विराट कोहलीचे अमृतमहोत्सवी शतक

भारताकडे पहिल्या डावात ९१ धावांची आघाडी : अक्षरचे अर्धशतक

|
13th March 2023, 12:15 Hrs
विराट कोहलीचे अमृतमहोत्सवी शतक

न्यूज डेस्क। गोवन वार्ता

अहमदाबाद : स्टार फलंदाज विराट कोहलीने कसोटी शतकाचा दुष्काळ संपवला आणि अक्षर पटेलसोबत शतकी भागीदारी केली. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या चौथ्या आणि अंतिम क्रिकेट कसोटीच्या चौथ्या दिवशी भारताने पहिल्या डावात ५७१ धावा करत ९१ धावांची आघाडी घेतली. प्रत्युत्तर देताना ऑस्ट्रेलियाने दुसऱ्या डावात दिवसाचा खेळ संपेपर्यंत एकही विकेट न गमावता तीन धावा केल्या.

पाहुण्या संघाने मॅथ्यू कुहनेमनला (नाबाद ०) ट्रॅव्हिस हेडसह (नाबाद ३) डावाची सलामी दिली. मात्र, पाचव्या षटकात रविचंद्रन अश्विनच्या चेंडूवर यष्टिरक्षक श्रीकर भरत झेलबाद करण्यात अयशस्वी झाल्यामुळे कुहनेमन भाग्यवान ठरला. पहिल्या डावात ४८० धावा करणारा ऑस्ट्रेलिया अजूनही भारताच्या ८८ धावांनी मागे आहे.

तीन वर्षांहून अधिक काळानंतर कसोटी शतक झळकावणाऱ्या कोहलीने ३६४ चेंडूत १५ चौकारांसह १८६ धावा केल्या. ही त्याची ऑस्ट्रेलियाविरुद्धची सर्वोच्च धावसंख्या आहे. त्याने अक्षर पटेल (७९) सोबत सहाव्या विकेटसाठी १६२, श्रीकर भरत (४४) सोबत पाचव्या विकेटसाठी ८४ आणि रवींद्र जडेजा (२८) सोबत चौथ्या विकेटसाठी ६४ धावांची भागीदारी केली. ऑस्ट्रेलियाकडून टॉड मर्फीने ११३ तर नॅथन लायनने १५१ धावांत तीन बळी घेतले. भारताच्या सुरुवातीच्या सहा विकेट्सच्या सर्व भागीदारी ५० हून अधिक धावांच्या होत्या.

स्टेडियममध्ये उपस्थित असलेल्या सुमारे १५,००० प्रेक्षकांसाठी रविवार हा संस्मरणीय दिवस ठरला. कोहलीने मिड-विकेटवर ऑफ-स्पिनर लायनच्या चेंडूवर एक धाव घेत नोव्हेंबर २०१९ नंतरचे पहिले कसोटी शतक पूर्ण केले. कोहलीचे हे २८ वे कसोटी शतक आणि एकूण ७५ वे आंतरराष्ट्रीय शतक आहे. त्याने २४१ चेंडूत आपले शतक पूर्ण केले. कोहलीने शतक पूर्ण केल्यानंतर वेगाने धावा केल्या. तत्पूर्वी सकाळच्या सत्रात त्याने एकही चौकार लगावला नाही. उपाहारानंतर त्याने अक्षरसोबत धावांचा वेग वाढवला. सकाळच्या सत्रात रवींद्र जडेजाच्या (२८) रूपाने एकमेव विकेट गमावूनही भारतीय संघाला केवळ ७३ धावाच जोडता आल्या.

या मालिकेत आतापर्यंत फलंदाजीत अपयशी ठरलेल्या भरतने लंचनंतर कॅमेरून ग्रीनला हुक आणि पुलिंग करत सलग दोन षटकार ठोकले. तथापि, त्याचे पहिले अर्धशतक हुकले. तो लायनच्या चेंडूवर पीटर हँड्सकॉम्बकडे झेलबाद झाला. त्याने ८८ चेंडूंचा सामना करताना दोन चौकार आणि तीन षटकार ठोकले. भरत बाद झाल्यानंतर कोहलीने आपले शतक पूर्ण केले आणि त्यानंतर काही आकर्षक शॉट्स खेळले. अक्षरनेही काही चांगले शॉट्स खेळले. लाँगऑफवर उस्मान ख्वाजाने त्याचा झेल सोडला आणि चेंडू सहा धावांसाठी सीमारेषेबाहेर गेला.

चहापानानंतर भारतीय फलंदाजांनी अधिक वेग दाखवला. कर्णधार स्टीव्ह स्मिथ स्लिपमध्ये त्याचा झेल घेण्यास अपयशी ठरल्याने अक्षरला ४३ धावांवर दुसरे जीवनदान मिळाले. यावेळी दुर्दैवी गोलंदाज लायन होता. कोहलीने ग्रीनवर सलग दोन चौकार मारून ३१३ चेंडूत १५० धावा पूर्ण केल्या आणि त्यानंतर लायनवरही दोन चौकार मारले. मर्फीच्या एका चेंडूवर अक्षरने मालिकेतील तिसरे अर्धशतक ९५ चेंडूत पूर्ण केले. त्यानंतर अक्षरने कुहनेमनला दोन षटकांत तीन षटकार ठोकले. मात्र, मिचेल स्टार्कचा चेंडू विकेटवर खेळून तो पॅव्हेलियनमध्ये परतला. त्याने ११३ चेंडूंच्या खेळीत पाच चौकार आणि चार षटकार मारले. अश्विननेही सात धावा केल्यानंतर लायनकडून स्लॉग स्वीप खेळण्याच्या प्रयत्नात डीप मिड-विकेटवर कुहनेमनकडे झेलबाद केले. हँड्सकॉम्बच्या अचूक लक्ष्याला बळी पडून उमेश यादव एकही चेंडू न खेळता धावबाद झाला. त्यानंतर लायनच्या चेंडूवर कोहलीचा अवघड झेल घेण्यात हँड्सकॉम्ब अपयशी ठरला.

यावेळी कोहली १८५ धावांवर खेळत होता. कोहलीला मात्र या जीवदानाचा फायदा उठवता आला नाही आणि मर्फीच्या चेंडूवर मार्नस लबुशेनकडे झेल देऊन पॅव्हेलियनमध्ये परतला. कंबरेच्या दुखापतीमुळे श्रेयस अय्यर फलंदाजीला आला नाही.