‘सहमतीचे’ संबंध असल्याचे निरीक्षण
पणजी : लग्नाचे आमिष दाखवून एका महिलेवर लैंगिक अत्याचार करण्यात आले. या प्रकरणातील संशयित आणि पीडित महिला यांच्यात ‘सहमतीचे’ संबंध असल्याचे समोर येत आहेत, असे निरीक्षण नोंदवून पणजी येथील जलदगती न्यायालयाचे न्या. इर्शाद आगा यांनी संशयित मोहम्मद सादिक बडिगर या संशयिताला ५० हजार रुपये व इतर अटींवर सशर्त जामीन मंजूर केला.
याप्रकरणी साळगाव पोलिसांनी पीडित महिलेच्या तक्रारीवरून ११ डिसेंबर २०२४ रोजी गुन्हा दाखल केला होता. त्यानुसार, पीडित महिला विवाहिता होती. तसेच तिला एक मूल आहे. दरम्यान संशयित मोहम्मद सादिक बडिगर २०१९ पासून पीडित महिलेशी मैत्री करून तिच्याशी लग्न करण्याचे आश्वासन देत होता.
याच दरम्यान पीडित महिलेने संशयिताच्या आश्वासनानंतर ३ एप्रिल २०२४ रोजी तिच्या पतीकडून घटस्फोट घेतला. संशयिताने सप्टेंबर २०२४ मध्ये पीडित महिलेशी लग्न करण्याचे आमिष दाखवून तिच्यावर लैंगिक अत्याचार केले आणि त्यानंतर संशयिताने तिच्याशी फारकत घेतल्याचा आरोप केला.
बडिगरला ५० हजार रुपयांच्या हमीवर जामीन
संशयिताने पणजी येथील उत्तर गोवा जिल्हा व सत्र न्यायालयात जामीन अर्ज दाखल केला. या प्रकरणी संशयितातर्फे अॅड. विनायक पोरोब यांनी न्यायालयात बाजू मांडून त्यांच्यात ‘सहमतीचे’ संबंध असल्याचा दावा केला. याप्रकरणी न्यायालयाने संशयित बडिगरला ५० हजार रुपयाच्या हमीवर, १५ दिवस पोलीस स्थानकात हजेरी लावण्याचा व इतर अटीवर सशर्त जामीन मंजूर केला आहे.