पोलीस निरीक्षक पिळगावकरला ५ दिवसांची पोलीस कोठडी

पॅराग्लायडिंग लाच प्रकरण : संशयितांच्या जामिनावर आज सुनावणी

Story: प्रतिनिधी। गोवन वार्ता |
21st April, 11:22 pm
पोलीस निरीक्षक पिळगावकरला ५ दिवसांची पोलीस कोठडी

म्हापसा : लाच प्रकरणात भ्रष्टाचार विरोधी पथकाने (एसीबी) अटक केलेले तेरेखोल किनारी पोलीस स्थानकाचे तत्कालिन पोलीस निरीक्षक विद्धेश पिळगावकर यांना पणजी न्यायालयाने पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.
दरम्यान, या प्रकरणातील संशयित आरोपी पोलीस हवालदार संजय तळकर व पोलीस हवालदार उदयराज उर्फ राजू कळंगुटकर यांच्या जामीन अर्जावर सोमवार दि. २२ रोजी न्यायालयात सुनावणी होणार आहे. शनिवारी २० रोजी एसीबीने पिळगावकर यांना भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्याच्या कलम ७ अंतर्गत गुन्ह्याखाली अटक केली होती. रविवारी त्यांना एसीबीच्या पोलिसांनी पणजी येथील उत्तर गोवा सत्र न्यायालयात हजर केले तेव्हा त्यास पाच दिवस पोलीस कोठडीत ठेवण्याचा आदेश दिला.
दरम्यान, एसीबीने पृथ्वी एच. एन. यांच्या तक्रारीच्या आधारे हा गुन्हा नोंद केला होता. फिर्यादींचा केरी समुद्रकिनारी पॅराग्लायडिंग व्यवसाय होता. हा व्यवसाय करण्यासाठी त्यांच्याकडे आवश्यक परवाना नसल्याचा दावा करून जानेवारी २०२४ मध्ये प्रति महिना १० हजार रुपयांच्या लाचची मागणी तेरेखाेल किनारी पोलीस स्थानकातील पोलीस हवालदार संजय तळकर यांनी केल्याचा आरोप त्यांनी तक्रारीत केला होता.
त्यानुसार एसीबीने गुन्हा दाखल करून संशयित हवालदार संजय तळकर यांची चौकशी केली. तसेच पोलीस खात्याने पोलीस निरीक्षक विद्धेश पिळगावकर यांची तत्काळ जीआरपीमध्ये बदली केली होती. हा गुन्हा नोंद झाल्यामुळे ७ एप्रिल रोजी पोलीस खात्याने तळकर यांना सेवेतून निलंबित केले. तसेचअ टकपूर्व जामीन अर्ज उत्तर गोवा जिल्हा व सत्र न्यायालयाने दि. १२ एप्रिल रोजी फेटाळल्यानंतर त्याच दिवशी एसीबीने त्यास अटक केली होती.
त्यानंतर या प्रकरणातील दुसरा संशयित आरोपी पोलीस हवालदार उदयराज उर्फ राजू कळंगुटकर यालाही दि. १५ एप्रिल रोजी एसीबीकडून अटक करण्यात आली. सेवेतून त्यालाही पोलीस खात्याने निलंबित केले होते. तर शनिवारी २० एप्रिल रोजी एसीबीने पोलीस निरीक्षक विद्धेश पिळगावकर यांना रितसर अटक केली होती.
महिना ठरली होती ८ हजार रुपये लाच
संबंधित पोलीस अधिकाऱ्याच्या मध्यस्थीमुळे या लाचची रक्कम ८ हजार रुपये महिना ठरली होती. तक्रारदाराने ऑनलाईन अॅपद्वारे ही ८ हजार रुपयांची लाच दिली होती. २२ मार्च रोजी संशयित पोलिसांनी तक्रारदाराच्या विरोधात खोटे आरोप करून गुन्हा दाखल केला. त्याचे पॅराग्लायडिंग साहित्य जप्त केले. पण, या संदर्भात योग्य दस्तावेज नसताना कारवाई करण्याचा बनाव करण्यात आल्याच्या द्याव्यासह फिर्यादीने तक्रारीमध्ये एसीबीकडे पुरावे सादर केले.