पणजी: गोवा शिपयार्ड लिमिटेडमध्ये २५ एप्रिल २०२५ रोजी सकाळी ८ वाजता चक्रीवादळामुळे उद्भवणाऱ्या आपत्तींच्या व्यवस्थापनासाठी राज्यस्तरीय मॉक ड्रिलचे आयोजन करण्यात आले होते. या मॉक ड्रिलसाठी मुरगाव तालुक्याचे मामलेदार प्रविणजय पंडित यांची इन्सिडेंट कमांडर म्हणून नियुक्ती झाली होती.
चक्रीवादळामुळे गोवा शिपयार्डमधील मुख्य पायाभूत सुविधा कोसळून त्यात २६ कामगार अडकल्याचा कल्पित प्रसंग मॉक ड्रिल दरम्यान उभा करण्यात आला होता. अशा परिस्थितीत स्टँर्डड एसओपीत निर्धारित सुचनांच्या आधारे गोवा शिपयार्डच्या अधिकाऱ्यांनी मुरगाव तालुक्यातील मामलेदार कार्यालयाच्या नियंत्रण कक्षाशी संपर्क साधून मदतीची विनंती केली. यानुसार, मामलेदार प्रविणजय पंडित यांनी त्वरीत बचाव पथक सक्रिय केले. एनडीआरएफ, सैन्य, सीआयएसएफ आणि अग्निशमन दलाच्या अधिकाऱ्यांनी घटनास्थळी पोहोचून मदत कार्य सुरू केले. बचाव पथकांनी शिपबिल्डिंग साहित्याच्या ढिगाऱ्याखाली अडकलेल्या सर्व २६ कामगार सुरक्षितपणे बाहेर काढले.
यापैकी २ कामगार गंभीर जखमी झाले. त्यांना तत्काळ ऍम्ब्युलन्सद्वारे चिखलीच्या उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी हलवण्यात आले. उर्वरित २४ कामगारांना प्रथमोपचार दिल्यानंतर गोवा शिपयार्डमधील वैद्यकीय केंद्रात नेण्यात आले आणि नंतर त्यांना रिलीफ कॅम्पमध्ये स्थलांतरित करण्यात आले. या मॉक ड्रिलमुळे चक्रीवादळासारख्या नैसर्गिक आपत्तींच्या वेळी तात्काळ प्रतिसाद व समन्वय कौशल्य वाढविण्यावर भर देण्यात आला.