यूपीएससीत गोवा मागेच

गोव्यात यूपीएससीच्या परीक्षेची पूर्वतयारी करण्यासाठी आवश्यक त्या सुविधा नाहीत. त्यासाठी इतर राज्यांमध्ये जाऊन शिकावे तर मोठ्या प्रमाणात आर्थिक मदत लागते. अशा वेळी राज्य सरकारकडून एखादी योजना तयार केली किंवा पूर्वतयारी अभ्यासक्रमांसाठी प्रवेश घेण्यासाठी तसेच पूर्वतयारीसाठी गोव्यात सरकारने काही सुविधा तयार केल्या, तर अनेक इच्छुक उमेदवारांना त्याची मदत होऊ शकते.

Story: संपादकीय |
18th April, 10:27 pm
यूपीएससीत गोवा मागेच

गोव्यात सध्या राजकारण तापलेले आहे. लोकसभा उमेदवारांचीच सर्वत्र चर्चा आहे. कोण जिंकू शकतो, कोण कसा मतांची विभागणी करू शकते असे अनेक अंदाज बांधण्यात सगळे व्यग्र आहेत. अशा वेळी दिल्लीत केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षांचे निकाल येतात. दरवर्षीप्रमाणे या निकालानंतरही गोव्यात कोणाला त्यात स्वारस्य दिसत नाही किंवा कुतूहलही दिसत नाही. इतर काही राज्यांमध्ये ज्याप्रमाणे युपीएससी निकालानंतर टॉपर किंवा परीक्षा उत्तीर्ण होणाऱ्यांची चर्चा आहे किंवा बातम्या येत आहेत, तसा प्रकार गोव्यात नाही. दरवर्षीची हेच आहे. गोव्यातील लोक त्यावर बोलू पाहत नाहीत किंवा नव्या पिढीने यूपीएससीकडे वळावे असाही कोणी आग्रह धरत नाही. त्यामुळे भारताच्या वेगवेगळ्या सेवांमध्ये लोकसेवा आयोगाची परीक्षा उत्तीर्ण होऊन रुजू झालेल्यांची उदाहरणे अगदीच कमी असतील. गोव्यातील लोक या परीक्षेकडे कधी सकारात्मकतेने पाहतील? इथली नवी पिढी लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत स्वारस्य कधी दाखवेल आणि सरकार इच्छुक युवकांना या परीक्षांना बसण्यासाठी मदत कधी करेल, असे प्रश्न नेहमीच पडत असतात. दैनिक 'गोवन वार्ता' गोवा लोकसेवा आयोग आणि केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षांच्या तयारीसाठी अभ्यास करता यावा, परीक्षा कशा असतात त्याची माहिती मिळावी म्हणून दर रविवारी उपक्रम चालवत आहे. कधीतरी गोव्यातील तरुणांना यूपीएससीची आवड तयार होईल आणि राज्य सरकार अशा तरुणांना आपला मदतीचा हात देईल याची प्रतिक्षा आहे. ‘ट्वेल्थ फेल’सारखा चित्रपट देशभर सर्वांच्या पसंतीला उतरतो, ‘सुपर ३०’ नावाचा चित्रपटही यूपीएससीच्या परीक्षांसाठी तयारी करणाऱ्यांवर येऊन बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालतो. हे चित्रपट आवडीने पाहिले जातात. पण देशातील इतर राज्ये जेव्हा यूपीएससीच्या परीक्षांमध्ये चमकतात, तेव्हा मात्र गोव्यासारखे राज्य कुठेच दिसत नाही. 

