वास्कोतील वृद्धेच्या खूनप्रकरणी सीसीटीव्हीमुळे धागेदोरे हाती

खुनी लवकरच तावडीत सापडण्याचा पोलिसांना विश्वास

Story: प्रतिनिधी। गोवन वार्ता |
22nd April, 11:30 pm
वास्कोतील वृद्धेच्या खूनप्रकरणी सीसीटीव्हीमुळे धागेदोरे हाती

गायत्री मराठे

वास्को : पिशी डोंगरी-खारेवाडा येथील गायत्री मराठे (७८) यांच्या खून प्रकरणी अद्याप शोध हाती लागले नाही तथापि परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यामुळे काही धागेदोरे हाती लागल्याने खुनी लवकरच पोलिसांच्या तावडीत सापडेल, असा विश्वास वास्को पोलीस उपाधीक्षक संतोष देसाई यांनी व्यक्त केला. दरम्यान, गायत्री मराठे यांच्यावर सोमवारी अंत्यसंस्कार करण्यात आले.
खुन्यांनी मराठे यांच्या अंगावरील दागिन्यांना किंवा कपाटतील पैशांना हात लावला नाही त्यामुळे सदर खून चोरीसाठी करण्यात आला नसल्याचे प्रथमदर्शनी दिसून येते. तथापि सदर खून कोणत्या कारणासाठी झाला याचा शोध पोलीस घेत आहेत.
डोंगरी येथे राहणाऱ्या गायत्री मराठे यांचा रविवारी सायंकाळी चाकूने गळा चिरून खून करण्यात आला होता. त्या खोलीत एकट्याच राहत होत्या. त्यांची खोली रस्त्यालगत आहे. सदर रस्त्यावर वाहनांची तसेच लोकांची वर्दळ सतत चालू असते. खून प्रकरणी पोलिसांनी श्वानपथक तसेच ठसे तज्ञ यांची मदत घेतली. त्याचप्रमाणे या परिसरातील सीसीटीव्ही कॅमेरे तपासणी सुरू केली आहे. रविवारी सायंकाळी व सोमवारी सकाळी तेथील सीसीटीव्ही कॅमेरे तपासताना काही धागेदोरे हाती लागले आहेत. त्यामुळे वास्को पोलिसांनी खुन्याला पकडण्यासाठी काही पथके तयार केली आहेत.