दयानंद कार्बोटकर, प्रभाकर गावकर भाजपचे नवे जिल्हाध्यक्ष

बिनविरोध निवड; शनिवारी होणार घोषणा

Story: प्रतिनिधी। गोवन वार्ता |
11th January, 12:27 am
दयानंद कार्बोटकर, प्रभाकर गावकर भाजपचे नवे जिल्हाध्यक्ष

पणजी : भाजपच्या उत्तर गोवा अध्यक्षपदी दयानंद कार्बोटकर, तर दक्षिण गोवा अध्यक्षपदी प्रभाकर गावकर यांची बिनविरोध निवड निश्चित झाली आहे. या दोघांनीही शुक्रवारी उमेदवारी अर्ज सादर केले असून, त्यांच्या नावांची शनिवारी घोषणा होणार आहे.

३६ मतदारसंघांतील मंडळ अध्यक्षांच्या नियुक्तीनंतर भाजपने दोन्हीही जिल्हा अध्यक्षांच्या निवडणुकीची प्रक्रिया सुरू केली होती. भाजपात संघटनात्मक निवडणुका नेहमीच बिनविरोध होत असतात. ३६ मंडळ अध्यक्षांच्या ​नियुक्त्याही बिनविरोधच झालेल्या होत्या. त्याचप्रमाणे दोन्ही जिल्हाध्यक्षांच्या निवडणुकाही बिनविरोध करण्यात आल्या.

दरम्यान, कार्बोटकर आणि प्रभाकर गावकर हे दोघेही भाजपचे जुने आ​णि निष्ठावान कार्यकर्ते आहेत. त्यामुळे पक्षाने यावेळी या दोघांना जिल्हाध्यक्षपदाची संधी दिलेली आहे. त्यांच्या निवडीला सर्वांनीच समर्थन दिल्याची माहिती भाजपच्या ज्येष्ठ नेत्याने ‘गोवन वार्ता’शी बोलताना दिली.

आता वेध नव्या प्रदेशाध्यक्षाचे!

- जिल्हाध्यक्षांच्या नियुक्तीनंतर आता नव्या भाजप प्रदेशाध्यक्षाच्या नावाची घोषणा होणार आहे. पुढील आठ दिवसांत ही प्रक्रिया पार पाडली जाणार असल्याची माहिती भाजपातील सूत्रांनी दिली.

- सध्या प्रदेशाध्यक्षपदासाठी माजी खासदार नरेंद्र सावईकर, माजी मंत्री दयानंद मांद्रेकर, दिलीप परुळेकर, माजी उपमुख्यमंत्री बाबू कवळेकर, माजी आमदार दयानंद सोपटे, दामू नाईक आणि वरिष्ठ नेते गोविंद पर्वतकर या सात जणांमध्ये स्पर्धा सुरू आहे.

- प्रदेशाध्यक्षपदाच्या शर्यतीत सात नेते असले, तरी आगामी जिल्हा पंचायत, पालिका आणि विधानसभा निवडणूक डोळ्यांसमोर ठेवून विद्यमान प्रदेशाध्यक्ष सदानंद शेट तानावडे यांनाच या पदावर कायम ठेवले जाण्याची शक्यता आहे. बहुतांशी आमदार आणि नेत्यांकडून तानावडेंनाच कायम ठेवण्याची मागणी होत आहे. 

हेही वाचा