यूपीएससीचे निकाल जाहीर झाले. १,०१६ जणांनी परीक्षेत यश मिळवले. त्यात सहा मुली आणि चार मुलांनी पहिल्या दहांमध्ये स्थान मिळवले. तामिळनाडू, कर्नाटक, गुजरात, मध्य प्रदेश, बिहार या राज्यांमधून मोठ्या प्रमाणात विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. महाराष्ट्रासारख्या राज्यातूनही अनेकांनी यश प्राप्त केले आहे. यूपीएससीच्या परीक्षेत ६६४ पुरुष आणि ३५२ महिला उमेदवारांनी यश मिळवले आहे. ज्यात ३४७ खुल्या वर्गातील, ११६ आर्थिक मागास, ८६ जण एसटी, १६५ एससी तसेच ३०३ ओबीसी प्रवर्गातील आहेत. दोन दिवसांपूर्वी जाहीर झालेल्या निकालात गोव्यातील कोणी विद्यार्थी आहे की नाही, त्याबाबत अद्याप स्पष्टता नाही. पण गोव्यातून फार कमी उमेदवार परीक्षेला बसतात, हेही खरे आहे. 

तामिळनाडूसारख्या राज्यातून येणारे विद्यार्थी यूपीएससीच्या परीक्षेत मोठ्या प्रमाणात यश मिळवत आहेत. मात्र गोव्यातील विद्यार्थी यात मागे पडत आहेत. गोव्यात यूपीएससीच्या परीक्षेची पूर्वतयारी करण्यासाठी आवश्यक त्या सुविधा नाहीत. त्यासाठी इतर राज्यांमध्ये जाऊन शिकावे तर मोठ्या प्रमाणात आर्थिक मदत लागते. अशा वेळी राज्य सरकारकडून एखादी योजना तयार केली किंवा पूर्वतयारी अभ्यासक्रमांसाठी प्रवेश घेण्यासाठी तसेच पूर्वतयारीसाठी गोव्यात सरकारने काही सुविधा तयार केल्या, तर अनेक इच्छुक उमेदवारांना त्याची मदत होऊ शकते. गोव्यातील विद्यार्थ्यांनी यूपीएससीच्या परीक्षेत यश मिळवून भारतातील वेगवेगळ्या सेवांमध्ये रुजू व्हावे अशा प्रकारचे लक्ष्य सरकारने ठेवले तर निश्चितच ते शक्य आहे. अनेक वर्षांपासून स्पर्धा परीक्षांच्या तयारीसाठी उपाय करण्याबाबत सरकारकडून घोषणा होत असतात, पण प्रत्यक्षात मात्र तशा सुविधा निर्माण करण्यावर सरकारने लक्ष दिलेले नाही. प्रसंगी कुठल्याही संस्थेला हे काम सरकारने देऊन पुढील काही वर्षांसाठी प्रयोग केला तरीही त्यात यश येऊ शकते. उत्तर प्रदेश यूपीएससी परीक्षेत सर्वाधिक उमेदवार देणारे राज्य ठरलेले आहे. त्यानंतर मध्यप्रदेश, महाराष्ट्र, पश्चिम बंगाल, तामिळनाडू, बिहार, कर्नाटक, गुजरात, राजस्थान या राज्यांमधून जास्त आयएएस अधिकारी आहेत. अॅग्मू म्हणजेच अरुणाचल, गोवा, मिझोराम आणि संघ प्रदेशांच्या कॅडरमध्ये येणाऱ्या राज्यांमधून फार अधिकारी आलेले नाहीत. त्यातल्या त्यात गोव्यातून अगदीच कमी अधिकारी आहेत. गेल्या काही वर्षांमध्ये आयएएस, आयपीएस आणि आयएफएस सेवेत गोव्यातील काही अधिकाऱ्यांना बढती मिळाल्यामुळे गोव्यातील अनेक अधिकाऱ्यांना या कॅडरमध्ये समाविष्ट होता आले. पण थेट भरतीच्या माध्यमातून गोव्यातून मोठ्या प्रमाणात उमेदवार आयएएस किंवा आयपीएस कॅडरमध्ये गेलेले नाहीत. यूपीएससी परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर भारतीय प्रशासकीय सेवा, भारतीय पोलीस सेवा, भारतीय परराष्ट्र सेवा अशा अनेक सेवांमध्ये रुजू होता येते. गोव्यातील विद्यार्थ्यांना अशा स्पर्धा परीक्षांसाठी प्रोत्साहन देण्यासाठी सरकारी स्तरावरच प्रयत्न व्हायला हवेत.