‘सेन्सिबल अर्थ’च्या उपक्रमाला उसकई पंचायतीची​ साथ !


08th December 2021, 12:34 am
‘सेन्सिबल अर्थ’च्या उपक्रमाला उसकई पंचायतीची​ साथ !

प्रतिनिधी। गोवन वार्ता                                          

पणजी : प्लास्टिकमुक्तीसाठी ‘सेन्सिबल अर्थ’ संस्थेने सुरू केलेल्या उपक्रमाला ग्रामविकास खात्याच्या (आरडीए) आजीविका मिशन अंतर्गत चालणाऱ्या महिलांच्या स्वयंसहाय्य गटांनी मदतीचा हात दिला आहे. प्लास्टिकमुक्तीसाठी जुन्या कपड्यांच्या पिशव्या तयार करून स्वयंसहाय्य गटांच्या महिला आर्थिकदृष्ट्या सबल होत असून, त्यांच्या कार्यामुळे प्लास्टिकमुक्तीच्या चळवळीलाही बळकटी मिळत आहे. या चळवळीत उस्फूर्तपणे सहभागी झालेल्या उसकई पंचायतीने महिलाशक्तीला पाठिंबा दर्शवत प्लास्टिकमुक्तीच्या दिशेने जलद पावले उचलली आहेत.                   

‘सेन्सिबल अर्थ’ संस्थेने गेल्या दीड महिन्यांपासून उत्तर गोव्यातील उसकई, हळदोणा, नास्नोळा आणि मयडे या चार पंचायतींमध्ये जुन्या कपड्यांपासून पिशव्या तयार करण्याचा आणि कापडी पिशव्या मोफत वाटण्याचा अभिनव उपक्रम सुरू केला आहे. या उपक्रमात आजीविका मिशनअंतर्गत या पंचायत क्षेत्रांत कार्यरत असलेल्या महिला स्वयंसहाय्य गटांनी सहभाग घेतला आहे. ‘सेन्सिबल अर्थ’कडून स्वयंसहाय्य गटाच्या महिलांना जुने, वापरात नसलेले कपडे आणून दिले जातात. त्याद्वारे प्रत्येक पंचायतीतील किमान दहा ते पंधरा महिला कापडी पिशव्या बनवत आहेत. यासाठी प्रत्येक महिलेला प्रत्येक पिशवीमागे दहा रुपये संस्थेकडून दिले जातात. चार पंचायतींतील सुमारे चाळीस महिला या उपक्रमात सक्रिय असून, प्रत्येक आठवड्याला कापडी पिशव्या शिवून प्रत्येक महिला सुमारे दोन हजार रुपये मिळवते. या महिलांनी तयार केलेल्या कापडी पिशव्या विविध ठिकाणी उपलब्ध करण्यात आल्या असून, नागरिकांकडूनही त्यांना प्रतिसाद मिळत आहे, अशी माहिती आजीविका मिशनच्या इंटरनल मेंटर प्रीती केरकर यांनी ‘गोवन वार्ता’शी बोलताना दिली.                        

प्लास्टिक मुक्तीसाठी सुरू झालेल्या या उपक्रमाला उसकई पंचायतीकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. पंचायतीने या उपक्रमाला पाठिंबा दर्शवत, पंचायत क्षेत्रातील ज्या नागरिकांकडे जुने, वापरात नसलेले कपडे आहेत त्यांनी ते पंचायतीला द्यावे. पंचायत स्वत: त्यांच्याकडून असे कपडे जमा करेल, असे निर्देश जारी केले. त्यानंतर स्थानिक महिलांसाठी एक खोली मोफत देत तेथे शिलाई मशीन व कापडी पिशव्या शिवण्यासाठी आवश्यक ते सर्व साहित्य उपलब्ध करून दिले आहे. ज्या महिलेकडे स्वत:चे शिलाई मशीन नाही, अशा महिला तेथे जाऊन तेथीलच जुन्या कपड्यांपासून पिशव्या तयार करू शकतात. उसकई सरपंच आणि सचिवांनी दिलेल्या पाठिंब्यामुळे या पंचायत क्षेत्रातील महिलांना मोठे पाठबळ मिळाले आहे, असे केरकर यांनी सांगितले.                                     

दरम्यान, उसकई पंचायतीतील स्वयंसहाय्य गटाच्या महिलांनी विविध प्रकारच्या नासलेल्या फळांच्या सालीपासून बायो इन्झायमी केमिकल तसेच बायो खत तयार करण्यासही सुरुवात केली आहे. या पंचायतीतील ३० महिलांना त्याचे प्रशिक्षण देण्यात आले होते, असेही प्रीती केरकर यांनी नमूद केले.                                     

प्रत्येक पंचायतीने मोहीम राबवावी : गडेकर                                     

केवळ उसकईच नव्हे, तर संपूर्ण राज्यातून प्लास्टिक हटाव मोहिमेला गती मिळणे आवश्यक आहे. उसकई पंचायत प्लास्टिकमुक्त करण्याच्या हेतूनेच आम्ही ‘सेन्सिबल अर्थ’ आणि ग्रामविकास खात्याच्या कापडी पिशव्या तयार करण्याच्या उपक्रमाला पूर्ण पाठिंबा देण्याचे ठरवले. इतकेच नव्हे तर असे कपडेही महिलांना उपलब्ध करून देण्याचे निश्चित केले. असे उपक्रम राज्यातील सर्वच पंचायतींनी राबवले, तर गोवा प्लास्टिमुक्त होण्यास वेळ लागणार नाही, असे उसकईचे सरपंच आनंद गडेकर म्हणाले.

हेही वाचा