शाळांनी वाहतूक समितीसह वाहतूक वॉर्डन नेमावेत

वाहतूक पोलीस निरीक्षकांचे आवाहन : शाळा प्रतिनिधींसमवेत बैठक


27th May 2023, 12:56 am
शाळांनी वाहतूक समितीसह वाहतूक वॉर्डन नेमावेत

वाहतूक कोंडीवर उपाययोजनेसाठी आयोजित बैठकीला उपस्थित नगराध्यक्ष, पोलीस अधिकारी व इतर. (संतोष मिरजकर) 

प्रतिनिधी। गोवन वार्ता            

मडगाव :  विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून शहरातील शाळांना विद्यार्थी वाहतूक समिती स्थापण्यास सांगितले आहे. त्यात आरटीओ, वाहतूक पोलीस, शाळा व्यवस्थापन प्रतिनिधी व पालक शिक्षक संघाचा प्रतिनिधी असेल. याशिवाय पालक शिक्षक समितीच्या सहकार्यातून वाहतूक वॉर्डनची नेमणूक करावी, असे आवाहन मडगाव वाहतूक पोलीस निरीक्षक गौतम साळुंखे यांनी केले.            

मडगाव पालिकेच्या रस्ता सुरक्षा आणि वाहतूक व्यवस्थापनाची बैठक शुक्रवारी सकाळी पालिकेच्या सभागृहात झाली. यावेळी नगराध्यक्ष दामोदर शिरोडकर, वाहतूक पोलीस निरीक्षक गौतम साळुंखे, उपनगराध्यक्ष दीपाली सावळ, नगरसेवक, अभियंता, गोवा कॅनचे संयोजक रोलंड मार्टिन्स आदी उपस्थित होते. 

शहरातील प्राथमिक, माध्यमिक शाळा सुटल्यानंतर वाहतूक कोंडीचे प्रकार घडताना दिसतात. उपाययोजनांसाठी विविध शाळांचे प्राचार्य व प्रतिनिधींनी चर्चा केली. शाळा भरताना व सुटताना शाळांच्या परिसरात वाहतूक कोंडी होते. विद्यार्थ्यांची वाहतूक होणाऱ्या गाड्यांत जास्त विद्यार्थी भरले जातात, गाड्यांची स्थिती चांगली नसते व या गाड्या चुकीच्या ठिकाणी उभ्या केल्याने होणारी वाहतूक कोंडी कमी होण्याची गरज आहे. याशिवाय मडगाव वाहतूक पोलीस प्रत्येक शाळेनजीक ठेवणे शक्य नाही, त्यामुळे ट्रॅफिक वॉर्डन योजना सुरू करण्याबाबत माहिती दिली. शाळा व्यवस्थापन, पालक शिक्षक संघटना यांनी आपापल्या शाळेनजीक स्वयंसेवक नेमावेत. त्यांना वाहतूक पोलिसांकडून प्रशिक्षण दिले जाईल. ट्रॅफिक वॉर्डनची नेमणूक झाल्यास शाळांनजीक वाहतूक कोंडी होणार नाही, असे मत  वाहतूक पोलीस निरीक्षक गौतम साळुंखे यांनी व्यक्त केले. शाळांच्या प्रतिनिधींनी सांगितलेल्या समस्यांवर पोलीस काम करत आहेत व वाहतूक आराखडा तयार असल्याचेही ते म्हणाले.               

नगराध्यक्ष दामोदर शिरोडकर यांनी सांगितले की, राज्यातील अनेक शाळा महामार्ग किंवा वर्दळीच्या रस्त्याच्या नजीक आहेत. शाळा परिसराचा भौगोलिक अभ्यास केल्यानंतर मुलांच्या सुरक्षिततेचा विचार केला जाऊ शकतो. शाळा सुटल्यावर मुले थेट रस्त्यावर जाऊन वाहतुकीला अडथळा होणार नाही याची काळजी घेण्याची गरज आहे. मुलांना नेण्यासाठी येणाऱ्या गाड्या कुठे उभ्या कराव्यात, मुलांची सुरक्षितता कशी पाहावी, यावर चर्चा झाली.

वाहतूक नियोजनात मदत करा : नगराध्यक्ष

मडगावातील शाळा व महाविद्यालयांच्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होते. याबाबत पालिकेच्या रस्ता सुरक्षा समितीच्या बैठकीत चर्चा झाली. आवश्यक त्या ठिकाणी पोलीस तैनात केले जातात; पण सर्व ठिकाणी ते शक्य नसल्याचे पोलिस निरीक्षकांनी स्पष्ट केले. त्यावेळी नगराध्यक्ष दामू शिरोडकर यांनी हा प्रश्न सोडवण्यासाठी शाळा व्यवस्थापन, मुख्याध्यापक, पालक शिक्षक समितीची मदत मिळावी. वाहतूक नियोजन हा केवळ वाहतूक पोलीस व आरटीओ यांचा विषय नाही, तर लोकांनीही वाहतूक नियोजनात हातभार लावावा, असे सांगितले.