न्हयबाग येथे मजुराचा खून; काही तासांतच पेडणे पोलिसांकडून खुनाचा छडा

Story: वार्ताहर। गोवन वार्ता |
21st April, 12:41 am
न्हयबाग येथे मजुराचा खून; काही तासांतच पेडणे पोलिसांकडून खुनाचा छडा

कोरगाव : न्हयबाग येथे तेरेखोल नदीत शनिवारी सकाळी सापडलेल्या मृतदेहाची ओळख काही तासातच पटवून पेडणे पोलिसांनी खुनाचा छडा लावला. याप्रकरणी दोन संशयितांना अटक केली असून पूर्ववैमनस्यातून खून केल्याचे समजते.

शनिवारी सकाळी न्हयबाग येथे तेरेखोल नदीत सापडलेल्या मृतदेहाच्या गळ्याभोवती नायलॉनची दोरी होती. बारकाईने निरीक्षण केल्यावर मृताच्या गळ्याला दोरीचे व्रण दिसल्याने पोलिसांचा संशय बळावला. मृताचे नाव समजल्यावर वामन कारापूरकर यांनी संशयितांनी आपणाला खून केल्याचे सांगितल्याची माहिती दिल्यावर पोलिसांना तपास करणे सोपे गेले.

मृताचे नाव अबनेजर मुल नबीन कुल्लू (४७ वर्षे) असून तो मूळ सिमडेगा, झारखंड येथीलआहे. न्हयबाग येथे तो काजू बागायतीत मजूर म्हणून काम करत होता. तर संशयित आरोपीही त्याच्याच गावातील असून हे सगळे मजुरीचे काम करतात. सतीश कुल्लू हा न्हयबाग तर जुनेल कुल्लू हा मळेवाड - सिंधुदुर्ग येथे मजुरी करत होता. जुनेल कुल्लू हा खून झालेल्या अबनेजर कुल्लूचा सख्खा लहान भाऊ आहे.

अवघ्या तीन तासांच्या तपासानंतर या गुन्ह्यातील आरोपींचा तंत्रज्ञानाद्वारे शोध घेऊन त्यांच्या मुसक्या आवळण्यात आल्या. खून प्रकरणातील संशयित सतीश कुल्लू याला पेडणे पोलिसांनी न्हयबाग परिसरात तर दुसरा संशयित जुनेल कुल्लू याला मळेवाड येथून अटक केली.

पेडणेचे पोलीस उपअधीक्षक जीवबा दळवी, पेडणे पोलीस ठाण्याचे निरीक्षक सचिन लोकरे, उपनिरीक्षक नवनीत गोलतेकर व योगेश मांद्रेकर, हवालदार प्रसाद तुयेकर, तीर्थराज म्हामल, सागर खोर्जुवेकर, सचिन हळर्णकर, प्रज्योत मयेकर, शशांक साखळकर, निखिल गावस, शंकर जल्मी, ऋषिकेश पार्सेकर व होमगार्ड कविकांत तुयेकर यांनी तपास कामात भाग घेतला.

पुरावा नष्ट करण्यासाठी फेकले नदीत

पुरावा नष्ट करण्यासाठी नायलॉन दोरीने गळा आवळून खून करून मृतदेह तेरेखोल नदीत फेकून दिला होता. पेडणे पोलिसांना एका दिवसाच्या आत आरोपींना पकडण्यात यश आले.