंत्रण मिळवण्यात अग्निशामक दल यशस्वी ठरले. तसेच नागरिकांच्या सहकार्यामुळे या सर्व घटनांतून मोठे अनर्थ टळले, अशी माहिती संचालक नितिन रायकर यांनी दिली.
२६२ जीवांना वाचविण्यात यश
जून ते सप्टेंबर २०२५ या चार महिन्यांत अग्निशमन दलाने २६२ जीवांना वाचविण्यात यश मिळवले असून कोणतीही जीवितहानी झाली नाही. दलाच्या कार्यक्षमतेमुळे आगीमधून सुमारे २५ कोटी ६२ लाख किमतीची मालमत्ता आणि इतर अपघातांमधून ४ कोटी ६८ लाख ९७ हजारांहून अधिक मालमत्ता वाचवण्यात यश आल्याचे अग्निशामक दलाचे संचालक नितिन रायकर यांनी सांगितले. 

हेही वाचा