साविओ डायस यांना फेलिसिओ कार्दोज पत्रकारिता पुरस्कार

फा. कोस्टा ‘गुलाब’ पुरस्कारांची घोषणा

Story: प्रतिनिधी। गोवन वार्ता |
10th July, 12:16 am
साविओ डायस यांना फेलिसिओ कार्दोज पत्रकारिता पुरस्कार

मडगाव : फा. फ्रेडी जे. दा. कोस्टा मेमोरियल ट्रस्टतर्फे देण्यात येणारे २०२३ वर्ष‍ांचे गुलाब पुरस्कार जाहीर करण्यात आले. फेलिसिओ कार्दोज पत्रकारिता पुरस्कार प्रुडंट नेटवर्कचे पत्रकार साविओ डायस यांना जाहीर झालेला आहे.

फा. फ्रेडी जे. दा कोस्टा मेमोरियल ट्रस्टची बैठक नुकतीच झाली व २०२३ सालासाठीचे गुलाब पुरस्कार आणि फेलिसिओ कार्दोज पत्रकारिता पुरस्कार घोषित करण्यात आले आहेत. गुलाब पर्सनॅलिटी ऑफ द इयर म्हणून गोवा सरकारच्या कृषी संचालनालयाचे माजी संचालक, कोकणी लेखक नेव्हिल अल्फोन्सो यांची निवड झाली आहे. प्रख्यात कोकणी लेखक, कवयित्री आणि बालसाहित्याच्या लेखिका फिलोमेना सॅम्फ्रान्सिस्को यांना गुलाब रायटर ऑफ द इयर पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. प्रसिद्ध तियात्र विनोदी कलाकार आणि तियात्रचे लेखक-दिग्दर्शक, कॉमेडियन सॅली यांची गुलाब तियात्रिस्त ऑफ द इयर पुरस्कार २०२३ साठी निवड करण्यात आली आहे. फेलिसिओ कार्दोज पत्रकारिता पुरस्कार २०२३ साठी प्रुडंट नेटवर्कच्या मडगावातील वार्ताहर तथा उपसंपादक साविओ डायस यांची निवड झाली आहे.

मडगाव रवींद्र भवनातील ब्लॅक बॉक्समध्ये २० जुलै रोजी दुपारी साडेतीन वाजता होणाऱ्या विशेष कार्यक्रमात पुरस्कार प्रदान केले जातील. यावेळी गोवा आणि दमण आर्कडायोसीसचे नवनियुक्त सहायक बिशप आर. टी. रेव्ह. सिमियाओ फर्नांडिस हे प्रमुख पाहुणे म्हणून तर कोकणी साहित्यिक आणि कवी ग्वादालुप डायस या सन्माननीय पाहुणे म्हणून उपस्थित असतील.

कोकणी क्षेत्रासाठी कार्यरत फर्नांडो सांतानो कोस्टा यांचाही या समारंभात फादर यांच्यासोबत सत्कार करण्यात येणार आहे. गोवा समाजासाठी त्यांच्या असामान्य योगदानाबद्दल फा. फ्रेडी स्मरणार्थ गुलाब सन्मान पुरस्काराने त्यांना गौरवण्यात येईल. ग्वादालुप डायस, विल्ली गोस, मार्कुस गोन्साल्वीस व जॉन अफोन्सो यांच्या समितीने गुलाब पुरस्कार विजेत्यांची निवड केली आहे. तर फेलिसिओ कार्डोसो पत्रकारिता पुरस्कार विजेत्याची निवड मार्कुस गोन्साल्विस, चेतन आचार्य, ग्वादालुप डायस, फा. अवे मारिया अफोन्सो आणि जॉन एम. अफोंसो यांच्या समितीने केली. 

हेही वाचा