पोलीस निरीक्षक विद्धेश पिळगावकर निलंबित

पॅराग्लायडिंग व्यावसायिकाकडून लाच प्रकरणी कारवाई

Story: प्रतिनिधी। गोवन वार्ता |
25th April, 12:11 am
पोलीस निरीक्षक विद्धेश पिळगावकर निलंबित

पणजी : लाच प्रकरणात भ्रष्टाचार विरोधी पथकाने (एसीबी) अटक केलेल्या तेरेखोल किनारी पोलीस स्थानकाचे तत्कालीन निरीक्षक विद्धेश पिळगावकर याला पोलीस खात्याने निलंबित केले आहे. याबाबतचा आदेश पोलीस महानिरीक्षक ओमवीर सिंग बिश्णोई यांच्याकडे उपमहानिरीक्षक पदाचा ताबा असल्यामुळे त्यांनी जारी केला आहे.
या प्रकरणी पृथ्वी एच. एन. यांनी एसीबीकडे तक्रार दाखल केली. त्यानुसार पृथ्वी एच. एन. केरी किनारी परिसरात पॅराग्लायडिंग व्यवसाय करतात. त्यांच्याकडे परवाना नसल्याचा दावा करून जानेवारी २०२४ मध्ये प्रति महिना १० हजार रुपयांच्या लाचेची मागणी हवालदार संजय तळकर याने केली होती. त्यावेळी तत्कालीन पोलीस निरीक्षक विद्धेश पिळगावकर यांनी मध्यस्थी करून लाचेची रक्कम ८ हजार रुपये करण्यात आली होती. तक्रारदाराने अॅपद्वारे ८ हजार रुपये दिले. त्यानंतर तक्रारदारावर दबाव टाकण्यासाठी त्याचे पॅराग्लायडिंग जप्त करून गुन्हा दाखल करण्यात आला होता.
या प्रकरणी एसीबीने हवालदार संजय तळकर याच्याविरोधात गुन्हा दाखल करून अटक केली होती. त्यानंतर एसीबीने उदयराज उर्फ राजू कळंगुटकर याला अटक केल्यानंतर निरीक्षक विद्धेश पिळगावकर यालाही अटक केली. त्यानंतर पोलीस खात्याने पिळगावकर याला निलंबित केले आहे. दरम्यान, या प्रकरणात अटक केलेल्या पोलीस निरीक्षक विद्धेश पिळगावकर याच्या जामिनावर गुरुवारी (दि.२५) सुनावणी होणार आहे.   

निलंबित हवालदार संजय तळकर,
राजू कळंगुटकरला सशर्त जामीन


लाच प्रकरणात भ्रष्टाचार विरोधी पथकाने (एसीबी) अटक केलेल्या निलंबित हवालदार संजय तळकर आणि उदयराज उर्फ राजू कळंगुटकर या दोघांना विशेष न्यायालयाने १ लाख रुपये व इतर अटीवर सशर्त जामीन मंजूर केला आहे. याबाबतचा आदेश उत्तर गोवा जिल्हा प्रधान न्या. शैरीन पाॅल यांनी दिला आहे.
पॅराग्लायडिंग व्यावसायिक पृथ्वी एच. एन. यांनी एसीबीकडे तक्रार दाखल केली आहे. त्यानुसार, तक्रारदाराकडे पॅराग्लायडिंग व्यवसाय करण्यासाठी कायदेशीर परवाना नसल्याचा दावा करून जानेवारी २०२४ मध्ये प्रति महिना १० हजार रुपयांच्या लाचेची मागणी हवालदार संजय तळकर याने केली होती. त्यानंतर तत्कालीन पोलीस निरीक्षक विद्धेश पिळगावकर यांनी मध्यस्थी केल्यानंतर लाचेची रक्कम ८ हजार रुपये करण्यात आली होती. त्यानुसार, तक्रारदाराने अॅपद्वारे ८ हजार रुपये तळकर याच्या खात्यात जमा केले. दरम्यान, २२ मार्च रोजी संशयित व इतर पोलीस कर्मचाऱ्यांनी मिळून तक्रारदाराच्या विरोधात खोट्या आरोपांवरून गुन्हा दाखल केला. तसेच त्याचे पॅराग्लायडिंग जप्त करण्यात आले. मात्र, या संदर्भात योग्य दस्तावेज न करता कारवाई करण्याचा बनाव करण्यात आल्याचा दावा तक्रारदाराने तक्रारीत केला. तसेच या प्रकरणी तक्रारदाराने पुरावेही सादर केले. याची दखल घेऊन एसीबीने प्रथम संजय तळकर याच्याविरोधात भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्याच्या कलम ७ अंतर्गत गुन्हा दाखल केला. गुन्ह्याची माहिती मिळाल्यानंतर तळकर याने पणजी येथील उत्तर गोवा जिल्हा व सत्र न्यायालयात अटकपूर्व जामीन अर्ज दाखल केला जो फेटाळण्यात आला. त्यानंतर एसीबीने त्याला अटक केली. या प्रकरणात सहभागी असल्यामुळे हवालदार उदयराज कळंगुटकर यालाही एसीबीने अटक केली आहे.
दरम्यान, पोलीस खात्याने त्या दोघांना निलंबित केले आहे. न्यायालयाने त्या दोघांना पोलीस कोठडी ठोठावली. याच दरम्यान दोघांनी पणजी येथील विशेष न्यायालयात जामीन अर्ज दाखल केला. या प्रकरणी सुनावणी घेऊन न्यायालयाने दोघांना प्रत्येकी एक लाख रुपये व तितक्याच रकमेचा एक हमीदार तसेच इतर अटीवर सशर्त जामीन मंजूर केला आहे.

               

हेही वाचा