कासारवर्णे, चांदेल परिसरात गव्यांकडून शेतीचे नुकसान

हातातोंडाशी आलेला घास हिरावल्याने शेतकरी हवालदिल

Story: प्रतिनिधी । गोवन वार्ता |
12th December, 04:48 pm
कासारवर्णे, चांदेल परिसरात गव्यांकडून शेतीचे नुकसान

पेडणे: पेडणे तालुक्यातील कासारवर्णे, चांदेल- हसापूर, इब्रामपूर, हलर्ण हा परिसर निसर्गाने समृद्ध असून या गावांतील शेतकरी उदरनिर्वाहासाठी शेती, बागायतीवर अवलंबून आहेत. सद्यस्थितीत या शेतकऱ्यांच्या कष्टावर पाणी फिरवण्याचे काम जंगली जनावरे करत आहेत. मागील ७-८ वर्षांपासून या भागातील शेतांमध्ये गव्यांचा वावर मोठ्या प्रमाणात वाढला आहे. हे गवे रात्री शेतात घुसतात आणि शेती फस्त करून पहाटे परत जंगलाकडे वळतात. जंगली प्राण्यांच्या या सततच्या त्रासामुळे अनेक शेतकरी आता शेती मशागत करण्यास दुर्लक्ष करत आहेत.

यंदाच्या पावसाळी हंगामात अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. शासनाकडे विनंती करूनही पेडणे तालुक्यातील शेतकऱ्यांना दिवाळीपर्यंत नुकसान भरपाई मिळाली नव्हती. एकीकडे शासनाकडून शेतकऱ्यांची होणारी उपेक्षा आणि दुसरीकडे जंगली जनावरांच्या बाबतीत वन विभागाचे होणारे दुर्लक्ष यामुळे शेतकरी हवालदिल झाला आहे. वनखात्याने या गव्यांचा बंदोबस्त करून शेतकऱ्यांना दिलासा द्यावा, अशी मागणी शेतकरी करत आहेत.

कष्टाने पिकवलेल्या शेतीची नासधूसः

कासारवर्णे इब्रामपूर, हलर्ण, चांदेल, हसापूर या भागात मोठ्या प्रमाणात शेतकरी वर्ग असून ते आपापल्या शेतामध्ये भात पिकाबरोबरच, पालेभाज्या, अळसांदे, कुळीथ, भुईमूग, ऊस, मका यांसारखी उत्पादने घेतात. मात्र कष्टाने पिकवलेल्या शेतीची जंगली जनावरे नासधूस करत असल्याने शेतकरी मेटाकुटीला आला आहे.

हेही वाचा