खून प्रकरणातील दोघा संशयितांना नऊ दिवसांची पोलीस कोठडी

न्हयबाग-पेडणे येथे आढळला होता युवकाचा मृतदेह

Story: वार्ताहर। गोवन वार्ता |
23rd April, 12:04 am
खून प्रकरणातील दोघा संशयितांना नऊ दिवसांची पोलीस कोठडी

दोन्ही संशयितांना पोलीस ठाण्यात नेताना उपनिरीक्षक योगेश मांद्रेकर व इतर. (मकबूल माळगीमनी)

कोरगाव : खून प्रकरणातील संशयित आरोपी सतीश कुल्लू व जुनेल कुल्लू यांना सोमवारी पेडणे पोलिसांनी न्यायालयासमोर उभे केले असता दोघांनाही नऊ दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली. रविवारी सकाळी न्हयबाग येथे तेरेखोल नदीत अबनेजर मुलनबीन कुल्लू याचा मृतदेह तरंगताना आढळला होता. पेडणे पोलिसांनी केलेल्या तपासात अबनेजर कुल्लूचा खून झाल्याचे स्पष्ट झाल्यावर पोलिसांनी वरील दोन्ही संशयितांना अटक केली होती.
संशयितांनी नायलॉनच्या दोरीने गळ्याला फास लावून अबनेजर कुल्लूचा खून करून त्याचा मृतदेह न्हयबाग येथील तेरेखोल नदीत टाकला होता. खून झालेली व्यक्ती व संशयित आरोपी हे मूळ झारखंड येथील आहेत. अबनेजर कुल्लू व जुनेल कुल्लू हे सख्खे भाऊ असून झारखंड येथे त्यांच्यात वाद झाला होता. तर सतीश कुल्लू हा त्यांचा शेजारी आहे.
जुनेल कुल्लू, अबनेजर कुल्लू व सतीश कुल्लू हे मळेवाड (सावंतवाडी) येथे काजू बागायतीत मजूर म्हणून काम करत होते. १९ रोजी रात्री तिघेही एकत्र दारू पिण्यासाठी बसले असता दोन्ही भावांमध्ये घरच्या जमिनीवरून भांडण झाले. दरम्यान, दोन्ही संशयितांनी नायलॉनच्या दोरीचा फास अबनेजरच्या गळ्याभोवती टाकून त्याचा खून केला. दरम्यान, पेडणे पोलीस ठाण्याचे निरीक्षक सचिन लोकरे पुढील तपास करत आहेत.