भारतीय हॉकी संघाचे मायदेशात जल्लोषात स्वागत

Story: न्यूज डेस्क। गोवन वार्ता |
11th August, 12:16 am
भारतीय हॉकी संघाचे मायदेशात जल्लोषात स्वागत

नवी दिल्ली : पॅरिस ऑलिम्पिक कांस्यपदक विजेत्या भारतीय हॉकी संघाचे शनिवारी मायदेशी आगमन झाले. दिल्ली विमानतळावर भारतीय हॉकी संघाचे जल्लोषात स्वागत करण्यात आले. पॅरिस ऑलिम्पिकमध्ये भारताने गुरुवारी स्पेनचा २-१ असा पराभव करत कांस्यपदक जिंकले होते.
भारतीय हॉकी संघाची 'भिंत' म्हणून ओळख असलेल्‍या हॉकी संघाचा गोलकिपर पीआर श्रीजेश याने पॅरिस ऑलिम्पिक २०२४ मध्ये कांस्यपदक जिंकल्यानंतर गुरुवारी निवृत्ती घेतली. त्याच्याबद्दल बोलताना भारतीय कर्णधार हरमनप्रीत सिंग म्हणाला, पीआर श्रीजेश शेवटचा सामना खेळला. हा त्याच्यासाठी भावनिक क्षण होता. त्याने निवृत्ती घेतली असली तरी तो आमच्यासोबत असेल. मी भारत सरकार, भारतीय क्रीडा प्राधिकरण आणि ओडिशा सरकारच्या पाठिंब्याबद्दल आभार व्यक्त करतो. आता आम्हाला जे प्रेम मिळत आहे, त्याने आमची जबाबदारी दुपटीने वाढली आहे. आम्ही जेव्हाही खेळू तेव्हा देशासाठी पदक आणण्याचा प्रयत्न करू, असे हरमनप्रीत सिंग म्हणाला.
हॉकी इंडियाचे सरचिटणीस भोला नाथ सिंग म्हणाले, पीआर श्रीजेश ऑलिम्पिकच्या समारोप समारंभात भारतीय पथकाचा ध्वजवाहक व्हायला हवा. जर भारत सरकार आणि भारतीय ऑलिम्पिक समितीने त्याला ही संधी दिली असेल, तर हॉकी इंडिया त्यांचे आभार मानते.
देशासाठी पदक जिंकणे मोठी गोष्ट : हरमनप्रीत
भारतीय हॉकी संघाचा कर्णधार हरमनप्रीत सिंगने मायदेशी दाखल होताच आपल्या भावना व्यक्त केल्या. तो म्हणाला, पदक हे पदक आहे आणि देशासाठी ते जिंकणे ही खूप मोठी गोष्ट आहे. आम्ही अंतिम फेरीत पोहोचून सुवर्णपदक जिंकण्यासाठी प्रयत्न केला. पण, दुर्दैवाने आमचे सुवर्ण स्वप्न पूर्ण झाले नाही. पण, आम्ही रिकाम्या हाताने परतलो नाही. एकापाठोपाठ पदक जिंकणे हा एक विक्रम आहे. आमच्यावर जे प्रेम दाखवले; ही खूप मोठी गोष्ट आहे.

पॅरिस ऑलिम्पिकमध्ये हा एक शानदार विजय होता, पदके जिंकणे ही एक मोठी उपलब्धी आहे. आमचे लक्ष्य फायनल खेळण्याचे होते. पण, अमित रोहिदासला एका सामन्यातून निलंबित करण्याची रेफ्रीची चूक आम्हाला महागात पडली. आमच्या टीमला कांस्यपदकावर समाधान मानावे लागले. रेफ्रीने ती चूक केली नसती तर आज पदकाचा रंग बदलला असता._भोला नाथ सिंग, हॉकी इंडियाचे सरचिटणीस