काश्मिरी लोक, सैनिकांसह प्रियजनांना गमावण्याचे दु:ख

राहुल गांधी : श्रीनगरमध्ये बर्फवृष्टीत भावूक भाषणाने यात्रेचा समारोप

|
30th January 2023, 11:59 Hrs
काश्मिरी लोक, सैनिकांसह प्रियजनांना गमावण्याचे दु:ख

बर्फवृष्टीत भाषण करताना राहुल गांधी.


न्यूज डेस्क । गोवन वार्ता

श्रीनगर : भारत जोडो यात्रेचा समारोप सोमवारी श्रीनगरमध्ये जोरदार बर्फवृष्टीमध्ये राहुल गांधी यांच्या भाषणाने झाला. शेर-ए-काश्मीर स्टेडियममध्ये राहुल यांनी ३५ मिनिटांचे भाषण केले. मोदी, अमित शहा आणि आरएसएसचा दोनदा उल्लेख करून भाजपवर हल्लाबोल केला. दरम्यान, यावेळी त्यांनी

काश्मिरी लोक आणि सैनिकांप्रमाणे मलाही माझ्या प्रियजनांना गमावण्याचे दु:ख असल्याचे भावूक होत सांगितले.

ते म्हणाले की, मला आता जम्मू-काश्मीरच्या लोकांना आणि लष्कर-सुरक्षा दलांना काही सांगायचे आहे. मला हिंसा समजते. मी हिंसा बरोबर पाहिली आहे. ज्याने हिंसा पाहिली नाही त्यांना हे समजणार नाही. मोदीजी, अमित शहाजी, संघाच्या लोकांनी हिंसा पाहिली नाही; ते घाबरतात. इथे आम्ही ४ दिवस फिरलो. भाजपचा कोणताही नेता असे वागू शकणार नाही याची मी खात्री देतो. जम्मू-काश्मीरचे लोक त्याला फिरू देणार नाहीत म्हणून नाही, तर त्यांना भीती वाटते म्हणून. काश्मिरी आणि सैनिकांप्रमाणेच मी माझ्या प्रियजनांना गमावल्याचे दुःख सहन केले आहे. ही वेदना मोदी-शहा समजू शकत नाहीत.

मी आत्तापर्यंत हिंसा पाहिली, अनुभवली आहे. त्यामुळेच मोबाईल किंवा फोनकडे पाहण्याचा आमचा दृष्टीकोन वेगळा आहे. माझ्या आजीची हत्या करण्यात आली त्यानंतर सहा-सात वर्षांनी पुलवामामध्ये आपले सैनिक मारले गेले. त्यांच्या घरी या घटनेचे फोन आले. तसेच काश्मिरींच्या घरी फोन आले असतील. मला फोन आला तो माझ्या बाबांच्या (राजीव गांधी) मित्राचा होता. मी त्यांना म्हटले हो मला समजले आहे की बाबा (राजीव गांधी) यांचा मृत्यू झाला आहे. राहुल गांधी यांनी मनात ठसठसत असलेली ही वेदना बोलून दाखवली.

सकाळपासून जोरदार बर्फवृष्टी होत होती. कार्यालयाबाहेर कार्यकर्त्यांची मोठी गर्दी होती. दुसरीकडे राहुल इथेही वेगळ्याच रंगात दिसले. बहीण प्रियंका यांच्यासोबत त्यांनी हिमवर्षावाचा आनंद लुटला. दोघांनी एकमेकांवर बर्फही फेकले.


असे फोन कुुणाला येऊ नयेत

काश्मीरमध्ये येऊन काय साध्य केले. मी त्याचे उत्तर दिले नाही. मी आज हे उत्तर देतो आहे की आपल्या माणसाचा मृत्यू झाला आहे हे सांगणारे फोन कुठल्याही मुलाला, आईला, वडिलांना, भावाला ऐकावे लागू नयेत हे आमचे लक्ष्य आहे. भाजपा आणि संघाचे लोक मला शिव्या देतात. पण मी त्यांचे आभार मानतो. कारण मला ते जेवढ्या शिव्या देतील त्यातून मी शिकत जातो असेही राहुल गांधी म्हणाले.